राउंड द विकेट: महा ‘भारत’ – एकोणिसावा अध्याय – सर्ग ५

महा ‘भारत’ – एकोणिसावा अध्याय – सर्ग ५


RTW logo
.

.

.

.

.

.

धृतराष्ट्र म्हणाले – संजया, अजून किती अवधी आहे युध्द सुरू होण्याला? मी युध्दाचे विवरण ऐकायला उत्सुक आहे. प्रत्यक्ष शस्त्रात्रे न चालवता होणारे हे युध्द असते तरी कसे? गेले काही दिवस तुझाकडून जे ऐकतो आहे, तेच इतके रोचक आहे. मग हे प्रत्यक्ष युध्द असेल तरी कसे? हे जाणून घेण्यास मी उतावीळ झालो आहे.

संजय म्हणाला – (उतावीळपणा हा तर कुरुवंशाचा खानदानी रोग दिसतो आहे!) महाराज, मी पूर्वीच तुम्हाला सांगितले आहे की जसे भारतीय युध्दात प्रत्येक लढवय्याकडे त्याचे-त्याचे शस्त्र होते, तसे प्रत्येक प्रौढ भारतीय नागरिकाला त्याचे ‘मत’ हे प्रभावी अस्त्र असते. एका यंत्रात गुप्तपणे त्यांचे मत नोंदले जाते आणि जास्त मते मिळवणारा लोकांचा प्रतिनिधी म्हणून विजयी होतो.

धृतराष्ट्र म्हणाले – पण संजया, तू मागे म्हणालास की प्रत्येक पक्षाला वेगवेगळे चिन्ह असते, ते कशासाठी?

संजय म्हणाला – हो महाराज, सांप्रत नव्या भारतात प्रत्येक उमेदवारासमोर त्याच्या त्याच्या पक्षाचे चिन्ह असते. त्या चिन्हासमोरील बटण दाबून मत नोंदवता येते. उदा., तुम्हाला माहीत असलेल्या रामायणातील पंचवटी परिसरातील – म्हणजे पांडवलेण्याच्या परिसरात जोर असणाऱ्या एका पक्षाचे चिन्ह आगगाडी नावाच्या अग्निरथाचे इंजीन आहे, तर जुन्या हस्तिनापूरच्या परिसरातील एका पक्षाचे चिन्ह पायांनी चालवण्याचे – म्हणजे माणसाच्या पायांनी चालवण्याचे – एक वाहन ‘सायकल’ हे आहे.

धृतराष्ट्र म्हणाले – संजया, ह्याचा अर्थ पांडवलेणी परिसरातून इंद्रप्रस्थ दूर आहे, म्हणून स्वयंचलित इंजीन आणि जवळच्या प्रदेशात पायाने चालवण्याची सायकल अशी विभागणी आहे का?

sarga 5.

.

.

.

.

.

.

.

.

.

संजय (स्मितहास्य करीत) म्हणाला – महाराज, हे दोन पक्ष, त्यांची प्रभावक्षेत्रे आणि त्यांची निवडणूक चिन्हे यांच्याबद्दल जरी हे योगायोगाने खरे असले, तरी तो काही निकष नाही. वाहनाव्यतिरिक्तही चिन्हे असतात महाराज. तीन पानांपासून कमळाच्या फुलापर्यंत आणि झाडूपासून हत्तीपर्यंत विविध चिन्हे असतात.

धृतराष्ट्र म्हणाले – पण लोकांना कसे कळते की कुठल्या पक्षाचे कुठले चिन्ह ते?
संजय म्हणाला – महाराज, टीव्हीवर, सिनेमाघरात जाहिरातींचा भडिमार असतो. शिवाय इंटरनेटवरदेखील पक्ष आणि उमेदवार भरपूर प्रचार करतात. (महाराजांच्या चेहऱ्यावरील बदलत्या रेषा ह्या ‘डेव्हलपिंग’ प्रश्न-दर्शक आहेत, हे आधीच ओळखून संजय पुढे म्हणाला…) महाराज, आता कृपया ‘इंटरनेट म्हणजे काय?’ हा प्रश्न आपण विचारू नये. कारण ज्यांना इंटरनेट माहीतच नाही, त्यांना आगाऊ कुतूहल ‘बाळगण्याचा’ अधिकार नाही सांप्रत भारतात!

धृतराष्ट्र (हताशपणे) म्हणाले – एव्हाना मला माझ्या मर्यादा कळू लागल्या आहेत संजया. मला तू जे कथन करतो आहेस, तेच पुरेसे आहे. पण मला एक सांग की पूर्वी जेव्हा टीव्ही, तितक्या प्रमाणात सिनेमाघरे, इंटरनेट वगैरे गोष्टी नव्हत्या, तेव्हा लोकांना पक्षाबद्दल, उमेदवाराबद्दल वा त्यांच्या विचाराबद्दल कसे समजायचे?

संजय म्हणाला – महाराज, तेव्हा काही प्रमाणात हे काम वर्तमानपत्रातून व्हायचे. पण त्याहीपेक्षा प्रत्येक पक्षाकडे कार्यकर्त्यांचे मोठे जाळे असायचे. प्रत्येक वस्तीत-वाडीत असणारे त्या त्या पक्षाचे कार्यकर्ते पक्षाचे विचार, कार्यक्रम, उमेदवार, निवडणूक चिन्ह अशासारख्या गोष्टी घरोघरी पोहोचवायचे. अनेक कार्यकर्ते ‘घरचे’ जेवून ‘आपल्या’ पक्षासाठी ‘राबायचे’ आणि आपल्या उमेदवाराच्या विजयात आपला विजय मानायचे.

