सर्वसाधारणपणे श्री गुरुजी हे लोकांना माहीत आहेत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (ह्यापुढे उल्लेख केवळ ‘संघ’ असा असेल) दुसरे सरसंघचालक म्हणून. संघाचे संस्थापक व आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांच्या निधनानंतर, म्हणजे १९४० पासून ते १९७३ पर्यंत अशी तब्बल ३३ वर्षे गुरुजी संघाचे सरसंघचालक होते. आजवरच्या सर्व सरसंघचालकांच्या तुलनेत हा तसा प्रदीर्घ कालावधी आहे. मुख्यत: संघाच्या संघटनात्मक विस्तार व दृढीकरणासाठी त्यांचा देशभर संघटनात्मक प्रवास होत असे. असे सांगतात की दरवर्षी दोन वेळा ते पूर्ण देशात प्रवास करत. त्यामुळे ढोबळमानाने हिंदूंचे संघटन करणाऱ्या एका संघटनेचे ते प्रमुख होते, प्रमुख संघटक होते, मार्गदर्शक होते असे म्हटले तर ते रास्तच ठरेल. पण ज्या विशाल राष्ट्रीय दृष्टीकोनाने संघाची स्थापना व मार्गक्रमणा झाली त्यात ‘हिंदूंचे संघटन’ ह्या संकल्पनेत केवळ ‘संख्यात्मक पट उभारणी’ची कल्पना नसून उच्च-नीचता, जातीभेद, स्पृश्यास्पृश्यता ह्या अवगुणांवर मात करत गुणात्मक, एकात्म व समरस समाजाच्या निर्मितीचीच कल्पना होती. त्यामुळे जरी प्रत्यक्षात दैनंदिन कार्यात वापरले जाणारे ‘संघटन’, ‘एकजूट’ हे शब्द जरी रूढ असले तरी सैद्धांतिक भूमिकेच्या, वैचारिक निष्ठेच्या व संघटनात्मक व्यवहाराच्या स्तरांवर भेदाभेद रहित समतायुक्त समाज निर्मितीचे ध्येयच डोळयांसमोर होते. त्यामुळेच, गुरुजींचे समरसता विषयक विचार व कार्य सरसंघचालक म्हणून सुरुवातीच्या काळात ‘संघटनात्मक कार्य’ ह्या संज्ञेमध्ये समाविष्ट होत गेले आणि काहीसे संघ संघटनेपर्यंतच ज्ञात राहिले. पण त्यांच्या सामाजिक समतेच्या आग्रहाचा, त्यासाठी ते सातत्याने करत असलेल्या चिंतनाचा व प्रत्यक्ष कार्याचा परिचय व प्रत्यय गुरुजींच्या सरसंघचालक कारकीर्दीच्या अखेरच्या दशकांत संघटनेच्या बाहेर सर्व समाजाला व हिंदू समाजातील विविध संप्रदायांच्या प्रमुखांना अनुभवता आला.
तसे मुळातच अध्यात्मिक वृत्तीच्या श्री गुरुजींना सुरुवातीपासूनच हिंदू समाजात विद्यमान असणाऱ्या जातीभेदांच्या बद्दल व स्पृश्य-अस्पृश्य मानणाऱ्या वाईट रिती–रुढींच्या बद्दल नकाराचीच भावना होती. त्यांच्या संघातील अगदी प्रारंभीच्या काळात व त्यापूर्वीही त्यांच्या विद्यार्थी दशेत अनेक प्रसंगात ती व्यक्त झाली आहे. तसे त्यांच्या घरातील वातावरण जात-पात मानणारे नव्हते. ते विद्यार्थी असताना बनारस मध्ये एका मागासवर्गीय विद्यार्थ्याकडे खानावळी (मेस) साठी पुरेसे पैसे नव्हते तेव्हा गुरुजींनी पुढाकार घेतला आणि बरोबर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मिळून मेसचे पैसे भरले होते. ती व्यवस्था दोन वर्षे सुरु होती. गुरुजींनी त्यांच्या तरुणपणी, मद्रासला शोधनिबंध वाचण्यासाठी गेलेल्या ‘बाबुराव तेलंग’ ह्या मित्राला पत्र लिहिले होते. त्या पत्रात गुरुजी लिहितात “ब्राह्मण- ब्राह्मणेतर, स्पृश्य-अस्पृश्य हे सारे भेद नष्ट करून