

मास्कमध्ये ठेवा राया अत्तराचा फाया!
कोविडची साथ बाई
जीव तंतरून जाई
धरा तुम्ही माझ्यावरी सुगंधाची छाया
पिते काढा घेई स्टीम
पाही तेच जोक – मीम
विस्तवा शिवाय पेटे कापराची काया
व्हॅक्सीनची नाही डेट
लावा राया वशिला थेट
करोनास मी विसरावे अशी करा माया
.
.
.
.
.
.
.
.
.
.
-मणिंदर
(प्रथम प्रसिद्धी: विवेक साप्ताहिक, मार्च २०१४)
.
आर.के. लक्ष्मण गेले. तब्बल पाच दशकांहून अधिक काळ चाललेले खुसखुशीत, नर्मविनोदी तर कधी सडेतोड असे सचित्र उपहासपर्व संपले. रोज सकाळी टाइम्स उघडताच कधी मथळयावर नजर टाकल्यानंतर, तर कधी त्याहीपूर्वी ‘यू सेड इट’ शीर्षक असलेल्या व्यंगचित्राकडे नजर वळली नाही असे व्हायचे नाही. राजकीय, सामाजिक, प्रशासनसंबंधी अशा अनेक विषयांबद्दल आपल्या मनात असलेल्या भावनांनाच स्वत:च्या खास शैलीत अभिव्यक्त करीत मिश्कील टिप्पणीची सिक्सर मारणारे ते व्यंगचित्र आणि त्यातील चकित, अचंबित, दिग्मूढ भाव चेहऱ्यावर दर्शवणारा ‘कॉमन मॅन’ पाहिल्याशिवाय सहसा दिवस सुरू व्हायचा नाही. रविवारी अग्रलेखाला सुट्टी असायची, पण ‘लक्ष्मण’ला नाही! राज कपूर, लता, आशा, सुनील या भारतीय आयकॉन्सना लोकप्रेमापोटी ‘एकेरी’ संबोधनाचे भाग्य लाभले, तसेच ते आर.के. लक्ष्मण यांनाही लाभले. गम्मत म्हणजे सत्तरच्या दशकात दूरदर्शन आल्यानंतर सुरुवातीला उल्लेख केलेल्या नामवंतांचे अनौपचारिक दर्शन टीव्हीद्वारे लोकांना होत होते. लक्ष्मण सहसा कोणाला दिसले नाहीत. कुठल्याही परिसंवादात, चर्चासत्रात, वृत्तवाहिन्यांवर ते त्यांची ‘बहुमोल’ वगैरे प्रतिक्रिया देताना दिसले नाहीत. दिसत राहिली ती त्यांची व्यंगचित्रे. अशा चेहराहीन माणसाला लोकांचे प्रेम लाभले हेही विलक्षणच मानले पाहिजे.
‘टाइम्स’ ह्या नावालाच एक वलय होते. बेहराम काँट्रॅक्टर नावाचे एक ख्यातनाम स्तंभलेखक लिहायचे की ‘एकेकाळी वृत्तसृष्टीशी संबंधित लोकांना टाइम्सच्या संपादकांप्रमाणेच त्या इमारतीतील लिफ्टमनचेही नाव माहीत असायचे.’ मला आठवते की अभाविपचे काम करत असताना रात्री-बेरात्री दादर स्टेशनवर चहा पिताना अकस्मातपणे नितीन वैद्य किंवा अंबरीश मिश्र हे टाइम्सचे तरुण पत्रकार भेटले की आनंद वाटायचा. त्या रात्री ते गप्पांचा मध्यबिंदू असायचे. कधी प्रेसनोट वाटायला गेल्यावर तळवलकर किंवा दिवि गोखले दिसले की दैवत दिसल्यासारखा आनंद व्हायचा. ‘लक्ष्मण’ कधीच दिसायचे नाहीत. त्या वेळी टाइम्सचा प्रिंटिंग प्रेस तिथेच बोरीबंदरच्या इमारतीत होता, नंतर तो कांदिवलीला हलवला. प्रेसमध्ये एक लायनो ऑॅपरेटर माझ्या परिचयाचा होता. त्याला मी एकदा कुतूहलाने विचारले, ”तुला दिसत असतील ना आर.के. लक्ष्मण कधीतरी? कसे आहेत?” त्याने शांतपणे सांगितले, ”हो, दिसतात ना. त्यांना केबिन आहे. एखादे चित्र काढल्यावर त्यांना फारसे काम नसते. नुसते वाचत बसलेले असतात!”
व्यंगचित्रकार लोकांची आपली आपली एक शैली असते. मारिओ मिरांडासारखा व्यंगचित्रकार चित्र-विषयाच्या आसपास असणाऱ्या परिसराचे बारीकसारीक तपशील आपल्यासमोर उभे करतो. आर.के. लक्ष्मण यांच्या शैलीत असे तपशील सहसा नसायचे. कमीतकमी रेखाटनांच्या मदतीने उपहासाचा मुद्दा अधोरेखित होत असे आणि कायमचा मनावर ठसत असे. मला आठवते – एका चित्रात इमारतीच्या बाहेरच्या भिंतीवर चिकटवलेले पोस्टर्सचे थर खरवडून काढणाऱ्या कर्मचाऱ्याला तेथील रहिवासी टेकू दिलेल्या बाल्कनीतून ओरडून सांगतो, ‘अहो, अशी पोस्टर्स काढू नका, आमची इमारत मोडकळीला आली आहे ती पडून जायची!’ दूरदर्शनवर फक्त संध्याकाळी कार्यक्रम असायचे. नंतर कधीतरी ते सकाळी ‘ब्रेकफास्ट टीव्ही’ ह्या नावाने सुरू झाले. लगेचच लक्ष्मणचे चित्र आले. चाळीवजा सामान्य घरात, टीव्हीसमोर अर्ध्या विजारीत बसलेला छोटा मुलगा निरागसपणे वडलांना विचारतो आहे, ‘बाबा, ब्रेकफास्ट म्हणजे काय?’ टीव्ही माहीत आहे पण ब्रेकफास्ट माहीत नाही, ह्या सामाजिक स्थितीवर ह्याहून नेमके भाष्य अजून काय असू शकेल?
