
भारतात इंटरनेट आले त्याला पुढल्या स्वातंत्र्यदिनी २५ वर्षे पूर्ण होतील. सुरुवातीला काहीशी महागडी असणारी इंटरनेट जोडणी मोठ्या कंपन्या, सरकार आणि समाजातील मोजके लब्ध-प्रतिष्ठित यांच्या प्रतिष्ठेचा भाग होती. पण वर्ष – दोन वर्षांतच इंटरनेट सेवा देणाऱ्या ‘विदेश संचार निगम’ने दर कमी केले आणि शहरी उच्च-मध्यमवर्गीय इंटरनेट वापरायला लागले. ज्यांनी लहानपणी आई-बाबांना इंटरनेट वापरताना बघितले आहे ती, तेव्हा ४-५ वर्षांची असणारी मुले आता टीनएज मध्ये आली आहेत. ज्यांनी त्यांच्या विशी-पंचविशीत इंटरनेट वापरायला सुरुवात केली ती पिढी आता चाळीशीमध्ये आली आहेत. त्यावेळी तिशी-पस्तिशीच्या व्यावसायिकांनी, ज्यांनी कम्प्युटरपूर्व काळात आपले व्यावसायिक आयुष्य सुरु केले होते आणि सुरुवातीला कम्प्युटरशी मग लगोलग इंटरनेटशीही आपल्या व्यावसायिक रुटीनची सांगड घातली होती, ते सर्व आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. ह्या सर्वांच्या रोजच्या आयुष्यात काय फरक आला आहे इंटरनेटने? त्यांच्या व्यावसायिक दिनचर्येवर, त्यांच्या वागण्यावर व परस्पर संबंधांवर काय परिणाम केला आहे इंटरनेटने? गेल्या पंचवीस वर्षात इंटरनेटचा वेग वाढला. म्हणजे सर्व प्रकारे वाढला. वापरणारे वाढले, डेटा ट्रान्स्फरचा व्हॉल्यूम वाढला, इंटरनेटवर काय काय करता येणार ह्याचे प्रकार वाढले, इंटरनेट वापरण्याची माध्यमे वाढली. इंटरनेट जोडणीचे दर मात्र झपाट्याने खाली आले. अन्न, वस्त्र, निवारा ह्या त्रयी नंतर रोज लागणारी वस्तू झाली इंटरनेट. तुम्ही हा लेख वाचाल तेव्हा भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ५० कोटींच्या आसपास पोचली असेल. ह्या साऱ्याचे सार्वत्रिक व खोलवर परिणाम व्यक्तींवर व समाज-मानसावर झाले आहेत त्यातील काहींचा मागोवा घेण्याचा ह्या लेखात प्रयत्न करणार आहे. हे करत असताना माझ्या मर्यादे बद्दल सुरुवातीसच लिहिले पाहिजे. हा मागोवा मी समाजशास्त्राचा अभ्यासक म्हणून घेत नसून ह्या पंचवीस वर्षांच्या प्रवासातील एक सहप्रवासी म्हणून घेणार आहे.