समाज एकसंघ केला पाहिजे”. संघातील सुरुवातीच्या काळात व नंतर सरसंघचालक झाल्यानंतरही नागपूर शहरात संघकार्याच्या निमित्ताने वावरताना अनेक मागासवर्गीय घरांतील स्वयंसेवकांच्या घरी ते गेल्याच्या, आजारपणात औषध-उपचारात लक्ष घालून मदत केल्याच्या, त्या त्या घरातील सुख-दु:खाच्या प्रसंगी उपस्थित असल्याच्या अनेक आठवणी विवध पुस्तकातून नोंदवलेल्या आहेत. नागपूर येथील रिपब्लिकन नेते, बौद्ध धर्मीय विद्वान यांच्याशी गुरुजींचे व्यक्तिगत संबंध होते. रामरतन जानोरकर, पं. रेवाराम कवाडे (प्रा. जोगेंद्र कवाडे यांचे काका) यांच्या बरोबर झालेल्या गुरुजींच्या भेटीच्या वा ते संघ उत्सवात सहभागी झाल्याच्या आठवणीही विविध पुस्तकात नोंदवलेल्या आहेत.
गुरुजी ज्या रा.स्व.संघाच्या सर्वोच्च पदावर ३३ वर्षे होते त्या संघाची सामाजिक समतेच्या ध्येयासाठी झालेली वाटचाल आणि गुरुजी यांना वेगळे करता येऊ शकत नाही. हिंदू समाजाच्या विशाल संघटनेचे उद्दिष्ट संघाने स्थापनेपासून मांडले होते. ते संघटन उभारणीचे कार्य जातीभेदांचा भिंती मोडल्याशिवाय शक्य होऊ शकत नाही हे तर उघडच होते. डॉक्टरांनी स्थापन केलेल्या संघाची वाटचाल जरी त्या दिशेने सुरु होती, आणि जरी महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या संघस्थानाला भेट देणाऱ्या पाहुण्यांनी संघाच्या शाखेत, शिबिरात स्वयंसेवकांचा परस्परांशी व्यवहार जातीभेदांच्या भिंती न मानणारा आहे ह्याबाबतीत संघाचे कौतुकही केले होते, तरीही संघाचा प्रसार डॉक्टरांचे निधन झाले तेव्हा भारताच्या सर्व भागांत असला तरी तसा मर्यादितच होता. एक प्रकारे डॉक्टरांनी उभे केलेले प्रतिमान त्याच ध्येयाने, गुणवत्तेवर तडजोड न करता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे मोठे आव्हान डॉक्टरांच्या नंतर संघासमोर होते आणि श्री गुरुजींच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या टीमने ते समर्थपणे पेलले. त्यात एका टप्प्यावर संघाची ताकद व संघटनात्मक स्थिती आली असताना महात्मा गांधींची हत्या झाली. माणसाला मारून विचारांचा पराभव करता येत नाही हे न समजलेल्या ज्या मोजक्या माणसांनी भावनेच्या भरात व माथेफिरूपणे कट करून हे निंद्य कृत्य केले ते सर्व स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणारे होते. स्वाभाविकपणे त्याचा थेट फटका व कायदेशीर नसला तरी भावनिक कलंक संघाला लागला. त्या सगळ्या घटनांवर अधिक काही लिहित नाही पण गांधीजींच्या दुर्दैवी हत्येमुळे एक विचार म्हणूनही हिंदुत्व विचारांचे भरपूर नुकसान झाले. संघाचे कामही संघटनात्मक दृष्ट्या मागे गेलेच पण समाजातील स्वीकारार्हता ह्या दृष्टीनेही संघाची पीछेहाट झाली. त्या धक्क्यातून संघाला पुन्हा सावरत वृद्धिंगत करण्यासाठी पुढील काही वर्षे गुरुजींनी संघटनात्मक प्रयत्नांची पराकाष्ठा केली. गुरुजींच्या सामाजिक योगदानाचा अभ्यास करताना ह्या आघाताचा व त्या नंतरच्या खडतर कालखंडाचाही विचार करावा लागेल.