राजकारण, राजकारणी आणि राजकीय वर्तन हे तर लक्ष्मण यांच्या चित्रांचे लोकप्रिय विषय. लक्ष्मण तसे गुणवान आणि बहुप्रसवा कलावंत होतेच, पण राजकारणी मंडळींनीही त्यांना विषयांची कमतरता पडू दिली नाही. राजकारणी मंडळींनी आपल्या वक्तव्यातून वा वर्तनातून एखादा ‘लूज बॉल’ टाकावा की दुसऱ्या दिवशी लक्ष्मण यांचा सणसणीत षटकार ठरलेलाच. एखाद्या चित्रात गांधीजींच्या तसबिरीला माला अर्पण करताना चित्राच्या तळाशी कोणाची तसबीर आहे हे नाव वाचण्याचा प्रयत्न करणारे एक नेताजी, तर ‘गांधीजी… सर’ असे सांगून त्यांना ‘मदत’ करणारा त्यांचा मख्ख स्वीय साहाय्यक. फूटपाथवर वसतीला असणाऱ्या कुटुंबाने आडोशासाठी तिरक्या बांधलेल्या ताडपत्रीवर ‘पाहा नव्या युगाची पहाट’ अशा शीर्षकाचे, बजेट नावाच्या सूर्याचा उदय दाखवणारे ‘रम्य’ चित्र चितारणारा (बहुधा) शहाजोग अर्थमंत्री, किंवा ‘विरोधकांनी लोकांना तुमच्याकडे पाणी नाही, अन्न नाही, नोकऱ्या नाहीत हे सांगून गडबड केली आहे सर, त्याआधीपर्यंत हे गावकरी सुखात होते’ असे कोडगेपणाने मंत्री ‘सरांना’ सांगणारा अधिकारी असे कितीतरी बारकावे सांगता येतील. ती व्यंगचित्रे पाहीपर्यंत हे व्यंगचित्राचे विषय असू शकतात ह्याची कोणी कल्पनाही केली नसेल. बहुधा त्यामुळेच असेल, ज्या वेळी लक्ष्मण यांना पहिला मोठा पुरस्कार मिळाला (बहुधा मॅगसेसे असावा), तेव्हा चित्रकार-व्यंगचित्रकार श्याम जोशी यांनी एक मस्त कार्टून काढले होते. सर्व राजकारणी लक्ष्मण यांच्या दारात येऊ न उभे आहेत आणि कोणीतरी लक्ष्मण यांना सांगते आहे, ‘हे सर्व जण तुमच्याकडे रॉयल्टी मागण्यासाठी जमले आहेत.’
लक्ष्मणच्या व्यंगचित्रात स्थान मिळणे हा राजकारण्यांसाठी सन्मान असायचा. अल्प कारकिर्द असणारे देवेगौडा, 1977च्या निवडणुकीत इंदिरा गांधींना रायबरेली येथे पराभूत करणारे जायंट किलर राजनारायण – ज्यांची त्यानंतरची कारकिर्द अत्यल्प आणि सामान्य राहिली, तेही अनेकदा लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांचे नायक-सहनायक राहिले आहेत. राजनारायण यांचे नाव काढल्याक्षणी त्यांच्या फोटोतील चेहऱ्यापेक्षा लक्ष्मणने काढलेलाच चेहरा डोळयासमोर येतो. जागावाटपासाठी ‘मातोश्री’वर गेलेल्या प्रमोद महाजनांना ‘हॅव अ सीट’ असे म्हणणारे, पण प्रत्यक्षात समोरच्या खुर्चीवर पाय लांब करून बसलेले बाळासाहेब ठाकरे, ‘होम कमिंग’ म्हणत 10 जनपथच्या बाहेर इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश मिळविण्याच्या इराद्याने गाठोडे घेऊ न ताटकळत उभे राहिलेले, त्यांच्या आजूबाजूला कोळीष्टके लागली आहेत असे यशवंतराव चव्हाण किंवा 77च्या पराभवानंतर पुन्हा स्वत:ला राजकारणात प्रस्थापित केल्यानंतरची निवडणूक ‘स्वीप’ केलेल्या इंदिरा गांधी आणि त्यांच्या शेजारच्या टोपलीत त्यांनी ‘स्वीप’ केलेले विरोधक अशी कितीतरी चित्रे कायमची स्मरणात राहिली आहेत. गंमत म्हणजे गांधीजींच्या मृत्यूनंतर लक्ष्मण यांची सगळी कारकिर्द आहे. पण तरीही तसबिरीतून, पुतळयातून दिसणारे, डोकावणारे, चकित होणारे तर कधी आकाशातून ‘खाली’ आपला देश पाहून व्यथित झालेले गांधीजी आपल्याला लक्ष्मण यांच्या चित्रातून भेटतच राहतात.
लक्ष्मण यांनी दीर्घकाळ टाइम्ससाठीच काम केले. टाइम्सला अनेकदा ‘सत्ताधारी पक्षाचे मुखपत्र’, ‘यथास्थितीवादी’, ‘भांडवलशाहीचे पाठीराखे’ आदी विविध दूषणे/विशेषणे मिळत राहिली. लक्ष्मण यांच्यापर्यंत ती दूषणे पोहोचली नाहीत हे विशेष. टाइम्सने अनेकदा विविध प्रश्नांवर, राज्यकर्त्यांबद्दल मिळमिळीत भूमिका घेतली. त्या सर्वांची कसर लक्ष्मण यांनी भरून काढली आणि जनतेच्या व्यथा, राग, स्पष्ट मते व्यंगचित्रातून व्यक्त केली. एका अर्थाने ते लक्ष्मण यांनी चितारलेले अल्प शब्दांचे अग्रलेखच ठरले. ते सामाजिक, राजकीय टीकाकार होते. ‘मी जागा आहे आणि मी तुमच्याबरोबर आहे’ हे आश्वासन त्यांनी लोकांना न बोलता दिले. व्यंगावर प्रहार करण्याचे त्यांचे व्रत होते. आणि हे व्रत आयुष्यभर सचोटीने पार पाडण्यासाठी लागणारी व्रतस्थ अलिप्तता त्यांनी जन्मभर पाळली, हे त्यांचे विशेष. लक्ष्मण गेले. आपल्यामधला काळाचा एक ‘अंश’ कायमचा नाहीसा झाला. त्या अर्थाने ही भरून न येणारी पोकळी आहे.