तसे पहिले तर इंटरनेट हे उत्पादकता व कार्यक्षमता वाढवणारे साधन आहे. अगदी सुरुवातीला केवळ ह्याच दृष्टीने इंटरनेटकडे पाहिले गेले. टंकित केलेला मजकूर आजवर टपालाने वा इंटरनेट आधीच्या दहा वर्षात फॅक्स मशीन वरून जात होता. फॅक्स पाठवताना आधी व नंतर अनुक्रमे “पाठवतोय” व “मिळाला का? नीट दिसतोय ना?” अशी फोना-फोनी नक्की व्हायची. अनेक कार्यालयात फॅक्स-मशीनसाठी स्वतंत्र म्हणजे ‘डेडिकेटेड’ फोनलाइन नसायची. मग फॅक्स-टोन मिळाल्यावर फॅक्समशीन सुरु करणे. उलटा फोन करून सॉरी म्हणणे व पुन्हा फॅक्स पाठवा असे सांगणे असेही प्रकार व्हायचे. पण टपालाने वा कुरियरने वेळ लागण्या पेक्षा हे देखील फारच सोयीचे वाटायचे. उद्योग धंद्यांना ह्याचा फायदा झाला. व्यावसायिक दळणवळण सोयीचे होऊ लागले. आपल्या कडे फॅक्समशीन आहे ही अभिमानाची गोष्ट वाटू लागली. इंटरनेट आल्यानंतर त्याच्याकडे मुख्यत: ह्याच दृष्टीने पाहिले आणि इंटरनेट म्हणजे इमेल असे समीकरण रूढ झाले. फॅक्स वर आलेला मजकूर पुन्हा वापरायचा असेल तर तो पुन्हा टाईप करावा लागे. ईमेलने त्या कटकटीतून सुटका झाली. ह्या सगळ्याचा उत्पादकतेवर व कार्यक्षमता वाढण्यावर परिणाम झालाच. भारतात पर्सनल कम्प्युटर व इंटरनेट ह्यांच्या आगमनात फार वर्षांचे अंतर नव्हते. त्यामुळे ७० – ८० च्या दशकां पर्यंत कॅल्क्यूलेटर पर्यंतच वा फार फार तर इलेक्ट्रॉनिक टाईपरायटर पर्यंत मर्यादित असलेल्या ऑफिस ऑटोमेशन च्या कल्पना ९० च्या दशकात झपाट्याने बदलून गेल्या. इंटरनेटमुळे ऑफिस ऑटोमेशनच्या नव्याने सुरु झालेल्या अध्यायाला दळणवळणाचे, कम्युनिकेशनचे परिणामकारक परिमाण मिळाले.

अर्थात ह्यामुळे सगळेच ‘वापरकर्ते’ (हल्लीचा जवळचा शब्द म्हणजे ‘युजर्स’) एकदम कार्यक्षम बनले असे झाले नाही. अशा साधनांच्या अभावामुळे एखाद्या दूरवर सुरु असलेल्या औद्योगिक – व्यावसायिक प्रकल्पात ‘पेपरवर्क’ नीट असणे ही पूर्वअट होती. इंजीनिअर वा तंत्रज्ञ अशा ठिकाणी जाताना असे सर्व पेपरवर्क पूर्ण असल्याशिवाय ऑफिस सोडत नसे. इंटरनेटमुळे ह्यात ढिलाई आली अशीही उदाहरणे आहेत. “तू पोच तर आधी साईटवर, आम्ही Detailed Drawings पाठवून देतोय तोपर्यंत” असे वायदे होऊ लागले. किंवा नंतर “पाठवले आहे; मिळाले कसे नाही?” “मेल आला/आली पण जोडलेली फाईल कुठेय?” वगैरे संवाद होऊ लागले. (अनुषंगाने सांगायचे तर मराठीत ‘ईमेल/ मेल’ हा द्विलिंगी शब्द आहे! लोक त्यासाठी आवडीनुसार लिंग वापरतात. मेल आला म्हणतात… मेल आली म्हणतात!) इमेल हातवळणी पडे पडे पर्यंत ‘हॉटमेल’ प्रचलनात आला. मग ऑफिसच्या ‘अधिकृत’ इमेल अकाउंट व्यतिरिक्त स्वत:चा असा ‘पर्सनल इमेल’ अस्तित्वात आला. कार्यालयात बसणारे देखील आजवर गप्पा-गॉसिप, चहा-पाणी, विडी-काडी वगैरेत विरंगुळा (हल्लीचा जवळचा शब्द म्हणजे ‘ब्रेक’) शोधत होते त्यांना पर्सनल इमेल नावाचे अजून एक साधन मिळाले. कम्प्युटर आल्यावर ‘सॉलीटेर’ वगैरे पत्त्यांचे खेळ वा ब्रिक्स नावाचा बॉलने विटा पाडण्याचा खेळ खेळणाऱ्या सर्वांना, इंटरनेटमुळे व पर्सनल इमेल मुळे, विरंगुळ्यासाठी ऑफिसच्या बाहेर बघण्याची ‘विंडो’ मिळाली. आणि विरंगुळा ग्लोबल होण्याला सुरुवात झाली.

