
आर.के. लक्ष्मण गेले. तब्बल पाच दशकांहून अधिक काळ चाललेले खुसखुशीत, नर्मविनोदी तर कधी सडेतोड असे सचित्र उपहासपर्व संपले. रोज सकाळी टाइम्स उघडताच कधी मथळयावर नजर टाकल्यानंतर, तर कधी त्याहीपूर्वी ‘यू सेड इट’ शीर्षक असलेल्या व्यंगचित्राकडे नजर वळली नाही असे व्हायचे नाही. राजकीय, सामाजिक, प्रशासनसंबंधी अशा अनेक विषयांबद्दल आपल्या मनात असलेल्या भावनांनाच स्वत:च्या खास शैलीत अभिव्यक्त करीत मिश्कील टिप्पणीची सिक्सर मारणारे ते व्यंगचित्र आणि त्यातील चकित, अचंबित, दिग्मूढ भाव चेहऱ्यावर दर्शवणारा ‘कॉमन मॅन’ पाहिल्याशिवाय सहसा दिवस सुरू व्हायचा नाही. रविवारी अग्रलेखाला सुट्टी असायची, पण ‘लक्ष्मण’ला नाही! राज कपूर, लता, आशा, सुनील या भारतीय आयकॉन्सना लोकप्रेमापोटी ‘एकेरी’ संबोधनाचे भाग्य लाभले, तसेच ते आर.के. लक्ष्मण यांनाही लाभले. गम्मत म्हणजे सत्तरच्या दशकात दूरदर्शन आल्यानंतर सुरुवातीला उल्लेख केलेल्या नामवंतांचे अनौपचारिक दर्शन टीव्हीद्वारे लोकांना होत होते. लक्ष्मण सहसा कोणाला दिसले नाहीत. कुठल्याही परिसंवादात, चर्चासत्रात, वृत्तवाहिन्यांवर ते त्यांची ‘बहुमोल’ वगैरे प्रतिक्रिया देताना दिसले नाहीत. दिसत राहिली ती त्यांची व्यंगचित्रे. अशा चेहराहीन माणसाला लोकांचे प्रेम लाभले हेही विलक्षणच मानले पाहिजे.
‘टाइम्स’ ह्या नावालाच एक वलय होते. बेहराम काँट्रॅक्टर नावाचे एक ख्यातनाम स्तंभलेखक लिहायचे की ‘एकेकाळी वृत्तसृष्टीशी संबंधित लोकांना टाइम्सच्या संपादकांप्रमाणेच त्या इमारतीतील लिफ्टमनचेही नाव माहीत असायचे.’ मला आठवते की अभाविपचे काम करत असताना रात्री-बेरात्री दादर स्टेशनवर चहा पिताना अकस्मातपणे नितीन वैद्य किंवा अंबरीश मिश्र हे टाइम्सचे तरुण पत्रकार भेटले की आनंद वाटायचा. त्या रात्री ते गप्पांचा मध्यबिंदू असायचे. कधी प्रेसनोट वाटायला गेल्यावर तळवलकर किंवा दिवि गोखले दिसले की दैवत दिसल्यासारखा आनंद व्हायचा. ‘लक्ष्मण’ कधीच दिसायचे नाहीत. त्या वेळी टाइम्सचा प्रिंटिंग प्रेस तिथेच बोरीबंदरच्या इमारतीत होता, नंतर तो कांदिवलीला हलवला. प्रेसमध्ये एक लायनो ऑॅपरेटर माझ्या परिचयाचा होता. त्याला मी एकदा कुतूहलाने विचारले, ”तुला दिसत असतील ना आर.के. लक्ष्मण कधीतरी? कसे आहेत?” त्याने शांतपणे सांगितले, ”हो, दिसतात ना. त्यांना केबिन आहे. एखादे चित्र काढल्यावर त्यांना फारसे काम नसते. नुसते वाचत बसलेले असतात!”