१९४० मध्ये सरसंघचालक झाल्यानंतर त्यांनी संघाच्या विस्तारासाठी आणि दृढीकरणासाठी देशभर प्रवास केला. संघबंदीच्या काळात भोगाव्या लागलेल्या कारावासाच्या काळाचा अपवाद सोडला तर त्यांचा देशभर प्रवासाचा क्रम अथक सुरूच राहिला. जातीभेदांच्या वा कुठल्याही क्षुद्र विचारांना थारा न देणारे हिंदू समाजाचे विशाल संघटन उभारण्याच्या एकच ध्यास गुरुजींनी घेतला. जातीभेद नष्ट करा असे म्हणून ते नष्ट होत नाहीत. तर जाती-पाती पेक्षाही मोठी व आपल्या देशाच्या महान परंपरेशी वारसा सांगणारी हिंदुत्वाची ‘मोठी रेष’ जाती विचाराच्या छोट्या रेषेच्या शेजारी काढणे व त्या वैभवशाली वारश्याबद्दल गौरव भाव वृद्धिंगत करत स्वयंसेवकात समतेची आणि एकजुटीची भावना निर्माण करणे हा एक प्रकारे एककलमी कार्यक्रमच संघाचा आणि गुरुजींचा पुढील सर्व वर्षांचा राहिला. हे करत असताना जातिभेद, अस्पृश्यता आदि दोषांचाही स्पष्ट शब्दात उल्लेख एक आव्हान म्हणून संघाने सतत केला. हे काम सोपे नव्हते. संघात प्रवेशासाठी काही विशेष पूर्वअट नव्हती. स्वत:ला हिंदू म्हणवून घेणारा व भगव्या ध्वजाला प्रणाम करणारा कोणीही संघात येऊ शकतो. त्यामुळे जो समाज आधीच जातीभेदांच्या भिंतींनी विभागलेला आहे, स्वत:च्या जातीबद्दल वयंकाराची भावना अंगी बाळगणारा आहे अशा समाजामधुनच स्वयंसेवक संघात येत असतो. त्या स्वयंसेवकाला त्याच्या घरात असणाऱ्या जात विषयक धारणांवर मात करत विशाल हिंदुत्वाच्या एकात्मतेचा अनुभव द्यायचा हे मोठे आव्हानच होते. त्यासाठी शाखेच्या कार्यक्रमांची व उत्सवांच्या आयोजनाची घडी बसवणे, विविध बैठका, चर्चा, प्रशिक्षण वर्ग आदि संघटनात्मक रचनेची आखणी करायची हे मोठे कौशल्याचे व संयमाची परीक्षा बघणारे काम होते. गुरुजींच्या नेतृत्वाखालील संघाने हे आव्हान पेलले आणि वर लिहिलेल्या वैचारिक सूत्राशी प्रामाणिक राहून संघकार्य देशाच्या अक्षरशः काना कोपऱ्यात पोहोचवले. त्यामुळेच जातीभेद न मानणारा, स्वार्थासाठी जातिव्यवस्थेचा उपयोग न करणारा, हिंदुत्वाच्या आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या धाग्यात ओवलेला असा लाखो सामाजिक कार्यकर्त्यांचा समूह संघाने इतक्या वर्षांत उभा केला. हे गुरुजींचे समरसतेसाठी केलेले सर्वोच्च योगदान आहे. माझ्या बघण्यात तरी असे दुसरे उदाहरण नाही.