साधारण तेव्हापासून ऑफिसचे सहकारी, कुटुंब, शेजारी-पाजारी आणि कधीतरी भेटणारे मित्रमंडळ ह्या व्यतिरिक्त जुजबी ओळखीच्या वा पूर्णत: अनोळखी व्यक्तींशी संवाद साधण्याचे साधन मिळाले. घरी पीसी असणाऱ्यांचा संध्याकाळचा / रात्रीचा काहीवेळ हा चॅट मध्ये जाऊ लागला. याहू वगैरे साईट वर ‘चॅट-रूम’ अस्तित्वात आल्या. समोर नसलेल्या, दिसत नसलेल्या, पण तरीही ‘उपलब्ध’ असलेल्या व्यक्तींशी गप्पा मारताना अधिक मोकळेपणा येऊ लागला. 🙂 किवा 😉 अशा खुणा स्मितहास्यासाठी, एक डोळा मिचकवण्यासाठी (ज्याला डोळा मारणेअसेही सोप्या मराठीत म्हणतात!) रूढ झाल्या. LOL किंवा ROFL वगैरे हास्याचे स्तर एकमेकांना सांगण्यास सुरुवात झाली. समोरा समोर बोलताना अंगवळणी पडलेल्या शिष्टाचारातून थोडी मोकळीक मिळू लागली, लोक घेऊ लागले. देशो-देशीच्या बातम्या, वर्तमानपत्रे, मासिके, विविध साईट्स वर मिळणारी व मती गुंगवून टाकणारी माहिती लोकांना उपलब्ध झाली. दुसरीकडे साधारण पणेआजवर टीव्हीवर घालवला जाणारा वेळ ‘नेट-वर’ जाऊ लागला हळू-हळू झोपेच्या वेळावरही नेट ने अतिक्रमण केले. घरात टीव्ही व्यतिरिक्त आणखी एक ‘स्क्रीन’ आला. घर मल्टिप्लेक्स व्हायला सुरुवात झाली. त्यातून तरुणांच्या झोपेचे तास कमी झाले. कुटुंब म्हणून, टीव्ही समोर का होईना, पण संध्याकाळचा काही काळ व रात्रीचे जेवण सर्वांचे एकत्र होत होते. ते कुटुंब घरातच विभागले गेले. नेट वापरणारे पीसी जवळ व बाकीचे टीव्ही समोर असे गट पडले. एकत्र १९९५ पूर्वीची घरोघर ठरलेली झोपण्याची वेळ २००० नंतर साधारणपणे एक तासाने पुढे गेली. घरी पीसी नसणारे लोक सायबर कॅफे नावाच्या ‘तासावर’ मिळणाऱ्या नेट सेवेकडे वळले. तिथे तर मोकळेपणाच मोकळेपणा मिळूलागला. त्यातून नेट येण्यापूर्वीच्या काळात ‘फक्तप्रौढांसाठी’ असलेला किंवा अश्लील असलेला कंटेंट, विद्यार्थी-तरुण मंडळीसाठी सहज मिळणारा नव्हता, तो कंटेंट देखील सहज आवाक्यात आला. सवय – चटक – व्यसन ह्या श्रेणीत त्याच्याही आहारी गेलेले तरुण दिसू लागले. नाक्यावर खटपटी लटपटी करत मिळणारे अश्लील साहित्य नेटवरून घरात येऊन बसले. १९६५ ते १९८५ ह्या दोन दशकात तंत्रज्ञानाने रोजच्या आयुष्यात जितका हस्तक्षेप केला असेल त्यापेक्षा कितीतरी पटीने, नुसता हस्तक्षेप नव्हे तर ढवळाढवळ देखील, १९८५ ते २००५ ह्या दोन दशकात झाली. पुढल्या शतकाने आपल्यासमोर एक व्यक्ती म्हणून, एक समाज म्हणून काय वाढून ठेवले आहे त्याची चुणूक मिळायला सुरुवात झाली.