-शरदमणी मराठे
(प्रथम प्रसिद्धी – विवेक साप्ताहिक, फेब्रुवारी २०१५)
पाश्चात्य शास्त्रज्ञांनी कृष्ण-विवराचे पहिले छायाचित्र प्रसिद्ध केले. आपल्या पासून साडेपाच कोटी प्रकाशवर्षे दूर असलेल्या त्या अद्भुताचे चित्र बघताना अंगावर काटा आला. १९६० च्या दशकाच्या शेवटी चंद्रावर माणसाने ठेवलेले पाऊल असेल, १९७० च्या दशकात भारताने अंतराळात सोडलेला ‘आर्यभट्ट’ नावाचा पहिला उपग्रह असेल, पोखरण येथे केलेला पहिली अणु-चाचणी असेल, १९८० च्या दशकात भारताचा पहिला अंतराळवीराने, राकेश शर्माने, रशियाच्या सोयुझ अवकाश-यानातून केलेले पहिले उड्डाण असेल – माझ्या वयाच्या पंचविशीच्या आत घडलेल्या ह्या घटना होत्या. त्या प्रत्येक वेळी असाच अनुभव आला होता. विशाल अंतराळाचा, सृष्टीच्या उगमाशी जोडलेल्या शाश्वत सत्याचा किंवा अणूतील सूक्ष्म कणांपासून ते अनेक आकाशगंगांना सामावत सतत वृद्धिंगत होणाऱ्या विशाल ब्रम्हांडाचा कोणी वेध घेण्याचा कुठलाही लहान-मोठा प्रयत्न मनात अशाच सुखद लहरी निर्माण करतो.
स्वत: शास्त्रज्ञ वगैरे नसलेल्या मला अशा प्रसंगी पुन:पुन्हा कविवर्य वसंत बापट यांची अकरावी दिशा ही कविता आठवते. गम्मत म्हणजे वर उल्लेखलेली शास्त्रीय घटना घडण्याच्या कितीतरी आधी ही कविता लिहिली गेली आहे. बहुदा १९६०-६१ च्या सुमारास वा अजूनही आधी! विवध दिशांनी येणाऱ्या नव-नवीन अनुभवांचे स्वागत करण्यासाठी बापट एकेका दिशेला असणाऱ्या भिंती हलवण्याचा आग्रह धरतात. जणू अज्ञानाच्या, अल्प-संतुष्टतेच्या, स्थितिप्रिय असण्याच्या बेड्या तोडायला सांगतात आणि क्षितिजावर अवतरणाऱ्या नव्या आविष्कारांना सामोरे जाण्याचे आवाहन करतात. बापट लिहितात… एकेका दिशेचा नामोल्लेख करत लिहितात…
एक भिंत हलवा किमान, ही इथली उत्तरेची.
ध्रुवाच्या स्निग्ध प्रकाशाने उजळलेला वारा
येऊ दे केशरफुलांच्या पायघड्यावरून.
मग उरलेल्या कडव्यात बापट उत्तर दिशेच्या संदर्भात ऐतिहासिक घटनांचा, वस्तूंचा, भू-वैशिष्ट्यांचा, पशु-पक्षांचा संदर्भ देत त्या वाऱ्याविषयी, ‘त्याला वाट द्या’ असे आवाहन करतात.
मग पाळी येते पूर्व दिशेच्या भिंतीची… बापट म्हणतात…
“अंदमानच्या अंधारातून उगवणाऱ्या आरक्त सूर्याला अडवू नका.” मग त्या कडव्यात भारताच्या पूर्व प्रदेशातील कोणार्कचे, पूर्वेकडील कवींच्या रचनात असणाऱ्या अष्टपदीचे, पूर्वांचलाच्या बैठ्या देवालयांवरील पताकांचे, गड-किल्ल्यांचे, गोदावरीच्या मुखापासून पसरलेल्या बंगालच्या उपसागराचे अशी अनेक लोभस वर्णने येतात. पूर्व दिशेनी येणाऱ्या नव्या अनुभवांचे स्वागत करण्याचे आवाहन करत ते कडवे संपते.
एकेक कडवे संपले तरी बापट काहीतरी अजून सांगायचा प्रयत्न करत आहेत. ते कधी उलगडणार आपल्यासमोर अशी चुटपूट प्रत्येक कडवे लावतंच जाते. पुढे बापट पश्चिमेची आणि दक्षिणेची भिंत हलवण्याचे देखील क्रमाने आवाहन करतात. पश्चिमेकडील विशाल सागरांचे, भारताच्या पश्चिम किनाऱ्या पासून ते स्पेन मधल्या माद्रिद मधील बैलांच्या झुंजी पर्यंतच्या विविध प्रतिमांचा गोफ बापट लीलया गुंफतात. दक्षिण भारतातील मराठेशाहीच्या दक्षिण दिग्विजयाचे संदर्भ ह्या मराठी कवीच्या लिहिण्यात न आले तरच नवल. पण हे सारे ‘आपले’ वाटणारे, ‘आपले’ असलेले अनुभव भोगून, अनुभवूनही शेवटी ते त्या-त्या दिशेच्या भिंती दूर करण्याचे व नव्या क्षितिजावर येणाऱ्या नव्या अनुभवांचे स्वागत करण्याचे आवाहनही सातत्याने करतच असतात आणि “…आता पुढे काय” ह्या हुरुहुरीच्या आवर्तात रसिक वाचकाला ओढून नेतात.
माणूस अज्ञाताचा ध्यास घेतो, विश्वाच्या उगमाच्या प्रक्रियांचा शोध घेतो, नेहमी किरणांसारखा वाटणारा प्रकाश, कणांच्या सारखा का वागतो ह्याच्या मुळाशी जातो, जिथून येणारा प्रकाश आपल्यापर्यंत येण्यासाठी कोट्यवधी वर्षे लागतात त्या दूरस्थ अद्भुताची समीकरणे मांडतो. ज्ञात असलेल्या दहा दिशांच्या पलीकडला तो प्रांत असतो. आपल्या अनुभवपटला समोर ‘आता संपले’ असे वाटणारी भिंत एकेका शास्त्रज्ञाने हलवली तेव्हा कुठे ह्या अज्ञाताच्या देशेचा वेध त्यांना घेता आला. जणू त्या नंतर फुटणाऱ्या वाटांबद्दलच बापट पुढे लिहितात…
“ठेवणारच असाल सगळ्या भिंती – तर ठेवा मग!
निदान हे छप्पर ठेवू नका – ओझ्याच्या वजनाचे…
इथूनच फुटते वाट विश्वामित्र सृष्टीची…
ब्रह्महृदयाची ती अधीर खूण तुम्हाला दिसत नाही का?
दोन मार्ग निघतात हे…वेदांची शपथ.