संघकार्याच्या निमित्ताने होणाऱ्या प्रवासांत गुरुजींनी अनेक सन्माननीय व्यक्तींशी विचार-विमर्श केला. सामाजिक समतेच्या विषयात समाजातील अनेक जाणकार व्यक्तींशी चर्चा केली. १९६१ च्या सुमारास करपात्री महाराजांना गुरुजी दिल्लीत भेटले. करपात्री महाराजांचे म्हणणे होते की देशभर पसरलेल्या संघाच्या लाखो स्वयंसेवकांनी हिंदू धर्मातील त्यांच्या त्यांच्या वर्णाप्रमाणे आचरण करावे आणि तसे करण्यासाठी गुरुजींनी एक नेता म्हणून सर्व स्वयंसेवकांना सांगावे. त्या चर्चेत गुरुजींनी महाराजांना नम्रपणे पण स्पष्टपणे सांगितले “मी जरी संघाचा प्रमुख असलो तरी सर्व स्वयंसेवक माझे बंधू आहेत. ते माझे शिष्य नाहीत की मी काही सांगावे आणि त्यांनी ऐकावे” करपात्री महाराजांना गुरुजींचे म्हणणे काही रुचले नसावे. मग गुरुजी त्यांना पुढे म्हणाले “रागावू नका, पण मला सांगा आज कुठे वर्णव्यवस्था शिल्लक राहिली आहे? कुठे जातीव्यवस्था राहिली आहे? तीच जीर्ण व्यवस्था पुन्हा उभी करण्याचे प्रयत्न व्यर्थ आहेत. हे सर्व मोडून एकच समाज निर्माण करण्याची वेळ आली आहे. त्यातूनच नवी समाज व्यवस्था निर्माण होईल. वास्तविकपणे संघ हेच काम करतो आहे. सर्वांना एकत्र आणून, जाती-पंथाच्या आधारावर नाही तर समाज, राष्ट्र हा चिरंतन आधार घेऊन एक सुसूत्र, एकरस व संघटीत समाज उभा करायचा आहे. कोणतेही भेद राहू द्यायचे नाहीत”
भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर खरे तर अस्पृश्यता, जातीभेद आदि गोष्टी कायद्याने नाकारल्या गेल्या. नव्या राज्यघटनेने सर्व नागरिक सामाजिकदृष्ट्या समान आहेत असे आग्रहपूर्वक सांगितले. तरीही मनामनात असलेले जातींचे वयंकार काही चुटकीसरशी गेले नाहीत. तसे होणे अवघडही होते. जातींच्या आधारावर असलेल्या उच्च-नीचतेच्या भावना मनामनात तशाच होत्या. आजही त्या पुरत्या गेलेल्या नाहीत. हे परिवर्तन कायद्याने होण्याच्या मर्यादा होत्या आणि आहेतही. स्वातंत्र्याच्या वेळेला, म्हणजे १९४७ मध्ये भारतात १२% साक्षरता दर होता. ह्याचा अर्थ ८८% लोक निरक्षर होते. १९६१ पर्यंत ह्यात प्रगती झाली खरी. तरीही साक्षरता दर २८% इतकाच वाढू शकला. जवळ जवळ ७२% लोक निरक्षर होते. अशा स्थितीत राज्यघटना, कायदा वगैरेंनी समतेचा धरलेला आग्रह सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचण्याच्या मर्यादा होत्या. अशा स्थितीत परंपरेने लोकांच्या मनात आदराचे स्थान असलेले विविध पंथांचे प्रमुख, धर्माचार्य, मठाधिपती अशा व्यक्तींनी जर सामाजिक समतेबद्दल, जातीभेद न मानण्याबद्दल आणि मुख्य म्हणजे अस्पृश्यता ही अयोग्य रूढी आहे हे सांगितले तर त्यांच्या आदरापोटी व धर्मातील, पंथातील स्थानामुळे ते ऐकतील व निदान ह्या कुरीतींना धर्माचे समर्थन (sanction) नाही हे अधोरेखित होईल असा विश्वास गुरुजींना वाटला.