१९९७ मध्ये गुगल सर्च इंजिन सुरु झाले. तशी आधी सर्च इंजिने होती. पण गुगल त्यांच्यापेक्षा कैकपटीने कार्यक्षम होते. अल्पावधीतच ‘गुगल’ हे सामान्य नाम बनले. आज गुगल वापरणाऱ्या शाळा कॉलेज च्या मुलांनी त्या आधीची सर्च इंजिन बघितलीही नसतील. त्यांच्यासाठी इंटरनेट वर शोध घेणे, ‘सर्च’ करणे ह्याचा समानार्थी शब्द ‘गुगल’ करणे असा झाला. तो जगभर इतका रूढ झाला की ‘सर्च करणे’ ‘शोध घेणे’ ह्या अर्थीचा एक शब्द म्हणून विविध भाषांतील शब्दकोशात सन्मानाने जाऊन बसला. अती शंका विचारणाऱ्याला “शक्य तितके समजावले आहे. उरलेले गुगल कर” असे सुनावले जाऊ लागले. गुगलच्या, शब्द आपणहून पूर्ण करण्याच्या सोयीवर विनोद होऊ लागले. ‘गुगल अगदी बायको किंवा गर्लफ्रेंड सारखे वागते’ असे म्हटले जाऊ लागले. म्हणता म्हणता गुगल हे इंटरनेट वापरणाऱ्या सर्वांसाठी अपरिहार्य होऊन बसले. भरपूर साठवणुकीची क्षमता असणारी ही पहिली इमेल प्रणाली ठरली. गुगल आपली सवय झाली. गुगल आपला सखा झाले. इंटरनेट सुरु आहे की नाही हे बघण्याची कसोटी होऊन बसले गुगल. तसे १९९७ मध्ये गुगल सर्च इंजिन सुरु झाले तरी गुगल कंपनीची मेल सर्व्हिस सुरु व्हायला नवे शतक उजाडले.

पीसी, इन्टरनेट च्या पाठोपाठच संगीतही डिजिटल झाले. तशी, गुंतागुंत होणाऱ्या कॅसेटची जागा सीडीने घेतली होती. पण सीडी वाजवायला लागणारा सीडी प्लेयर काही ‘पोर्टेबल’ म्हणता येईल असा झाला नव्हता. त्यामुळे कुठेकुठे ‘पोर्टेबल’ आहेत म्हणून कॅसेट वाजणारे ‘वॉकमन’ ऐकले जातच होते. पण संगीत डिजिटल झाल्यावर सगळेच बदलले. कॅसेट मधले एकच गाणे ‘काढून’ मित्राला पाठवणे अशक्य होतेच. पण गाणे असे सुटे सुटे होऊ शकते व ईमेलने जगात कोणालाही पाठवता येऊ शकते ह्याचा प्रत्यय आला. हे १९९९च्या सुमारास घडले. एम.पी.थ्री. नावाने लोकप्रिय झालेले ध्वनिमुद्रण तंत्रज्ञान प्रचलनात आले. लगोलग आयपॉड नावाचे पत्त्याच्या कॅट पेक्षाही छोटे उपकरण अॅपल कंपनीने आणले. ही अॅपलचा फोन येण्यापुर्वीची गोष्ट आहे. पाठोपाठ अन्य कंपन्यांनीही असे ‘इलेक्ट्रॉनिक डिजिटल म्युझिक प्लेअर्स’ बनवले. काही लोक त्यालाही ‘आयपॉड’च म्हणू लागले. (जसे कुठल्याही वनस्पती तुपाला लोक डालडा म्हणतात तसे!) तर काही जण त्याला नुसतेच MP3 म्हणू लागले! इन्टरनेट वरून मजकूर, फोटो वगरे बरोबर आता संगीतही पाठवले जाऊ लागले. एम.पी.