सूर्याच्या किरणांच्या पोलादी तारांवर,
तर्काच्या परशूने ताऱ्यांचे छेद करीत
सत्याच्या रुळलेल्या मनस्वी मार्गांवर मला जाता येणार नाही…”
तसा मी बापटांचा फॅन आहे. त्यांचे सर्व संग्रह माझ्या संग्रही आहेत. स्वत:च्या नसतील इतक्या बापटांच्या कविता मला मुखोद्गत आहेत. बापटांच्या कवितेच्या शेवटच्या कडव्याचा हा भाग वाचताच मी अनेकदा थांबलो आहे आणि पुन्हा-पुन्हा हा भाग वाचला आहे. सुमारे वीस वर्षांपूर्वी स्वत:च्या डेस्क वर इंटरनेटची जोडणी आली तेव्हा, घरातील पुढल्या पिढीच्या तोंडी ‘AI’, ‘IOT’ वगैरे शब्द आले तेव्हा मला नेहमीच ‘अकरावी दिशा’ आठवली आहे. बर्न शहरात आईन्स्टाईन यांच्या राहत्या घराचे केलेले म्युझियम बघताना, त्यांना मिळालेले नोबेल पदक बघताना, स्विझर्लंड – फ्रांस सीमेवर असलेला “लार्ज हॅड्रॉन कोलायडर” चा विशाल आणि अद्भुत प्रयोग बघताना, तिथे, विश्व निर्मितिच्या रहस्याचा वेध घेण्याच्या प्रयोगात रममाण झालेल्या शास्त्रज्ञांना बघताना, ‘हिग्स-बोसॉन’ कण मिळाल्याचे जाहीर करतानाची दृश्ये बघताना, मला नेहमीच ह्या ओळी आठवल्या आहेत. पुन्हा वाचाव्याशा वाटल्या आहेत. “सत्याच्या रुळलेल्या मनस्वी मार्गांवर मला जाता येणार नाही…” ह्या पेक्षा काय ठरवले असेल त्या त्या काळातल्या वैज्ञानिकांनी? “इथूनच फुटते वाट विश्वामित्र सृष्टीची…” असा नव्या ज्ञानमार्गाचा साक्षात्कार कसा झाला असेल शास्त्रज्ञांना?
सर्न मध्ये (CERN) म्हणजे युरोपीय अणुसंशोधन संस्थेच्या आवारात, भारताच्या सर्न मधल्या सहभागाचे प्रतिक म्हणून नृत्य करणाऱ्या शिवाची, नटराजाची मोठी मूर्ती आहे. भारताच्या ज्ञान-संपदेला नव्या संशोधन प्रक्रियेशी जोडणारे ते प्रतिक आहे. ते बघताना एक भारतीय म्हणून आनंद होतोच; शिवाय अशा अज्ञाताचा वेध घेणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि प्रक्रिया यांच्या बद्दल आपण नतमस्तक होतो. तिथे मला बापटांच्या कवितेच्या शेवटच्या ओळी आठवल्या…
“सत्याच्या रुळलेल्या मनस्वी मार्गांवर मला जाता येणार नाही.
माझा मार्ग दुसरा आहे.
चंद्रकिरणांच्या लक्ष्मणझुल्यावर भोवळ आल्याशिवाय
कशी सापडणार आकाशगंगा?
तुम्हाला माहित आहे ना?
कोऽहं च्या हाकेला सोऽहं चा प्रतिसाद मिळतो
ते अनादी देठाचे ओंकार-कमळ मी शोधत आहे.
किरणातून येणाऱ्या त्याच्या परागांना वाट द्या,
अरे त्यांना वाट द्या,
तीच अकराव्या दिशेची धूळ आहे.
sharadmani@gmail.com
(मूळ कविता – ‘दातापासून दाताकडे’, कवी- विंदा करंदीकर)
स्वच्छ कप, गलिच्छ कप
ओशट कप, चिकट कप
काही उंच, काही बुटके
काही उजळ, काही विटके
काही कप कानतुटके
काहींवरती फुलेपाने
नक्षीमध्ये चांदी-सोने
तुझी माझी झेप पडे
कपापासून कपाकडे..
मला एक कळले आहे
अलमीनच्या चरवीत बसून
ताजे दूध पळाले आहे
तुझ्या-माझ्या कपामध्ये
पावडर मिल्क उरले आहे
स्वच्छतेचे लागले राडे
कपावरचे वाढले तडे
त्यात काय नवीन घडे
तुझी माझी धाव आहे
कपापासून कपाकडे..
– शरदमणी मराठे
सर्वसाधारणपणे श्री गुरुजी हे लोकांना माहीत आहेत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (ह्यापुढे उल्लेख केवळ ‘संघ’ असा असेल) दुसरे सरसंघचालक म्हणून. संघाचे संस्थापक व आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांच्या निधनानंतर, म्हणजे १९४० पासून ते १९७३ पर्यंत अशी तब्बल ३३ वर्षे गुरुजी संघाचे सरसंघचालक होते. आजवरच्या सर्व सरसंघचालकांच्या तुलनेत हा तसा प्रदीर्घ कालावधी आहे. मुख्यत: संघाच्या संघटनात्मक विस्तार व दृढीकरणासाठी त्यांचा देशभर संघटनात्मक प्रवास होत असे. असे सांगतात की दरवर्षी दोन वेळा ते पूर्ण देशात प्रवास करत. त्यामुळे ढोबळमानाने हिंदूंचे संघटन करणाऱ्या एका संघटनेचे ते प्रमुख होते, प्रमुख संघटक होते, मार्गदर्शक होते असे म्हटले तर ते रास्तच ठरेल. पण ज्या विशाल राष्ट्रीय दृष्टीकोनाने संघाची स्थापना व मार्गक्रमणा झाली त्यात ‘हिंदूंचे संघटन’ ह्या संकल्पनेत केवळ ‘संख्यात्मक पट उभारणी’ची कल्पना नसून उच्च-नीचता, जातीभेद, स्पृश्यास्पृश्यता ह्या अवगुणांवर मात करत गुणात्मक, एकात्म व समरस समाजाच्या निर्मितीचीच कल्पना होती. त्यामुळे जरी प्रत्यक्षात दैनंदिन कार्यात वापरले जाणारे ‘संघटन’, ‘एकजूट’ हे शब्द जरी रूढ असले तरी सैद्धांतिक भूमिकेच्या, वैचारिक निष्ठेच्या व संघटनात्मक व्यवहाराच्या स्तरांवर भेदाभेद रहित समतायुक्त समाज निर्मितीचे ध्येयच डोळयांसमोर होते. त्यामुळेच, गुरुजींचे समरसता विषयक विचार व कार्य सरसंघचालक म्हणून सुरुवातीच्या काळात ‘संघटनात्मक कार्य’ ह्या संज्ञेमध्ये समाविष्ट होत गेले आणि काहीसे संघ संघटनेपर्यंतच ज्ञात राहिले. पण त्यांच्या सामाजिक समतेच्या आग्रहाचा, त्यासाठी ते सातत्याने करत असलेल्या चिंतनाचा व प्रत्यक्ष कार्याचा परिचय व प्रत्यय गुरुजींच्या सरसंघचालक कारकीर्दीच्या अखेरच्या दशकांत संघटनेच्या बाहेर सर्व समाजाला व हिंदू समाजातील विविध संप्रदायांच्या प्रमुखांना अनुभवता आला.