धृतराष्ट्र म्हणाले – मग कार्यकर्त्यांचे तसे जाळे सध्या नसते का?

संजय म्हणाला – फारसे नसते महाराज. काही पक्षांकडे त्यातल्यात्यात ही परंपरा टिकून आहे. पण बहुतांश ठिकाणी पैसे घेऊन काम करणारी माणसे आहेत. ते कार्यकर्ते नाहीत, तर कर्मचारी आहेत. काही ठिकाणी पत्रके वाटणे, पोस्टर लावणे, बॅनर बांधणे, कार्डे लिहिणे आणि वाटणे अशी कामे कंत्राटाने करणारे लोकही आहेत. इतकेच काय, तर सभेला गर्दी आणणे, मिरवणुकीत वाहने आणणे असे काम करणारेदेखील कंत्राटदार आहेत.

धृतराष्ट्र म्हणाले – हे तर विचित्रच ऐकतो आहे काहीतरी. कार्यकर्ते कमी कशामुळे झाले असतील, संजया? भारताची लोकसंख्या अचानक कमी झाली की काय?

संजय म्हणाला – छे छे, महाराज, तसे काही नाही. जवळपास सव्वाशे कोटी लोक आहेत ह्या देशात. भारतीय युध्दकाळात सगळया जगाची लोकसंख्या जितकी होती, त्याहूनही जास्त लोक एकटया भारतात आहेत… आणि त्यातले निदान निम्मे तरी पन्नाशीच्या आतले आहेत… म्हणजे ‘कार्यकर्ते’पणासाठी फिट आहेत. पण महाराज, लोकांचे रोजचे आयुष्य कटकटीचे झाले आहे. घरी स्वस्थ असणारा माणूस समाजाचा-देशाचा विचार करेल; पण ज्याला दोन वेळची भ्रांत आहे, तो कसा काम करेल?

धृतराष्ट्र म्हणाले – पण संजया, ह्यापूर्वी अशा कितीतरी निवडणुका झाल्या असतील, कितीतरी वेळा लोकांनी आपले आवडते शासक निवडले असतील. तुला असे म्हणायचे आहे का की इतकी वर्षे होऊनही साध्या साध्या लोकांची दोन वेळची भ्रांतही दूर होऊ शकली नाही?

संजय म्हणाला – महाराज, दुर्दैवाने तुम्ही म्हणालात ते सत्य आहे. गेल्या काही दशकात ‘यूज ऍंड थ्रो’ नावाची सवय सर्वांनाच लागली. निवडून आलेला नेता पुढली पाच वर्षे त्याच पक्षात राहील की नाही, हे त्याचे त्यालाच माहीत नसते… तो कार्यकर्त्यासाठी काय तजवीज करणार? जेव्हा निवडून आल्याच्या मोठाल्या गाडया, मालमत्ता, चैनबाजी आणि संपत्तीचा कोटयानुकोटी वाढता आलेख दिसू लागला, तेव्हा कार्यकर्ताही ‘शहाणा’ बनला. घरून डबा घेऊन पक्षासाठी काम करणे तर इतिहासजमा झालेच होते. पण पक्षाच्या जीपमधून येणाऱ्या पुरी-भाजीच्या पाकिटावर काम करणारा कार्यकर्ताही हळूहळू इतिहासजमा झाला. महाराज थोडे स्पष्ट बोलतो, पण भाऊबंदकीच्या शापामुळे आणि सत्तेच्या लालसेपोटी तुमच्या पिढीने राजधर्म जो सोडला, तो आजवर कोणी धरलेलाच नाही. तुमच्या नागरिकांशी प्रतारणा करण्याची सुरुवात तुम्ही केलीत महाराज. आता होणाऱ्या राज्यकर्त्याच्या दिशेने हताशपणे एक ‘मत’ भिरकावण्यापलीकडे अधिक काही करण्याची कोणाची मनःस्थिती नाही.

संजयाचे हे परखड बोलणे ऐकून महाराज चांगलेच विचारात पडले. आणि ‘आज संध्याकाळी काय करावे? महाराजांसाठी केलेल्या रनिंग कॉमेंट्रीने डोक्याचा नुसता भुगा झालाय. रात्री क्वीन बघावा की डोक्याला ‘थंडा-थंडा-कूल-कूल’ तेल लावून झोपी जावे…’ ह्याचा विचार संजय करत राहिला.

चित्र साभार – खलील खान

(प्रथम प्रसिद्धी: विवेक साप्ताहिक, १३ एप्रिल  २०१४. )

This entry was posted in विनोदी/ उपरोधिक and tagged , , , , . Bookmark the permalink.

3 Responses to राउंड द विकेट: महा ‘भारत’ – एकोणिसावा अध्याय – सर्ग ५

  1. Vishal kamath म्हणतो आहे:

    Apratim sir..
    Aawadla..

  2. Maria Fernandes म्हणतो आहे:

    very true

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s