थ्री. मुळे संगीताचे सार्वत्रीकरण झाले, जसे एकेकाळी रेडियोमुळे व नंतर ‘टू-इन-वन’ मुळे झाले होते. पण ह्यासार्वत्रिकीकरणाच्या बरोबरीने म्युझिक अधिक व्यक्तिगतही झाले. मोबाईलवर बोलण्यासाठी इयरफोन वापरत होतेच. तेच आता संगीत ऐकण्यासाठीही वापरले जाऊ लागले. जरी म्हणताना ‘म्युझिकच्या आवाजाचा कोणाला त्रास नको’ असे इयरफोन वापरणारा म्हणत असला तरी प्रत्यक्षात ‘इतरांचात्रास नको’ असाच दृष्टीकोन अधिक भासायचा. कानात इयरफोन असताना कोणी मारलेल्या हाकेला “काऽऽय?” असे त्रासिक उत्तर मिळू लागले. एक इयरफोन दोनजणांनी वाटून घ्यावा हे मैत्रीचे, प्रेमाचे लक्षण ठरले. इयरफोनचे एक बोंडूक एकाच्या एका कानात तर दुसरे बोंडूक दुसऱ्याच्या कानात अश्या अवतारात भावंडे, मित्र, मैत्रिणी, प्रेमिक आणि क्वचित पती-पत्नीही दिसू लागले. दुसरी कडे रॉक, पॉप आदि पाश्चात्य गाणी आणि सुरावटी समाजातील श्रीमंत घरातील मुलांसाठीच आहेत असे वाटायचे ते पाश्चात्य संगीत सर्वसामान्य तरुणांच्या टप्प्यात आले. संगीत सार्वत्रिक झाले. फोनच्या रिंग पासून ते कारच्या रिव्हर्स हॉर्न पर्यंत, डायलर टोन पासून फोन ‘होल्ड’वर ठेवल्या नंतर. संगीतच संगीत ऐकू येऊ लागले. त्याने मनोरंजनाच्या व नोकरी-धंद्यांच्या नवीन वाटा निर्माण झाल्या आणि टेलिफोन इंडस्ट्री ही ‘म्युझिक’ चा सर्वात मोठा ग्राहक होण्याच्या दिशेने वेगाने मार्गक्रमणा करू लागली. म्युझिक सार्वत्रिक झाले, तसे ते पर्सनलही झाले, युजर फ्रेंडली झाले,पोर्टेबल झाले, ग्लोबल झाले.

जरी दिवसेंदिवस हे घडत असताना इन्टरनेट जोडणीची व वापरणाऱ्या ‘डेटा’ची किंमत कमी होत होती. तरी इंटरनेटचा वापर एका जागेवर ठेवलेल्या फोन-जोडणी मधूनच होत होता. २००० दशक उजाडले ते तंत्रज्ञान,इंटरनेट व कम्युनिकेशन च्या क्षेत्रात झंझावात घेऊनच. म्युझिक बद्दल वर लिहिलेचआहे. पण लिखित मजकुरातही क्रांती झाली. २००० पूर्वी पर्यंत डेस्कटॉप पब्लिशर, वृत्तपत्रे-नियतकालिके काढणारे, प्रकाशन संस्थायांच्याकडेच देवनागरी व अन्य भारतीय भाषांचे टंक (Fonts) वापरले जात असत. सुरुवातीला काही कंपन्यांनी व मुख्य म्हणजे गुगलने देवनागरी वअन्य भारतीय भाषा इंटरनेट च्या माध्यमांतून घराघरातल्या पीसी वर पोहोचवल्या. इंग्रजी लिपीचा वापर करत लिहिलेले मराठी संवाद/ मजकूर मागे पडले आणि आपल्या भाषेत -आपल्या लिपीत लिहिलेले नेटवरून प्रसारित होऊ लागले. तो पर्यंत “आनंदमेळ्या नंतर भेटू” हे साधे वाक्य इंग्रजी टंकात लिहिल्यावर “आनंद मेल्यानंतर भेटू” असे अनर्थकारी पद्धतीने वाचले जाण्याची शक्यता होती. तो धोका संपला. लोक आपल्या भाषेत आणि आपल्या लिपीमध्ये लिहू लागले. वेब लॉग ह्या सुरुवातीच्या नावाने इंटरनेट युजर मध्ये सुरुझालेले लेखन म्हणता म्हणत ब्लॉग नावाच्या सुटसुटीत आणि नव्या शब्दात जगमान्य झाले.