तसे मुळातच अध्यात्मिक वृत्तीच्या श्री गुरुजींना सुरुवातीपासूनच हिंदू समाजात विद्यमान असणाऱ्या जातीभेदांच्या बद्दल व स्पृश्य-अस्पृश्य मानणाऱ्या वाईट रिती–रुढींच्या बद्दल नकाराचीच भावना होती. त्यांच्या संघातील अगदी प्रारंभीच्या काळात व त्यापूर्वीही त्यांच्या विद्यार्थी दशेत अनेक प्रसंगात ती व्यक्त झाली आहे. तसे त्यांच्या घरातील वातावरण जात-पात मानणारे नव्हते. ते विद्यार्थी असताना बनारस मध्ये एका मागासवर्गीय विद्यार्थ्याकडे खानावळी (मेस) साठी पुरेसे पैसे नव्हते तेव्हा गुरुजींनी पुढाकार घेतला आणि बरोबर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मिळून मेसचे पैसे भरले होते. ती व्यवस्था दोन वर्षे सुरु होती. गुरुजींनी त्यांच्या तरुणपणी, मद्रासला शोधनिबंध वाचण्यासाठी गेलेल्या ‘बाबुराव तेलंग’ ह्या मित्राला पत्र लिहिले होते. त्या पत्रात गुरुजी लिहितात “ब्राह्मण- ब्राह्मणेतर, स्पृश्य-अस्पृश्य हे सारे भेद नष्ट करून समाज एकसंघ केला पाहिजे”. संघातील सुरुवातीच्या काळात व नंतर सरसंघचालक झाल्यानंतरही नागपूर शहरात संघकार्याच्या निमित्ताने वावरताना अनेक मागासवर्गीय घरांतील स्वयंसेवकांच्या घरी ते गेल्याच्या, आजारपणात औषध-उपचारात लक्ष घालून मदत केल्याच्या, त्या त्या घरातील सुख-दु:खाच्या प्रसंगी उपस्थित असल्याच्या अनेक आठवणी विवध पुस्तकातून नोंदवलेल्या आहेत. नागपूर येथील रिपब्लिकन नेते, बौद्ध धर्मीय विद्वान यांच्याशी गुरुजींचे व्यक्तिगत संबंध होते. रामरतन जानोरकर, पं. रेवाराम कवाडे (प्रा. जोगेंद्र कवाडे यांचे काका) यांच्या बरोबर झालेल्या गुरुजींच्या भेटीच्या वा ते संघ उत्सवात सहभागी झाल्याच्या आठवणीही विविध पुस्तकात नोंदवलेल्या आहेत.
गुरुजी ज्या रा.स्व.संघाच्या सर्वोच्च पदावर ३३ वर्षे होते त्या संघाची सामाजिक समतेच्या ध्येयासाठी झालेली वाटचाल आणि गुरुजी यांना वेगळे करता येऊ शकत नाही. हिंदू समाजाच्या विशाल संघटनेचे उद्दिष्ट संघाने स्थापनेपासून मांडले होते. ते संघटन उभारणीचे कार्य जातीभेदांचा भिंती मोडल्याशिवाय शक्य होऊ शकत नाही हे तर उघडच होते. डॉक्टरांनी स्थापन केलेल्या संघाची वाटचाल जरी त्या दिशेने सुरु होती, आणि जरी महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या संघस्थानाला भेट देणाऱ्या पाहुण्यांनी संघाच्या शाखेत, शिबिरात स्वयंसेवकांचा परस्परांशी व्यवहार जातीभेदांच्या भिंती न मानणारा आहे ह्याबाबतीत संघाचे कौतुकही केले होते, तरीही संघाचा प्रसार डॉक्टरांचे निधन झाले तेव्हा भारताच्या सर्व भागांत असला तरी तसा मर्यादितच होता. एक प्रकारे डॉक्टरांनी उभे केलेले प्रतिमान त्याच ध्येयाने, गुणवत्तेवर तडजोड न करता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे मोठे आव्हान डॉक्टरांच्या नंतर संघासमोर होते आणि श्री गुरुजींच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या टीमने ते समर्थपणे पेलले. त्यात एका टप्प्यावर संघाची ताकद व संघटनात्मक स्थिती आली असताना महात्मा गांधींची हत्या झाली. माणसाला मारून विचारांचा पराभव करता येत नाही हे न समजलेल्या ज्या मोजक्या माणसांनी भावनेच्या भरात व माथेफिरूपणे कट करून हे निंद्य कृत्य केले ते सर्व स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणारे होते. स्वाभाविकपणे त्याचा थेट फटका व कायदेशीर नसला तरी भावनिक कलंक संघाला लागला. त्या सगळ्या घटनांवर अधिक काही लिहित नाही पण गांधीजींच्या दुर्दैवी हत्येमुळे एक विचार म्हणूनही हिंदुत्व विचारांचे भरपूर नुकसान झाले. संघाचे कामही संघटनात्मक दृष्ट्या मागे गेलेच पण समाजातील स्वीकारार्हता ह्या दृष्टीनेही संघाची पीछेहाट झाली. त्या धक्क्यातून संघाला पुन्हा सावरत वृद्धिंगत करण्यासाठी पुढील काही वर्षे गुरुजींनी संघटनात्मक प्रयत्नांची पराकाष्ठा केली. गुरुजींच्या सामाजिक योगदानाचा अभ्यास करताना ह्या आघाताचा व त्या नंतरच्या खडतर कालखंडाचाही विचार करावा लागेल.