हे काम सोपे नव्हते. संत तुकडोजी महाराजांनी देखिल गुरुजींना “हे महा कठीण काम आहे, तुम्ही ह्या भानगडीत पडू नका” असा मित्रत्वाचा सल्लाही दिला होता. पण गुरुजींनी त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. विविध पंथ प्रमुख, धर्माचार्य, आखाड्यांचे प्रमुख, त्यांच्या आपापसातील एकमेकांच्या पेक्षा “मोठे” “वरिष्ठ” आहोत अशा धारणा, ह्या सर्व गोष्टींना मागे टाकत त्यांना एका व्यासपीठावर आणणे हे कठीण व न भूतो अशा स्वरूपाचे काम होते. काही काही ‘धर्माचार्य’ तर अनेक वर्षांत त्यांच्याच जिल्ह्यातील दुसऱ्या धर्माचार्यांना कधीच भेटले नव्हते. पण अशा सर्व पंथ प्रमुखांचे, मठाधिपतींचे त्या त्या भूभागातील लोकांवर असलेले अधिकाराचे स्थान बघता त्यांना एकत्र आणणे गरजेचे होते. अशा सर्व पंथप्रमुखांशी संवाद साधणे, शास्त्रार्थाची चर्चा करणे हे गुरुजींनी विनम्र भावाने पण अध्यात्मिक अधिकाराने केले. त्यातूनच १९६४ मध्ये मुंबईला सांदिपनी आश्रमात ‘विश्व हिंदू परिषद’ ह्या सर्वसमावेशक संघटनेची स्थापना गुरुजींच्या पुढाकाराने व विविध धार्मिक नेत्यांच्या, मार्गदर्शकांच्या सक्रीय उपस्थितीत झाली. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून धर्मचार्यांच्या संमेलनाचे आयोजन त्यानंतर वेळोवेळी करण्यात आले. १९६६ मध्ये अलाहाबाद येथील पहिल्या संमेलनातच “न हिंदू पतितोभवेत” ह्या संकल्पाचा उद्घोष करण्यात आला. हिंदू समाजात कोणीही ‘पतित’ असू शकत नाही. सर्व जण समान आहेत हे आग्रहपूर्वक सांगितले गेले. त्यातूनच काही तात्कालिक वा ऐतिहासिक कारणांनी हिंदू धर्म सोडून गेलेल्या व्यक्तींना हिंदू धर्मात परत येण्याचा मार्ग प्रशस्त झाला. धर्म सोडून गेल्यामुळे बहिष्कृत मानण्याची गैरव्यवस्था संपुष्टात आली. अशा बहिष्काराला धर्माचे समर्थन नाही हे ही अधोरेखित झाले.
पुढे लगेचच १९६९ मध्ये कर्नाटक किनाऱ्यावरील उडूपी येथे झालेल्या पुढल्या धर्मसंमेलनात ‘हिंदवे सोदरा सर्वे’ ह्या वचनाचा उद्घोष करण्यात आला. ह्या संमेलनाचे आयोजन गुरुजींच्या कल्पेनेने व सक्रीय सहभागाने पार पडले. सारे हिंदू बांधव आहेत. त्यात उच्च-नीच भावना असणे धर्मसंमत नाही असा ठराव एकमुखाने संमत करण्यात आला. मागासवर्गीय समाजात जन्मलेले कर्तृत्ववान सेवानिवृत्त आय.ए.एस. अधिकारी व त्यावेळेस पब्लिक सर्व्हिस कमिशनचे सदस्य असणारे श्री आर भरनैय्या उडुपी संमेलनात सक्रीय होते. प्रस्ताव सत्राचे ते अध्यक्ष होते. त्यांनी प्रस्ताव वाचला “आपल्या पूजनीय धर्मगुरूंनी, आचार्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार, सर्व हिंदू बांधवांनी उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्य अशा प्रकारच्या सर्व भेदभावांना मूठमाती देऊन आपले सर्व सामाजिक आणि धार्मिक व्यवहार, जात-पात, भाषा, वंश, इत्यादी सर्व भेदभाव बाजूला ठेवून, आपण सर्वजण हिंदू बांधव आहोत ह्याच उदात्त भावनेने करावेत असे अत्यंत कळकळीचे आवाहन ही परिषद करीत आहे”. हा प्रस्ताव मांडताच प्रतिनिधींनी ठरावाच्या समर्थनार्थ मत नोंदवले आणि टाळ्यांचा-घोषणांचा एकच गजर झाला. जातीपातीच्या आधारावर उच्च-नीच मानण्याच्या भावनेला व अस्पृश्यतेसारख्या अनिष्ट रूढींना