आपण लिहिलेले आपणच प्रसिद्ध करायचे आणि तेही तत्काळ! ह्या सोयीमुळे लिहिणारे वाढले. लिहिण्यात एक ताजेपणा व जिवंतपणा येऊ लागला. एकदा लिहा, तपासा, संपादित करा, पुन्हा मुद्रणप्रत बनवा हे कटकटीचे आणि कष्टप्रद टप्पे कमी झाले. अमुक शब्दांचे बंधन संपले. सचित्र मजकूर देणे अक्षरशः ‘क्लिक सरशी’ शक्य झाले. अनेक स्तंभलेखक व काही ‘वाचकांची पत्रे’ मध्ये नियमाने लिहिणारे एखादा मजकूर देण्यासाठी वृत्तपत्रात जाऊन-येऊनअसा २-३ तास प्रवास करून जायचे. ते कष्ट कमी झाले.

साधारण ह्याच्या समांतरपणे अनेक गोष्टी घडत गेल्या. सोशल मिडीयाचा उगम झाला. २००४ मध्ये अमेरिकेतील एका विद्यापीठा पुरते ‘प्रायोगिक’ स्तरावर सुरुझालेले फेसबुक म्हणता म्हणता जगभर पोहोचले. एका पाहणीमध्ये असे लक्षात आले की २००७मध्ये जगभरात इमेलवर पाठवलेल्या मजकुराला सोशल सोशल मीडियातून पाठवलेल्या मजकूराने मागे टाकले. त्याच सुमाराला जगभर, विशेषत: भारतात स्मार्टफोन च्या किमती मध्यमवर्गीय माणसांच्याआवाक्यात आल्या. पाठोपाठ WhatsApp नावाचे फोनवरील ‘चतुर’ मेसेजिंग टूल आले. २००० ते २०१० ह्या दशकापेक्षा पेक्षा २०१० नंतर ह्या घडामोडींनी वेग घेतला. आज फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, निरनिराळे ब्लॉग्स, वेब पेजेस अशी अगणित माध्यमे उपलब्ध झाली. इंटरनेट चे दर उत्तरोत्तर कमी होत होतेच. पोस्ट, कमेंट, शेअर, फॉरवर्ड, स्क्रीन शॉट, लाईक, स्माईली,ब्लॉक असे असंख्य शब्द बोलीभाषेत ठाण मांडून बसले. सोशल मिडिया आपल्या दैनंदिन वेळापत्रकाचा एक महत्वाचा भाग होऊन बसला.
ह्या सगळ्या वेगवान प्रवासानेआपल्या व्यक्तिगत आणि सामाजिक आयुष्यात बरीच उलथापालथ झाली आहे. हे मी काहीनकारात्मक दृष्टीने म्हणत नाही. साधारण १९९० पूर्वी जे मित्र नातेवाईक एकमेकांना नभेटल्याची तक्रार करत होते. म्हणायचे “किती दिवस झाले आपली भेट नाही” नव्याशतकाच्या सुरुवातीला तीच तक्रार “किती दिवस झाले तुझा फोन नाही” अशी होऊ लागली.सध्या ह्याच तक्रारी “तुझा मेसेजही नाही आणि मेसेजला रिप्लायही नाही” अशा येऊनठेपल्या आहेत. मी शाळेत असताना एखाद्या मित्राने विचारलेल्या “तू उद्या माझ्या कडे येशील?” ह्या प्रश्नाला शक्यतो “हो” असेच वा क्वचित“नाही” असे उत्तर मिळायचे. हल्ली मित्राने जर असे विचारले की “तू उद्या माझ्याकडे येशील?”तर “उद्या काय आहे?”असा प्रश्नच उत्तरादाखल मिळतो इतके ‘सहज भेटणे’ दुर्मिळ झाले आहे. ‘कोणाकडे जायचे तर ते कुठल्याश्या निमित्तानेच’ असेकाहीसे झालेले दिसते. तर दुसऱ्या बाजूने सोशल मिडिया मुळे जुने मित्र, नातेवाईकांचा बृहदपरिवार असे ग्रुप झालेलेही दिसतात. काही ठिकाणी सोशलमिडियाच्या माध्यमांतून मैत्री झालेल्यांचे संमेलन गेट-टुगेदर वगैरे कार्यक्रमहोतानाही दिसत आहेत.