१९४० मध्ये सरसंघचालक झाल्यानंतर त्यांनी संघाच्या विस्तारासाठी आणि दृढीकरणासाठी देशभर प्रवास केला. संघबंदीच्या काळात भोगाव्या लागलेल्या कारावासाच्या काळाचा अपवाद सोडला तर त्यांचा देशभर प्रवासाचा क्रम अथक सुरूच राहिला. जातीभेदांच्या वा कुठल्याही क्षुद्र विचारांना थारा न देणारे हिंदू समाजाचे विशाल संघटन उभारण्याच्या एकच ध्यास गुरुजींनी घेतला. जातीभेद नष्ट करा असे म्हणून ते नष्ट होत नाहीत. तर जाती-पाती पेक्षाही मोठी व आपल्या देशाच्या महान परंपरेशी वारसा सांगणारी हिंदुत्वाची ‘मोठी रेष’ जाती विचाराच्या छोट्या रेषेच्या शेजारी काढणे व त्या वैभवशाली वारश्याबद्दल गौरव भाव वृद्धिंगत करत स्वयंसेवकात समतेची आणि एकजुटीची भावना निर्माण करणे हा एक प्रकारे एककलमी कार्यक्रमच संघाचा आणि गुरुजींचा पुढील सर्व वर्षांचा राहिला. हे करत असताना जातिभेद, अस्पृश्यता आदि दोषांचाही स्पष्ट शब्दात उल्लेख एक आव्हान म्हणून संघाने सतत केला. हे काम सोपे नव्हते. संघात प्रवेशासाठी काही विशेष पूर्वअट नव्हती. स्वत:ला हिंदू म्हणवून घेणारा व भगव्या ध्वजाला प्रणाम करणारा कोणीही संघात येऊ शकतो. त्यामुळे जो समाज आधीच जातीभेदांच्या भिंतींनी विभागलेला आहे, स्वत:च्या जातीबद्दल वयंकाराची भावना अंगी बाळगणारा आहे अशा समाजामधुनच स्वयंसेवक संघात येत असतो. त्या स्वयंसेवकाला त्याच्या घरात असणाऱ्या जात विषयक धारणांवर मात करत विशाल हिंदुत्वाच्या एकात्मतेचा अनुभव द्यायचा हे मोठे आव्हानच होते. त्यासाठी शाखेच्या कार्यक्रमांची व उत्सवांच्या आयोजनाची घडी बसवणे, विविध बैठका, चर्चा, प्रशिक्षण वर्ग आदि संघटनात्मक रचनेची आखणी करायची हे मोठे कौशल्याचे व संयमाची परीक्षा बघणारे काम होते. गुरुजींच्या नेतृत्वाखालील संघाने हे आव्हान पेलले आणि वर लिहिलेल्या वैचारिक सूत्राशी प्रामाणिक राहून संघकार्य देशाच्या अक्षरशः काना कोपऱ्यात पोहोचवले. त्यामुळेच जातीभेद न मानणारा, स्वार्थासाठी जातिव्यवस्थेचा उपयोग न करणारा, हिंदुत्वाच्या आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या धाग्यात ओवलेला असा लाखो सामाजिक कार्यकर्त्यांचा समूह संघाने इतक्या वर्षांत उभा केला. हे गुरुजींचे समरसतेसाठी केलेले सर्वोच्च योगदान आहे. माझ्या बघण्यात तरी असे दुसरे उदाहरण नाही.
संघकार्याच्या निमित्ताने होणाऱ्या प्रवासांत गुरुजींनी अनेक सन्माननीय व्यक्तींशी विचार-विमर्श केला. सामाजिक समतेच्या विषयात समाजातील अनेक जाणकार व्यक्तींशी चर्चा केली. १९६१ च्या सुमारास करपात्री महाराजांना गुरुजी दिल्लीत भेटले. करपात्री महाराजांचे म्हणणे होते की देशभर पसरलेल्या संघाच्या लाखो स्वयंसेवकांनी हिंदू धर्मातील त्यांच्या त्यांच्या वर्णाप्रमाणे आचरण करावे आणि तसे करण्यासाठी गुरुजींनी एक नेता म्हणून सर्व स्वयंसेवकांना सांगावे. त्या चर्चेत गुरुजींनी महाराजांना नम्रपणे पण स्पष्टपणे सांगितले “मी जरी संघाचा प्रमुख असलो तरी सर्व स्वयंसेवक माझे बंधू आहेत. ते माझे शिष्य नाहीत की मी काही सांगावे आणि त्यांनी ऐकावे” करपात्री महाराजांना गुरुजींचे म्हणणे काही रुचले नसावे. मग गुरुजी त्यांना पुढे म्हणाले “रागावू नका, पण मला सांगा आज कुठे वर्णव्यवस्था शिल्लक राहिली आहे? कुठे जातीव्यवस्था राहिली आहे? तीच जीर्ण व्यवस्था पुन्हा उभी करण्याचे प्रयत्न व्यर्थ आहेत. हे सर्व मोडून एकच समाज निर्माण करण्याची वेळ आली आहे. त्यातूनच नवी समाज व्यवस्था निर्माण होईल. वास्तविकपणे संघ हेच काम करतो आहे. सर्वांना एकत्र आणून, जाती-पंथाच्या आधारावर नाही तर समाज, राष्ट्र हा चिरंतन आधार घेऊन एक सुसूत्र, एकरस व संघटीत समाज उभा करायचा आहे. कोणतेही भेद राहू द्यायचे नाहीत”
भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर खरे तर अस्पृश्यता, जातीभेद आदि गोष्टी कायद्याने नाकारल्या गेल्या. नव्या राज्यघटनेने सर्व नागरिक सामाजिकदृष्ट्या समान आहेत असे आग्रहपूर्वक सांगितले. तरीही मनामनात असलेले जातींचे वयंकार काही चुटकीसरशी गेले नाहीत. तसे होणे अवघडही होते. जातींच्या आधारावर असलेल्या उच्च-नीचतेच्या भावना मनामनात तशाच होत्या. आजही त्या पुरत्या गेलेल्या नाहीत. हे परिवर्तन कायद्याने होण्याच्या मर्यादा होत्या आणि आहेतही. स्वातंत्र्याच्या वेळेला, म्हणजे १९४७ मध्ये भारतात १२% साक्षरता दर होता. ह्याचा अर्थ ८८% लोक निरक्षर होते. १९६१ पर्यंत ह्यात प्रगती झाली खरी. तरीही साक्षरता दर २८% इतकाच वाढू शकला. जवळ जवळ ७२% लोक निरक्षर होते. अशा स्थितीत राज्यघटना, कायदा वगैरेंनी समतेचा धरलेला आग्रह सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचण्याच्या मर्यादा होत्या. अशा स्थितीत परंपरेने लोकांच्या मनात आदराचे स्थान असलेले विविध पंथांचे प्रमुख, धर्माचार्य, मठाधिपती अशा व्यक्तींनी जर सामाजिक समतेबद्दल, जातीभेद न मानण्याबद्दल आणि मुख्य म्हणजे अस्पृश्यता ही अयोग्य रूढी आहे हे सांगितले तर त्यांच्या आदरापोटी व धर्मातील, पंथातील स्थानामुळे ते ऐकतील व निदान ह्या कुरीतींना धर्माचे समर्थन (sanction) नाही हे अधोरेखित होईल असा विश्वास गुरुजींना वाटला.
