राउंड द विकेट: इंग्रजी – महाराष्ट्रातील एक बोलीभाषा…२

हाफ रिटन् ते मिसकॉल
.
RTW logo

महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा आहेत. त्यातील इंग्रजी ही लेटेस्ट बोलीभाषा. बोलीभाषा अशासाठी, की पाठयपुस्तकातून, अभ्यासक्रमातून, कॉलेज-युनिव्हर्सिटीमधून अभ्यासली जाणारी इंग्लिश वेगळी. तिचा आणि ह्या बोली-इंग्रजीचा काहीही संबंध नाही. ज्ञान हा जर त्या इंग्लिशचा पाया असेल, तर ‘आत्मविश्वास’ बोली-इंग्रजीचा पाया आहे. परिसरातल्या इंग्रजी शिकलेल्या लोकांकडून साहचर्यभावाने जनसामान्यांनी काही ‘इंग्लिश’ स्वीकारले आणि मराठी मातीतील अस्सल तडका मारून, महाराष्ट्रानुकूल करून आत्मसात करीत नव्या इंग्रजी बोलीला जन्म दिला.
.

जशीजशी नवी उत्पादने, नव्या सेवा आणि सुखसोयी स्थिरस्थावर होऊ लागल्या, तसेतसे त्यांच्याशी संबंधित इंग्रजी शब्दांनी लोकांच्या बोलीभाषेत जम बसवला. त्यातील काही वेचक शब्द त्यांच्या ‘प्रभावळी’सकट देतो आहे.
.

हाफ-रिटन् : जसा लिहिला आहे, तसाच उच्चार अपेक्षित आहे. शेवटचा ‘न’ अर्धा…पाय मोडलेला आहे, हे लक्षात घ्यावे. रिक्षावाल्यांनी मोठया आत्मविश्वासाने रूढ केलेला हा शब्द आहे. असा कुठलाही शब्द ‘राणी’च्या इंग्लिशमध्ये नाही. म्हणजे ‘हाफ’ आहे आणि ‘रिटर्न’देखील आहे. पण ‘हाफ-रिटन्’ नाही. व्यवहारात त्याचा अर्थ दीडपट भाडे इतकाच आहे. त्या शब्दाच्या उगमामागील लॉजिक असे की, लांबचे ‘भाडे’ घेतल्यानंतर परतताना रिकामे परतायला लागण्याची शक्यता असते, म्हणून नेहमीपेक्षा दीडपट भाडे आकारण्याचा प्रघात पडला आणि कोणीतरी त्याचे ‘हाफ-रिटन्’ असे नामकरण केले.
.

मोटर : हा शब्द स्त्रीलिंगी मानला जातो. खरे तर पाणी उपसणारा पंप फिरवण्यासाठी म्हणून इलेक्ट्रिक मोटर लावली जाते. पण बोलीभाषेत ‘पंप’ लावला ह्या अर्थी ‘मोटर’ लावली, असे बोलले जाते. कदाचित इलेक्ट्रिक बिल ‘येतं’ किंवा ‘चुकवलं जातं’ किंवा ‘माफ होतं’ किंवा ‘कापलं जातं’ ते मोटरचे. त्यामुळे उल्लेख, चर्चा घडतात त्या मोटरच्या; पंपाबद्दल कोण बोलतोय? काम एक जण करतो आणि नाव दुसऱ्याचे होते, हे ‘आपल्याकडे’ दिसणारे चित्र पंप-मोटरच्या बाबतीत शंभर टक्के लागू होते.
.Miss-Call

टॉवर : महाराष्ट्रात जसा जसा सेलफोनचा किंवा मोबाईलचा वापर वाढत गेला, तसेतसे त्या संबंधित अनेक शब्द बोलीभाषेत आले. आले ते भाषांतर करून आले नाहीत… तसेच आले, पण काही वेषांतर करून आले, तर काही अर्थांतर करून. उदा., टॉवर हाच शब्द. टॉवरचा जो रूढ अर्थ आहे, तो विसरून जा. बोलीभाषेतील टॉवरचा अर्थ आहे मोबाईल कंपनीच्या ‘नेटवर्कची रेंज’. उदा., ‘काल तुझा फोन बंद होता का?’ ह्या प्रश्नाला ‘फोन चालू होता यार, पण वर्गात/ऑॅफिसमध्ये/घरात ‘टॉवर’ मिळत नव्हता’ किंवा ‘बेसमेंटमध्ये ‘टॉवर’ मिळत नाही, तू आपला एस.एम.एस. कर.’ टॉवरच्या पाठोपाठ भाषेत, खरे तर सर्वच भारतीय बोलीभाषांत घुसलेला शब्द म्हणजे ‘मिसकॉल’.
.

मिसकॉल : ह्या शब्दाबद्दल खुलासेवार सांगण्यात काहीच हशील नाही. सांगायचे इतकेच की दोन इंग्रजी शब्दाचा संधी करून हा शब्द भारतात जन्माला आहे. करणे/देणे/मारणे अशी क्रियापदे ह्या ‘नामा’च्या पुढे वापरली जातात. लोकांनी केवळ शब्दच नव्हे, तर ‘मिसकॉल’चा विविध उपयोग करून घेतला… पण त्याबद्दल नंतर कधीतरी.
.

भाषा हे लोकव्यवहाराचे माध्यम आहे. लोक जशी जशी नवी उत्पादने वापरतात, नव्या नव्या प्रक्रिया शोधून काढतात वा त्या प्रक्रियांचा भाग होतात, तसे तसे नवे शब्द, नव्या भाषेतले शब्द त्यांच्या बोलीभाषेचा भाग बनत जातात. कधीतरी आपल्या बोलण्यात ‘टेबल’ आले, ‘सिनेमा’ आला, ‘वोटिंग’ आले आणि कळत-नकळत लोकव्यवहाराचा अविभाज्य भाग बनून गेले. तसे बनता बनता ते परभाषेतील सारे शब्द इथल्या मातीचा सुगंध आणि इथल्या माणसांचा इरसालपणा घेऊन असे काही ‘घडले’ आणि आपल्या तोंडात कधी ‘फिट’ बसले, कळलेच नाही…
.

– मणिंदर

(प्रथम प्रसिद्धी: साप्ताहिक विवेक, २० ऑक्टोबर २०१३)

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

2 Responses to राउंड द विकेट: इंग्रजी – महाराष्ट्रातील एक बोलीभाषा…२

  1. sharad chavan म्हणतो आहे:

    chhan aahe peksha short cut madhe g..o..o..d bare vatate.. ani ati uttam peksha simply great word tar chapkal basto

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s