अटलजी
तुम्हाला सर्वात पहिल्यांदा केव्हा पहिले
ते आज आठवत नाही.
एकदा, माझ्या वृद्ध आजोबांनी
ऋग्वेदातल्या अग्निसूक्तातील
काही ओळींचा अर्थं सांगितला होता समजावून
“अप्रमादयुक्त कवी…
कवीचे चातुर्य आहे ज्याच्या अंगामध्ये
जो आहे सत्याने जाणारा…
सुंदर…उदंड कीर्ति धारण करणारा…
हा धर्मोपदेशक आम्हाप्रत
सर्वं दैवी शक्तींना घेऊन येवो”
तेव्हा मात्र मला तुमचीच आठवण आली.
काल रात्री तुमच्याच कविता वाचत
खूप उशिरापर्यंत जागलो होतो.
…तुम्हाला पहिल्यांदा केव्हा पाहिले
ते मात्र आठवत नाही.
.
.
एकदा…अंधुकसे आठवते…
मी अर्ध्या चड्डीवर…
छातीला ‘दीपकाचा’ बिल्ला लावून पाणी वाटत होतो
अन् कफ परेड वरून चालला होता तुमचा जयघोष…
हजारो आत्मविश्वासपूर्ण घोषणा
एका उघड्या जीपमधून
तुम्ही मात्र स्थितप्रज्ञासारखे निघून गेलात
तुमच्या जयघोषाला सहजपणे मागे ठेवून…
(…आणि हे ही आठवते…
त्या गडबडीत माझ्या बाबांनी खाऊकरता दिलेले आठ आणे
पाणी वाटता वाटता माझ्याच उंचीच्या पाण्याच्या पिंपात पडले होते)
असेच एकदा…
आणीबाणी मध्ये…एका लेंगावाल्या माणसाला
आईने दिले होते पदरा मध्ये बांधलेले पन्नास रुपये
काहीही न बोलता.
त्याने दिलेल्या पत्रकावर होता
तुमचाच एक दिलखुलास फोटो.
तेच जीपवरल्या सारखे मंद हास्य.
मला तो फोटो हवा होता वहीवर चिकटवण्यासाठी.
आईने लगबगीने ओढून घेतले ते पत्रक
अन् पाणी तापवण्याच्या बंबात टाकून दिले…
आणि ही गोष्ट मात्र तशी माझ्या तरुणपणीची.
मी कॉलेजमध्ये होतो.
क्रिकेट टेस्ट सुरू नव्हती;
तरी होता आमच्या हातात ट्रान्झीस्टर
अन् ऐकत होतो रात्रभर जागून निवडणुकांचे निकाल.
जेव्हा प्रचंड मतांनी तुम्ही जिंकल्याचे कळले तेव्हा
सर्वांना कटिंग चहा पाजला होता स्टेशनवर.
दुसऱ्याच दिवशी तुमचा फोटो होता पेपरमध्ये
पुन्हा तेच हास्य…

त्यानंतरची
आठवते आहे तुमची प्रत्येक जाहीर सभा.
ज्यामधून तुम्ही मोठ्या आत्मविश्वासाने ओतायचात
समोरच्या श्रोत्यांमध्ये एक दैवी चैतन्य…
हशा…टाळ्या…हे तर अगदी हुकमी…
…कधीकधी कातरही व्हायचा तुमचा हळवा स्वर.
अन् व्याकूळ व्हायचात सभोवतालच्या गंभीर स्थितीने.
आठवते
सागरकिनारी…विशाल जनसागरापुढे
तुमचे प्रभावी…प्रवाही काव्यवाचन
‘ हिंदू तनमन’…किंवा ‘हृदय चाहिये’च्या शब्द लहरींना पाहून
सागरही अवाक व्हायचा तेव्हा
अंगावर उभा राहिलेला काटा आजही आठवतोय.
.
.
.

अटलजी,
तुमची प्रत्येक आठवण शीतल झुळूक वाटते शरदातली
तुम्ही मिळवली एक नि:संदिग्ध लोकप्रियता
पण त्याकरिता नाही घेतल्यात चुकूनही
जाती-पातीच्या कुबड्या…
किंवा भाषांच्या प्रेमा-द्वेषाचे पांगुळगाडे
नाही कधी केल्यात जाहीर चित्र-विचित्र मर्कटचेष्टा
नाही केली कधी भारतयात्रा…लॉंगमार्च…
असल्या बेगडात गुंडाळलेली आडमाप तंगडतोड.
तरिही जमवलात तुमच्या आठवणीने हुरळून जाणारा…
प्रेरित होणारा…सद्गदित होणारा…
मनमोकळा हसणारा…डोळे पानावणारा…
अन् ‘साला अटलजीका जवाब नही’ असे म्हणणारा…
उदंड लोकसंग्रह.
राजकारणात पूर्ण बुडूनही
कसे राहिलात कमलपत्रागत नामानिराळे
ह्या राजनीतीच्या जंगलात तुमच्या काळजाचा
प्रत्येक ठोका अजून जिवंत आहे ह्याचे आश्चर्य वाटते.
कसे मिळवले लोकांचे प्रेम असे हजारोंच्या हिशेबात?
…भारतीय राजकारण्यांना हसणाऱ्यांचा…मुरकणाऱ्यांचा…
टाळ्या हाणणाऱ्यांचा…नाही पडला कधी तुटवडा.
पण आत्यंतिक प्रेमापोटी तुमच्यावर हक्काने रागावणारा
गोतावळा तुम्हाला लाभला हे तुमचे भाग्य…अन् आमचेही.
आठवते…
“काही म्हणा पण अटलजींचे हे चुकलेच…”
किंवा
“आता काही सुद्धा बोलू नकोस बीजेपी बद्दल…”
असे वेळी-अवेळी म्हणणाऱ्या
सत्तरीच्या आजोबांना विचारले होते मी एकदा
“आजोबा, एवढे कावता…त्रागा करता…
…अविश्वासही दाखवता कधीमधी
पण दर निवडणुकीला श्रद्धेने जायचात
आणि उठवायचात शिक्का दिपकावर
…अन् आता कमळावर……हे असे कसे?”
तेव्हा गळा दाटून आला त्यांचा
अन् मोतीबिंदू झालेल्या डोळ्यात तरळली
आणखी दोन मोत्ये…
ती टिपत म्हणाले आजोबा एवढेच…
“अरे पोटचा गोळा आहे काही झाले तरी…”
अटलजी
हळूहळू लोकांना कळू लागल्या
राजबिंड्या राजपुरुषांच्या आणि राजकुलांच्या मर्यादा…
हळूहळू समजत गेले आहे आपले भलेबुरे लोकांना.
ठिकठिकाणच्या निराशा आणि असहाय्यता
उभी करीत आहेत मोठी मोठी प्रश्नचिन्हे.
अचानक लुप्त झालेल्या विकास प्रवाहांच्या बाबत
लोक नशिबाला सोडून निवडून आलेल्यांना विचारत आहेत जाब.
ह्या बदलत्या वास्तवात
दीनदयाळांच्या प्रेरणा अंगी बाळगणारा
तुमचा हा गोतावळा.
क्रमाक्रमाने होणार आहे यशस्वी
याबद्दल पुसटही शंका नाही माझ्या मनात.
मात्र तोपर्यंत
निर्भीडपणे उभे ठाकण्याची शक्ती आम्हास मिळो.
हीच प्रार्थना ईश्वरचरणी
तुमच्या नव्वदाव्या जन्मदिवसा निमित्ताने.
-शरदमणी मराठे
sharadmani@gmail.com