२०१६ च्या होळनिमित्ताने लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीतील काही विडंबन कविता छापण्यात होत्या. त्यात माझी ही कविताही होती.
(मूळ कविता – ‘दातापासून दाताकडे’, कवी- विंदा करंदीकर)
कपापासून कपाकडे
तुझी माझी धाव आहे
कपापासून कपाकडे
धुता धुता कपावरील
एक कपची उडली होती
रंगवलेली फिक्कट बशी
तेव्हाच मला हसली होती
तू म्हणालास :
‘‘मधुमेहाच्या रोग्या तुला
हा चहा झेपेल काय?’’
मी म्हणालो :
‘‘चहाशिवाय राहायचे तर
जगून तरी फायदा काय?’’
तो म्हणाला :
‘‘चहा प्या- नका पिऊ
मरण कधी चुकेल काय?’’
चहावाचून तुझे अडे
चहावाचून माझे अडे
तुझी माझी धाव आहे
कपापासून कपाकडे.
रेल्वे स्टेशनवरचा चहा
पूर्वी होता तसा आहे
पाच रुपयांत कप भरणे
हाच त्यांचा वसा आहे
तू म्हणालास :
‘‘चहा गाळायच्या फडक्याला
पाणी कधी लागेल काय?’’
मी म्हणालो :
‘‘अस्वच्छता रक्तात भिनली
फडके धुऊन भागेल काय?’’
तो म्हणाला :
‘‘पूर्वीपासून कपावरती
वाळलेलीच असते साय’’
पूर्वी झाले तेच घडे
बशीवरचे वाढले तडे
तुझी माझी धाव आहे
कपापासून कपाकडे.
.
बादलीभर गढूळ पाण्यात
कपबशी पडली आहे
स्वच्छतेची आशा तिने
फार पूर्वीच सोडली आहे
तू म्हणालास :
‘‘गल्ला पाहून मॅनेजरची
खळी थोडी खुलते आहे
मी म्हणालो :
‘‘पिचकी बशी कपाकडे
थोडी थोडी कलते आहे’’
तो म्हणाला :
‘‘काळी सोंडवाली किटली
चुलीपुढे झुलते आहे’’
कपामध्ये काय पडे
माशीचेच प्रेत सडे
तुझी माझी धाव आहे
कपापासून कपाकडे..
तुझा माझा प्रवास आहे
कपापासून कपाकडे.
.
स्वच्छ कप, गलिच्छ कप
ओशट कप, चिकट कप
काही उंच, काही बुटके
काही उजळ, काही विटके
काही कप कानतुटके
काहींवरती फुलेपाने
नक्षीमध्ये चांदी-सोने
तुझी माझी झेप पडे
कपापासून कपाकडे..
मला एक कळले आहे
अलमीनच्या चरवीत बसून
ताजे दूध पळाले आहे
तुझ्या-माझ्या कपामध्ये
पावडर मिल्क उरले आहे
स्वच्छतेचे लागले राडे
कपावरचे वाढले तडे
त्यात काय नवीन घडे
तुझी माझी धाव आहे
कपापासून कपाकडे..
– शरदमणी मराठे
ही कविता मी पूर्वी एका बैठकीत ऐकली होती
हो. खूपच पूर्वी लिहीली आहे. पण लोकसत्ता ने विडंबने मागितली तेव्हा २ वर्षांपूर्वी पाठवली व त्यांनी छापली.
Wa mastach. Is batpe ek chai to honi hi hai.
आनंदाने!
thanks. Shall meet over a cup of tea. Long time no see.
सर आपलं लिखाण वाचतो कायम चांगलं all article nice
धन्यवाद. जे आवडणार नाही ते देखील आवर्जून कळवा.