हे काम सोपे नव्हते. संत तुकडोजी महाराजांनी देखिल गुरुजींना “हे महा कठीण काम आहे, तुम्ही ह्या भानगडीत पडू नका” असा मित्रत्वाचा सल्लाही दिला होता. पण गुरुजींनी त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. विविध पंथ प्रमुख, धर्माचार्य, आखाड्यांचे प्रमुख, त्यांच्या आपापसातील एकमेकांच्या पेक्षा “मोठे” “वरिष्ठ” आहोत अशा धारणा, ह्या सर्व गोष्टींना मागे टाकत त्यांना एका व्यासपीठावर आणणे हे कठीण व न भूतो अशा स्वरूपाचे काम होते. काही काही ‘धर्माचार्य’ तर अनेक वर्षांत त्यांच्याच जिल्ह्यातील दुसऱ्या धर्माचार्यांना कधीच भेटले नव्हते. पण अशा सर्व पंथ प्रमुखांचे, मठाधिपतींचे त्या त्या भूभागातील लोकांवर असलेले अधिकाराचे स्थान बघता त्यांना एकत्र आणणे गरजेचे होते. अशा सर्व पंथप्रमुखांशी संवाद साधणे, शास्त्रार्थाची चर्चा करणे हे गुरुजींनी विनम्र भावाने पण अध्यात्मिक अधिकाराने केले. त्यातूनच १९६४ मध्ये मुंबईला सांदिपनी आश्रमात ‘विश्व हिंदू परिषद’ ह्या सर्वसमावेशक संघटनेची स्थापना गुरुजींच्या पुढाकाराने व विविध धार्मिक नेत्यांच्या, मार्गदर्शकांच्या सक्रीय उपस्थितीत झाली. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून धर्मचार्यांच्या संमेलनाचे आयोजन त्यानंतर वेळोवेळी करण्यात आले. १९६६ मध्ये अलाहाबाद येथील पहिल्या संमेलनातच “न हिंदू पतितोभवेत” ह्या संकल्पाचा उद्घोष करण्यात आला. हिंदू समाजात कोणीही ‘पतित’ असू शकत नाही. सर्व जण समान आहेत हे आग्रहपूर्वक सांगितले गेले. त्यातूनच काही तात्कालिक वा ऐतिहासिक कारणांनी हिंदू धर्म सोडून गेलेल्या व्यक्तींना हिंदू धर्मात परत येण्याचा मार्ग प्रशस्त झाला. धर्म सोडून गेल्यामुळे बहिष्कृत मानण्याची गैरव्यवस्था संपुष्टात आली. अशा बहिष्काराला धर्माचे समर्थन नाही हे ही अधोरेखित झाले.
पुढे लगेचच १९६९ मध्ये कर्नाटक किनाऱ्यावरील उडूपी येथे झालेल्या पुढल्या धर्मसंमेलनात ‘हिंदवे सोदरा सर्वे’ ह्या वचनाचा उद्घोष करण्यात आला. ह्या संमेलनाचे आयोजन गुरुजींच्या कल्पेनेने व सक्रीय सहभागाने पार पडले. सारे हिंदू बांधव आहेत. त्यात उच्च-नीच भावना असणे धर्मसंमत नाही असा ठराव एकमुखाने संमत करण्यात आला. मागासवर्गीय समाजात जन्मलेले कर्तृत्ववान सेवानिवृत्त आय.ए.एस. अधिकारी व त्यावेळेस पब्लिक सर्व्हिस कमिशनचे सदस्य असणारे श्री आर भरनैय्या उडुपी संमेलनात सक्रीय होते. प्रस्ताव सत्राचे ते अध्यक्ष होते. त्यांनी प्रस्ताव वाचला “आपल्या पूजनीय धर्मगुरूंनी, आचार्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार, सर्व हिंदू बांधवांनी उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्य अशा प्रकारच्या सर्व भेदभावांना मूठमाती देऊन आपले सर्व सामाजिक आणि धार्मिक व्यवहार, जात-पात, भाषा, वंश, इत्यादी सर्व भेदभाव बाजूला ठेवून, आपण सर्वजण हिंदू बांधव आहोत ह्याच उदात्त भावनेने करावेत असे अत्यंत कळकळीचे आवाहन ही परिषद करीत आहे”. हा प्रस्ताव मांडताच प्रतिनिधींनी ठरावाच्या समर्थनार्थ मत नोंदवले आणि टाळ्यांचा-घोषणांचा एकच गजर झाला. जातीपातीच्या आधारावर उच्च-नीच मानण्याच्या भावनेला व अस्पृश्यतेसारख्या अनिष्ट रूढींना धर्माची मान्यता नाही हे प्रत्यक्ष धर्माचार्यांच्या सभेमध्येच जाहीर करण्यात आले आणि सामाजिक समतेच्या प्रयत्नांत धर्माचार्य, पंथ प्रमुख व मठाधिपती अशा सर्वच धार्मिक नेत्यांचा सहभाग व निर्धार अधोरेखित झाला. प्रस्ताव पारित झाल्यावर श्री आर भरनैय्या यांनी गुरुजींना आलिंगन दिले. भरनैय्या यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. त्या धर्मपरिषदेत धर्माचार्य, पंथप्रमुख व मठाधिपती यांना उद्देशून केलेल्या भाषणात त्यांना आवाहन करताना गुरुजी म्हणाले… “धर्मगुरूंपुढे असणारे दुसरे कर्तव्य आहे ते विद्यमान कुरीतींपासून समाजाचे रक्षण करण्याचे… मठाबाहेर पाऊल टाकताना त्यांनी त्याच सिद्धांतांवर भर दिला पाहिजे की, जे सिद्धांत समाजासाठी, सर्वांसाठी उपयुक्त ठरतील” सर्व धर्माचार्य मंडळींशी आदरपूर्वक वागत असतानाही धर्मगुरूंच्या विधायक सामाजिक भूमिकेविषयीचे आग्रह गुरुजींनी अत्यंत स्पष्ट शब्दात मांडले हे देखील लक्षात घेतले पाहिजे. इतकेच नाही तर संघ स्वयंसेवकांना व संघातील सहकाऱ्यांना उडुपी संमेलनानंतर लगेच लिहिलेल्या पत्रात गुरुजी लिहितात “…ह्या संमेलनाच्या यशाने हुरळून जाण्याची वा अल्पसंतुष्ट होण्याची गरज नाही. इथे धर्माचार्यांनी प्रस्ताव स्वीकारला म्हणून जादू केल्यासारखे काही एकदम बदलणार नाही. शतकानुशतके चालत आलेल्या गैर रूढी चुटकीसरशी संपणार नाहीत. इतिहासात घडलेल्या चुकांचे प्रामाणिक भावनेने परिमार्जन करावे लागेल व तो अपेक्षित बदल साध्य करण्यासाठी शहरा-शहरात, गावा-गावात, घराघरात एकेका माणसाशी संवाद साधायला लागेल, जे गैर आहे त्याबद्दल प्रबोधन करावे लागेल. हृदय-परिवर्तन करावे लागेल. वागण्यात-बोलण्यात, आचरणात नैतिक व भावनिक पातळीवर बदल करावे लागतील, स्वीकारावे लागतील…”
आज गुरुजींच्या प्रयत्नांचा धागा संघ हरप्रकारे पुढे चालवत आला आहे. गुरुजींनी हिंदू समाजातील जातींमुळे ठरणाऱ्या उच्च-नीच भावनेचा कठोर शब्दात ‘दोष’ म्हणून उल्लेख केला, तर त्यांचाच वसा पुढे चालवणारे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी अस्पृश्यतेवर कठोर आघात करत “It should go lock stock and barrel” अश्या नी:संधीग्ध शब्दात अस्पृश्यतेचा धिक्कार केला होता. तर आत्ताचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी “जाती व्यवस्था नाही तर जी आहे ती अव्यवस्था आहे” असे स्पष्टपणे सांगत जातीव्यवस्थेच्या अ-प्रासंगितेला अधोरेखित केले आहे. मांडणीची शब्दयोजना बदलती राहिली असली तरी सर्व हिंदू समाजाचे, जन्माने ठरणाऱ्या उच्चनीचतेच्या कालबाह्य कल्पनांना त्यागून वैभवशाली वारशाच्या अभिमानास्पद पायावर बलशाली संघटन उभे करण्याचे प्रयत्न मात्र एकाच पोताचे होते हे दिसून येते.