सोशल मीडियामुळे हौशी फोटोग्राफीचे प्रमाण खूप वाढले. ते एकमेकांना शेअर करण्याची सोय झाली. व्हिडीओ कॉल साठी मुख्यत: दिलेला ‘फ्रंट कॅमेरा’ आता मुख्यत: सेल्फी साठी वापरला जाऊ लागला. ग्रुप फोटोसाठी विशेष सेल्फी काढायची स्टिकअस्तित्वात आली. स्वत:च्या चेहऱ्याबद्दल, दिसण्याबद्दल एक जागरूक जाणीव किंवा कॉन्शसनेस निर्माण झाला. आपण विशिष्ट कोनातून बरे/ चांगले/सुंदर दिसतो असे ‘प्रयोग’ सुरु झाले.किती हसायचे, दात दिसायला हवे की नाही,ओठांचा ‘चंबू’ कधी करायचा आदि सवयी स्थिरावल्या. साध्या साध्या व्यावसायिक कामांच्यासाठी देखील कॅमेरा वापरला जाऊ लागला. एखाद्या वस्तूचे, जागेचे, कामाच्या प्रगतीचे फोटो काढले आणि पाठवले जाऊ लागले. वह्या उतरवून घेणे वगैरे गोष्टी १९७० च्या दशकांत शिक्षण झालेल्यांच्या कथा झाल्या. ८०-९० शिकलेल्या पिढीचा नोट्स ‘झेरॉक्स’ करण्याचा काळही मागे पडला. आता नोट्स चे फोटो निघू लागले आणि ‘झेरॉक्स’ च्या जमान्यातील पालक फोटो काढणाऱ्यांकडे “काय एकेक थेरं” अशा नजरेने बघूलागले!

बदलत्या काळाची आणखी एक देणगी म्हणजे लिहिणारे सर्वत्र झाले. मनात असलेले लोकांना सांगण्याचे एक सर्वार्थाने मुक्त असे माध्यम निर्माण झाले. ह्या लिहिणाऱ्या लोकात सर्व प्रकार होते आणि आहेत. हौशी आहेत, आरंभशूर आहेत, सातत्याने व सकस लिहिणारे आहेत त्यांचा चाहता वर्ग आहे. ३० -४० हजारहिट्स आहेत असे कितीतरी मराठी ब्लॉग्स सांगता येतील. फेसबुक ट्विटर वर ताज्या घडामोडी बद्दल तत्काळ लिहिणारे आहेत. जसे लिहिणारे आहेत तसे वाचणारे देखील प्रचंड संख्येने वाढले. वाचणारे, फॉरवर्ड करणारे व लिहिणारे असे मिळून मराठीतील लिहिलेला मजकूर जगभर पोहोचला. ह्यात गैरप्रकार देखील करणारे आहेत.खोट्या बातम्या पसरवणे, मानहानी करणारा मजकूर लिहिणे. जात, धर्म, पक्ष आदि बाबतीत आकसाने लिहिणे, थेट वा फेक अकाऊंट काढून महिलांशी लगट करणे असेही प्रकार सुरु झाले. पण समाजातील प्रत्येकाला अभिव्यक्तीची संधी मिळते आहे आणि त्याचा साधारणपणे योग्यवापर करत आपले म्हणणे जगापुढे मांडणारे लोक वाढत आहेत ही चांगली गोष्ट आहे. दुसऱ्या बाजूने इंटरनेटचा फक्त सोशल मिडिया साठी आणि सोशल मिडिया पुरताच वापर करणारेही वाढले. ह्यातील धोकाही वेळीच ओळखला पाहिजे. इंटरनेट वर उपलब्ध असलेला बहुभाषिक समृद्ध मजकूर, नव्या भाषा शिकण्यासाठी, इंग्रजी सुधारण्यासाठी उपलब्ध असलेली साधने, देश-विदेशातील विविध प्रसिद्ध विद्यापीठांनी सुरु केलेले अनौपचारिक पण सखोल अभ्यासक्रम, विविध माहितीपट, ई–बुक्स,ऑडीओ बुक्स वगैरे वैविध्यपूर्ण खजिना आपली वाट बघत आहे. पण इंटरनेट वापराचा बहुतांशी काळ सोशल मीडियात गप्पा-टप्पा मध्ये जात असेल तर आपण आळसाने वा गचाळपणामुळे त्या भांडाराचा उपयोग करण्याची संधी घालवली असे होईल.