व्यंगचित्रकार लोकांची आपली आपली एक शैली असते. मारिओ मिरांडासारखा व्यंगचित्रकार चित्र-विषयाच्या आसपास असणाऱ्या परिसराचे बारीकसारीक तपशील आपल्यासमोर उभे करतो. आर.के. लक्ष्मण यांच्या शैलीत असे तपशील सहसा नसायचे. कमीतकमी रेखाटनांच्या मदतीने उपहासाचा मुद्दा अधोरेखित होत असे आणि कायमचा मनावर ठसत असे. मला आठवते – एका चित्रात इमारतीच्या बाहेरच्या भिंतीवर चिकटवलेले पोस्टर्सचे थर खरवडून काढणाऱ्या कर्मचाऱ्याला तेथील रहिवासी टेकू दिलेल्या बाल्कनीतून ओरडून सांगतो, ‘अहो, अशी पोस्टर्स काढू नका, आमची इमारत मोडकळीला आली आहे ती पडून जायची!’ दूरदर्शनवर फक्त संध्याकाळी कार्यक्रम असायचे. नंतर कधीतरी ते सकाळी ‘ब्रेकफास्ट टीव्ही’ ह्या नावाने सुरू झाले. लगेचच लक्ष्मणचे चित्र आले. चाळीवजा सामान्य घरात, टीव्हीसमोर अर्ध्या विजारीत बसलेला छोटा मुलगा निरागसपणे वडलांना विचारतो आहे, ‘बाबा, ब्रेकफास्ट म्हणजे काय?’ टीव्ही माहीत आहे पण ब्रेकफास्ट माहीत नाही, ह्या सामाजिक स्थितीवर ह्याहून नेमके भाष्य अजून काय असू शकेल?
राजकारण, राजकारणी आणि राजकीय वर्तन हे तर लक्ष्मण यांच्या चित्रांचे लोकप्रिय विषय. लक्ष्मण तसे गुणवान आणि बहुप्रसवा कलावंत होतेच, पण राजकारणी मंडळींनीही त्यांना विषयांची कमतरता पडू दिली नाही. राजकारणी मंडळींनी आपल्या वक्तव्यातून वा वर्तनातून एखादा ‘लूज बॉल’ टाकावा की दुसऱ्या दिवशी लक्ष्मण यांचा सणसणीत षटकार ठरलेलाच. एखाद्या चित्रात गांधीजींच्या तसबिरीला माला अर्पण करताना चित्राच्या तळाशी कोणाची तसबीर आहे हे नाव वाचण्याचा प्रयत्न करणारे एक नेताजी, तर ‘गांधीजी… सर’ असे सांगून त्यांना ‘मदत’ करणारा त्यांचा मख्ख स्वीय साहाय्यक. फूटपाथवर वसतीला असणाऱ्या कुटुंबाने आडोशासाठी तिरक्या बांधलेल्या ताडपत्रीवर ‘पाहा नव्या युगाची पहाट’ अशा शीर्षकाचे, बजेट नावाच्या सूर्याचा उदय दाखवणारे ‘रम्य’ चित्र चितारणारा (बहुधा) शहाजोग अर्थमंत्री, किंवा ‘विरोधकांनी लोकांना तुमच्याकडे पाणी नाही, अन्न नाही, नोकऱ्या नाहीत हे सांगून गडबड केली आहे सर, त्याआधीपर्यंत हे गावकरी सुखात होते’ असे कोडगेपणाने मंत्री ‘सरांना’ सांगणारा अधिकारी असे कितीतरी बारकावे सांगता येतील. ती व्यंगचित्रे पाहीपर्यंत हे व्यंगचित्राचे विषय असू शकतात ह्याची कोणी कल्पनाही केली नसेल. बहुधा त्यामुळेच असेल, ज्या वेळी लक्ष्मण यांना पहिला मोठा पुरस्कार मिळाला (बहुधा मॅगसेसे असावा), तेव्हा चित्रकार-व्यंगचित्रकार श्याम जोशी यांनी एक मस्त कार्टून काढले होते. सर्व राजकारणी लक्ष्मण यांच्या दारात येऊ न उभे आहेत आणि कोणीतरी लक्ष्मण यांना सांगते आहे, ‘हे सर्व जण तुमच्याकडे रॉयल्टी मागण्यासाठी जमले आहेत.’
