राउंड द विकेट: महा ‘भारत’ आणि एकोणिसावा अध्याय – सर्ग १

महा ‘भारत’ आणि एकोणिसावा अध्याय – सर्ग १

RTW logo

संजय म्हणाला – हे धृतराष्ट्र महाराज, मी आपल्याला पुन्हा विनंती करतो की तुम्ही माझा राजीनामा स्वीकारावा आणि मला ‘विथ इमिजिएट इफेक्ट’ मुक्त करावे. कृपया माझे आयकार्ड, रथाचा पार्किंग पास आणि दिव्य दृष्टी परत घ्यावीत. मला ह्या दिव्य दृष्टीचा काय बरे उपयोग. सर्वत्र सी.सी.टीव्ही असताना हे जुनेपुराणे दिव्य डोळे तुम्हाला सेवा देण्यात कुचकामी आहेत.

धृतराष्ट्र म्हणाले – हे संजय. तुला दिव्य दृष्टी देणाऱ्या देवाने तोच वरदहस्त अक्कल देताना का बरे ठेवला नाही? अरे मूढा युद्ध नव्या तंत्राने नव्हे तर दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर जिंकले जाते.

संजय म्हणाला – हे हस्तिनापुर सम्राट. मान्य आहे पण मी थोडाच युद्ध लढणार आहे. माझे काम तर केवळ ‘रनिंग कॉमेंट्री’ करण्याचे आहे. आणि सी.सी.टीव्ही, उपग्रह वाहिन्यांच्या ह्या काळात मी हे काम का करावे? आता माझे वयही झाले आहे. दिव्य असली तरी दृष्टी साथ देत नाही. शिवाय आता इहलोकी कुठल्याच ‘दिव्य’ गोष्टीस फारसे वलय राहिले नाही महाराज. आता मला दिव्य दृष्टी सोडून आणि थ्री.डी. चष्मा घालून एखादा थ्री.डी. सिनेमा पाहण्याचा मूड आहे…

धृतराष्ट्र म्हणाले – हे संजया, हे भलतेच काय मनात घेतले आहेस. जर तू मला रणांगणात काय घडते ते सांगितले नाहीस तर मला कळणार तरी कसे की ‘माझे’ आणि ‘पांडूचे’ रणात काय करीत आहेत!

sarga 1

संजय म्हणाला – ठीक आहे. पण एकतर इहलोकी ‘रण’ नावाचा विवक्षित एरिया नसतो. अख्या उभ्या-आडव्या भारतदेशाचेच एक रणक्षेत्र झाले आहे. आता कितीही दृष्टी ‘दिव्य’ दिलीत तरी मी सर्व ठिकाणचे कथन कसे करणार. शिवाय इहलोकी ‘स्टिंग’ ऑपरेशन करणारी एक जमात मला चांगलीच स्पर्धा करणार अशी चिन्हे आहेत. त्यांच्याकडे बजेटही भरपूर आहे.

धृतराष्ट्र म्हणाले – हे संजय, तू बजेटचे कारण मला सांगू नकोस. माझ्या मेव्हण्याला, शकुनीला, सांगायचा अवकाश तुला हव्या तेवढ्या सुवर्ण-मुद्रा अलॉट होतील. (“बापाची पेंड!” संजय मनात उद्गारला…”इथे उचापती करण्यापेक्षा कंधार नरेशांनी आपल्या देशाकडे लक्ष दिले असते तर तिथे तालिबानी कशाला घुसले असते?” पण राजापुढे हे बोलण्यात अर्थ नसल्यामुळे त्याने मौनाचा सुज्ञ-मार्ग पत्करला).

संजय म्हणाला – ते ठीक आहे महाराज. पण नव्या तंत्राचा तुम्हाला परिचय झाल्याशिवाय तुम्ही तुमचा हेका (आणि माझा नाद!) सोडणार नाहीत. मी तुम्हाला एक ‘चर्चासत्र’ दाखवणार आहे. त्या चर्चासत्रात देशभर असलेले विद्वान आपापल्या ठिकाणाहून चर्चेत भाग घेणार आहेत.

धृतराष्ट्र म्हणाले – हे संजय, ‘आपल्या’ जुन्या महाभारतात सर्पसत्र झाले होते ज्यात सर्व सर्पांचा विनाश झाला होता. इहलोकी चर्चासत्र चर्चेचा विनाश करण्यासाठीच योजतात का? महाराजांच्या ह्या थेट प्रश्नाने संजय चांगलाच दचकला आणि सावरून आपल्या दिव्य-दृष्टीने महाराजांसमोर टीव्ही चर्चांचा सीन उभा करू लागला.