एके काळी इमेल पुरते महत्वाचे वाटणारे इंटरनेट म्हणता म्हणता साहित्य, कला, सिनेमा, क्रीडा, व्यापार अशा विविध आघाड्यांवर आपली गरज होऊन बसले आहे. ऑनलाईन शॉपिंगमुळे अनेक छोटे उत्पादक विक्री आणि वितरणाच्या मोठ्या साखळीत जोडले जात आहेत. इंटरनेटचा प्रभाव उत्तरोत्तर वाढणारा आहे. नवे तंत्रज्ञान जशा नव्या सोयी – सुविधा आणि संधी निर्माण करेल तशी नवी आव्हानेही निर्माण होतील. एक विवेकी समाज म्हणून आपण ह्या नव्या बदलांना कसे सामोरे जातो ह्याच्याशी आपले भवितव्य बांधले गेले आहे.
-शरदमणी मराठे
Sharadmani@gmail.com
- (प्रथम प्रसिद्धी – ‘विश्व संवाद केंद्र. पुणे’ यांचा दिवाळी अंक, २०१८ आणि विश्व संवाद केंद्र मुंबई यांच्या फीचर सेवेद्वारे हा लेख वापरलेले ५-६ दिवाळी अंक!)
Simply superb ! Keep writing and sending too
Vinay Sahasrabuddhe
>
Thanks a lot. You have been reading my all writings and been encouraging me since 1982. I always feel honoured for that. Thanks again.
वा! शरदमणी ! सुंदर !!
रवि शिंगणापूरकर
धन्यवाद रवि.
सरळ आणि सोप्या भाषेत छोटे छोटे बारकावे मांडले आहेत
25 वर्षाचे प्रवास वर्णन आहे
अप्रतीमच👍🏻
धन्यवाद उदय.
Dear Sharad
Very apt article. It reflects the change across generations very effectivelyâ¦
Good flow. Nice use of words
Thanks and Regards,
Yatin Sonawane
[Email_CBE.gif]
Thanks yatin for these kind wordsd.
चर्वण करून चोथा झालेल्या विषयावर लिहीण्याऐवजी जरा हटके विषय निवडून त्यावर समर्पक विश्लेषण केले त्याबद्दल अभिनंदन. जीवनाचा अविभाज्य घटक बनलेल्या विषयावर केलेले सुयोग्य भाष्य
धन्यवाद शशिकांत.
धन्यवाद शशिकांत. कोणी आवर्जून कळवले की आनंद वाटतो.
शरद, मस्त लेख. खूप काळ कव्हर केलास. सगळे बदल नोंदवले आहेस.
धन्यवाद स्नेहा.
समर्पक विश्लेषण! जीवनाचा अविभाज्य घटक बनलेल्या मायाजाला वर केलेले सुयोग्य भाष्य
धन्यवाद सर. तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी महत्वाचा आहे.
नेहेमीप्रमाणेच सहज प्रवाही लेखन.
धन्यवाद.