लक्ष्मणच्या व्यंगचित्रात स्थान मिळणे हा राजकारण्यांसाठी सन्मान असायचा. अल्प कारकिर्द असणारे देवेगौडा, 1977च्या निवडणुकीत इंदिरा गांधींना रायबरेली येथे पराभूत करणारे जायंट किलर राजनारायण – ज्यांची त्यानंतरची कारकिर्द अत्यल्प आणि सामान्य राहिली, तेही अनेकदा लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांचे नायक-सहनायक राहिले आहेत. राजनारायण यांचे नाव काढल्याक्षणी त्यांच्या फोटोतील चेहऱ्यापेक्षा लक्ष्मणने काढलेलाच चेहरा डोळयासमोर येतो. जागावाटपासाठी ‘मातोश्री’वर गेलेल्या प्रमोद महाजनांना ‘हॅव अ सीट’ असे म्हणणारे, पण प्रत्यक्षात समोरच्या खुर्चीवर पाय लांब करून बसलेले बाळासाहेब ठाकरे, ‘होम कमिंग’ म्हणत 10 जनपथच्या बाहेर इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश मिळविण्याच्या इराद्याने गाठोडे घेऊ न ताटकळत उभे राहिलेले, त्यांच्या आजूबाजूला कोळीष्टके लागली आहेत असे यशवंतराव चव्हाण किंवा 77च्या पराभवानंतर पुन्हा स्वत:ला राजकारणात प्रस्थापित केल्यानंतरची निवडणूक ‘स्वीप’ केलेल्या इंदिरा गांधी आणि त्यांच्या शेजारच्या टोपलीत त्यांनी ‘स्वीप’ केलेले विरोधक अशी कितीतरी चित्रे कायमची स्मरणात राहिली आहेत. गंमत म्हणजे गांधीजींच्या मृत्यूनंतर लक्ष्मण यांची सगळी कारकिर्द आहे. पण तरीही तसबिरीतून, पुतळयातून दिसणारे, डोकावणारे, चकित होणारे तर कधी आकाशातून ‘खाली’ आपला देश पाहून व्यथित झालेले गांधीजी आपल्याला लक्ष्मण यांच्या चित्रातून भेटतच राहतात.
लक्ष्मण यांनी दीर्घकाळ टाइम्ससाठीच काम केले. टाइम्सला अनेकदा ‘सत्ताधारी पक्षाचे मुखपत्र’, ‘यथास्थितीवादी’, ‘भांडवलशाहीचे पाठीराखे’ आदी विविध दूषणे/विशेषणे मिळत राहिली. लक्ष्मण यांच्यापर्यंत ती दूषणे पोहोचली नाहीत हे विशेष. टाइम्सने अनेकदा विविध प्रश्नांवर, राज्यकर्त्यांबद्दल मिळमिळीत भूमिका घेतली. त्या सर्वांची कसर लक्ष्मण यांनी भरून काढली आणि जनतेच्या व्यथा, राग, स्पष्ट मते व्यंगचित्रातून व्यक्त केली. एका अर्थाने ते लक्ष्मण यांनी चितारलेले अल्प शब्दांचे अग्रलेखच ठरले. ते सामाजिक, राजकीय टीकाकार होते. ‘मी जागा आहे आणि मी तुमच्याबरोबर आहे’ हे आश्वासन त्यांनी लोकांना न बोलता दिले. व्यंगावर प्रहार करण्याचे त्यांचे व्रत होते. आणि हे व्रत आयुष्यभर सचोटीने पार पाडण्यासाठी लागणारी व्रतस्थ अलिप्तता त्यांनी जन्मभर पाळली, हे त्यांचे विशेष. लक्ष्मण गेले. आपल्यामधला काळाचा एक ‘अंश’ कायमचा नाहीसा झाला. त्या अर्थाने ही भरून न येणारी पोकळी आहे.
-शरदमणी मराठे
(प्रथम प्रसिद्धी – विवेक साप्ताहिक, फेब्रुवारी २०१५)
मस्त आठवणी जागवल्या
धन्यवाद गीताताई!