आज संघाच्या हजारो शाखा आहेत लाखो स्वयंसेवक आहेत. सर्वत्र चालणाऱ्या उपक्रमांत जातीभेदाला स्थान न देता ‘अवघा हिंदू समाज एक आहे’ ही भावना कुठेही हरवलेली नाही. मागासवर्गीय वस्त्या, अनुसूचीत जमाती, भटक्या व विमुक्त जमाती अशा विविध उपेक्षित घटकांच्या चालणाऱ्या विविध सेवा कार्यात, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य प्रकल्पात व क्षमतावर्धनाच्या कामात अनेक स्वयंसेवक कार्यरत आहेत. समाजात वावरणारे स्वयंसेवक देखील जाती-उपजातींच्या छोट्या व खोट्या अभिनिवेशांवर मात करत आपले कौटुंबिक जीवन आकारत आहेत. विविध मागास घटकांसाठी असणाऱ्या सरकारी सकारात्मक योजनांच्या बद्दल व राज्यघटनेद्वारे स्थापित झालेल्या आरक्षणाच्या तरतुदींबद्दल स्वत: लाभार्थी नसणाऱ्या स्वयंसेवकांत व संघ समर्थक घरांत देखील स्वीकारार्हतेची व समर्थनाची जाणीव निर्माण करण्यात संघाने यश साध्य केले आहे. आंतरजातीय, आंतरभाषिक विवाह अशांकडे अनेक ‘संघाच्या घरांत’ जुन्या अभिनिवेशांचा लवलेशही न ठेवता स्वागतशील भावनेने बघितले जात आहे. योग्य सामाजिक वर्तणुकीचे आग्रह, सामाजिक समतेची जाणीव वगैरे गोष्टी सभा-संमेलनाच्या वा भाषणबाजीच्या न राहता साध्या साध्या स्वयंसेवकांच्या दैनंदिन व्यवहाराचा व संस्थाजीवन म्हणून नित्य आग्रहाचा भाग झाला आहे. आज दिसणाऱ्या ह्या विशाल व आश्वासक पटलाचे प्रथम संकल्पचित्र गुरुजींच्या आग्रहाने व त्यांच्या प्रेरक मार्गदर्शनाखाली निर्माण झाले होते हे विसरून चालणार नाही. गुरुजींचे सामाजिक परिवर्तनासाठीचे हे योगदान अनन्यसाधारण व चिरंजीवी आहे.
-शरदमणी मराठे
sharadmani@gmail.com
+91 9920860749
संदर्भ ग्रंथांची सूची:
ते झाड आम्हा भावंडांच्या बालपणाचा एक अविभाज्य भाग बनून गेले होते. उन्हाळयाच्या सुटीतील असंख्य उपक्रम ह्या झाडाच्या सहभागाने झाले होते. लपालपी / डबाऐसपैस / भोज्ज्या असल्या खेळात एका भिडूची लपण्याची सोय ह्या झाडाने अनेक वर्षे केली. झाडाच्या दृष्टीने आजही हरकत नसावी, पण आमचे आकार वाढण्याचा वेग व झाडाच्या बुंध्याचा व्यास वाढण्याचा वेग ह्यात थोडी तफावत आहे! अंगणात केलेल्या मातीच्या किल्ल्याच्या सजावटीतील मोठा भार ह्या झाडाच्या फुलांनी उचलला होता. रस्त्यावरील मैलाच्या दगडापासून ते खांब्यावरील दिव्या पर्यंतच्या सर्व भूमिका त्या फुलांनी निमूटपणे निभावल्या. नाचातील राधाकृष्णां च्या गळयात हार पडायचे ते ह्याच फुलांचे. एका सुटीत तर दणक्यात साजरे केलेलेभावला-भावलीचे लग्न ह्याच फुलांच्या भरवशावर पार पडले होते.
एल निनो नावाच्या प्रवाहाच्या
अडण्या – वाहण्याचे आडाखे…
अलीकडे
राजकारण्यांच्या कलाकलाने
मान्सूनच्या पु-या-अपु-यापणाचे ठोकताळे
मध्ये सापडलेला बिचारा
माझा साधा भोळा पाऊस
.
आणि पावसाळी चपलांचे विषय
बाहेर चर्चा पैशांच्या
-नालेसफाईत अडवल्याच्या आणि
मिठी नदीच्या कामात जिरवल्याच्या
मध्ये बावचळलेला बावरा
माझा कसाबसा पाऊस
.
कोरडे शहर मागे सोडून
हिरव्या विश्वात जाण्याची
कोसळत्या धारांचा आणि
उगवत्या अंकुरांचा साक्षात
मीलनोत्सव पहाण्याची
जर नाही घडले हातून
तर पावसाचे सृजनाशी असलेले नाते
जायचे कायमचे विस्मरणात
आणि उरायचे केवळ
एल निनो, गळक्या गच्चा
आणि भ्रष्टतेचा ’मिठी’ प्रवाह.