संजय म्हणाला…”हे महाराज, एकमेकांवर आरडाओरडा करून, चर्चा चालवणाऱ्यावर आणि परस्परांवर हेत्वारोप करताना पाहिल्यावर जरी तसे वाटत असले की हे सारे चर्चेच्या – संवादाच्या विनाशासाठी चालले आहे तरी तसे ते नाही. चर्चासत्र हे ‘रण’ सुरु होण्यापूर्वीचे सर्वसंमत आन्हिक झाले आहे. ही लोकशाही आहे आणि इथे प्रत्येकाच्या म्हणण्याला महत्व आहे असे म्हणण्याचा प्रघात आहे. प्रत्येकाच्या समोर एका छोट्या आणि काळ्या गदेसारखी दिसणारी वस्तू हे ‘संहाराचे’ शस्त्र नसून ते माईक नावाचे ‘संवादाचे’ आयुध आहे. ज्या योगे चर्चा करणाऱ्याचा आवाज पूर्ण भारतभूमीवर पसरत आहे.

धृतराष्ट्र म्हणाले – हे संजय, तू म्हणतोस ते खरे असेलही पण मला तर अधूनमधून द्वंद्व-युद्धासाठी , गदायुद्धासाठी एकमेकांना आव्हान द्यावे असे शब्द कानावर येत आहेत. शिवाय मघाशी आपल्या विजयाची ग्वाही देणाऱ्याचे भाषण झाल्याझाल्या कोणीतरी स्नानाची चर्चा सुरु केल्याचे आणि वाहत्या पाण्याचा आवाज आल्यासारखे वाटले ते कशामुळे?  की माझी काही ऐकण्यात चूक झाली.

संजय म्हणाला –  नाही महाराज आपली चूक कशी होईल? आपण तर महाराज! (दृष्टी गेलेय, पण म्हाताऱ्याचे कान तिखट आहेत!) मीच सांगण्याकडे दुर्लक्ष्य केले. अशा चर्चांचा खर्च वसूल करण्यासाठी स्नानाच्या साबणाची जाहिरात लागली होती महाराज. मी अनवधानाने माझ्या ‘दिव्य दृष्टीचा’ ब्लू टूथ बंद करायला विसरलो. क्षमा असावी.

धृतराष्ट्र म्हणाले – पण आता चर्चासत्र संपल्या-संपल्या युद्धाला प्रारंभ होणार का? मघाशी चिन्हे तर तशीच दिसत होती.

संजय म्हणाला – प्रत्यक्ष युद्ध आरंभ होण्यास अजून अवकाश आहे महाराज. आज तर केवळ पहिला ‘शंखध्वनी’ झाला आहे. नऊ चरणात रण होणार आहे इतके सांगण्यापुरता. अजून सेना समोरासमोर यायला बराच अवकाश आहे. आपल्या सेनेत कोण – समोर कोण हेही अजून स्पष्ट व्हायचे आहे. काही वर्षांपूर्वी ‘आपले’ असणारे, ‘बंधू’ असणारे,  ‘गुरुजन’ असणारे लढण्यासाठी ‘समोरासमोर’ येण्याची परंपरा गेली पाच सहस्र वर्षे कायम आहे महाराज.

…‘तेव्हा’ पहिल्या अध्यायात अर्जुनाला विषाद झाला होता. आज धृतराष्ट्र महाराज विषादाने मान हलवू लागले आणि त्यांचे लक्ष नाही हे लक्षात येताच संजय ऑस्कर प्राप्त ‘थ्री.डी.- ग्रॅव्हिटी’ कुठे लागलाय ते पेपरात शोधू लागला.
.

चित्र साभार – खलील खान

(प्रथम प्रसिद्धी: विवेक साप्ताहिक, मार्च २०१४. )

This entry was posted in विनोदी/ उपरोधिक and tagged , , , , . Bookmark the permalink.

6 Responses to राउंड द विकेट: महा ‘भारत’ आणि एकोणिसावा अध्याय – सर्ग १

 1. pradnya ranshinge म्हणतो आहे:

  Good Bowling,
  Keep going round the wicket!!

 2. Sadhana Sathaye म्हणतो आहे:

  Khup mast ani crisp lihila ahe.

 3. Hemant Lele म्हणतो आहे:

  माईक ला गदा म्हणून योग्य संबोधन देणारे तुम्हीच. नाहीतरी अनेक विधानसभांमध्ये माईकचा गदा म्हणून वापर झालेला प्रत्यक्ष बघितला आहेच कि आपण.

  • sharadmani म्हणतो आहे:

   हा हा हा. खरंच आहे हेमंत. चार दशकापूर्वी जांबुवंतराव धोटे यांनी महाराष्ट्रात पेपरवेट चा ही उपयोग करून पहिला होता !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s