धर्माची मान्यता नाही हे प्रत्यक्ष धर्माचार्यांच्या सभेमध्येच जाहीर करण्यात आले आणि सामाजिक समतेच्या प्रयत्नांत धर्माचार्य, पंथ प्रमुख व मठाधिपती अशा सर्वच धार्मिक नेत्यांचा सहभाग व निर्धार अधोरेखित झाला. प्रस्ताव पारित झाल्यावर श्री आर भरनैय्या यांनी गुरुजींना आलिंगन दिले. भरनैय्या यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. त्या धर्मपरिषदेत धर्माचार्य, पंथप्रमुख व मठाधिपती यांना उद्देशून केलेल्या भाषणात त्यांना आवाहन करताना गुरुजी म्हणाले… “धर्मगुरूंपुढे असणारे दुसरे कर्तव्य आहे ते विद्यमान कुरीतींपासून समाजाचे रक्षण करण्याचे… मठाबाहेर पाऊल टाकताना त्यांनी त्याच सिद्धांतांवर भर दिला पाहिजे की, जे सिद्धांत समाजासाठी, सर्वांसाठी उपयुक्त ठरतील” सर्व धर्माचार्य मंडळींशी आदरपूर्वक वागत असतानाही धर्मगुरूंच्या विधायक सामाजिक भूमिकेविषयीचे आग्रह गुरुजींनी अत्यंत स्पष्ट शब्दात मांडले हे देखील लक्षात घेतले पाहिजे. इतकेच नाही तर संघ स्वयंसेवकांना व संघातील सहकाऱ्यांना उडुपी संमेलनानंतर लगेच लिहिलेल्या पत्रात गुरुजी लिहितात “…ह्या संमेलनाच्या यशाने हुरळून जाण्याची वा अल्पसंतुष्ट होण्याची गरज नाही. इथे धर्माचार्यांनी प्रस्ताव स्वीकारला म्हणून जादू केल्यासारखे काही एकदम बदलणार नाही. शतकानुशतके चालत आलेल्या गैर रूढी चुटकीसरशी संपणार नाहीत. इतिहासात घडलेल्या चुकांचे प्रामाणिक भावनेने परिमार्जन करावे लागेल व तो अपेक्षित बदल साध्य करण्यासाठी शहरा-शहरात, गावा-गावात, घराघरात एकेका माणसाशी संवाद साधायला लागेल, जे गैर आहे त्याबद्दल प्रबोधन करावे लागेल. हृदय-परिवर्तन करावे लागेल. वागण्यात-बोलण्यात, आचरणात नैतिक व भावनिक पातळीवर बदल करावे लागतील, स्वीकारावे लागतील…”
आज गुरुजींच्या प्रयत्नांचा धागा संघ हरप्रकारे पुढे चालवत आला आहे. गुरुजींनी हिंदू समाजातील जातींमुळे ठरणाऱ्या उच्च-नीच भावनेचा कठोर शब्दात ‘दोष’ म्हणून उल्लेख केला, तर त्यांचाच वसा पुढे चालवणारे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी अस्पृश्यतेवर कठोर आघात करत “It should go lock stock and barrel” अश्या नी:संधीग्ध शब्दात अस्पृश्यतेचा धिक्कार केला होता. तर आत्ताचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी “जाती व्यवस्था नाही तर जी आहे ती अव्यवस्था आहे” असे स्पष्टपणे सांगत जातीव्यवस्थेच्या अ-प्रासंगितेला अधोरेखित केले आहे. मांडणीची शब्दयोजना बदलती राहिली असली तरी सर्व हिंदू समाजाचे, जन्माने ठरणाऱ्या उच्चनीचतेच्या कालबाह्य कल्पनांना त्यागून वैभवशाली वारशाच्या अभिमानास्पद पायावर बलशाली संघटन उभे करण्याचे प्रयत्न मात्र एकाच पोताचे होते हे दिसून येते.
आज संघाच्या हजारो शाखा आहेत लाखो स्वयंसेवक आहेत. सर्वत्र चालणाऱ्या उपक्रमांत जातीभेदाला स्थान न देता ‘अवघा हिंदू समाज एक आहे’ ही भावना कुठेही हरवलेली नाही. मागासवर्गीय वस्त्या, अनुसूचीत जमाती, भटक्या व विमुक्त जमाती अशा विविध उपेक्षित घटकांच्या चालणाऱ्या विविध सेवा कार्यात, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य प्रकल्पात व क्षमतावर्धनाच्या कामात अनेक स्वयंसेवक कार्यरत आहेत. समाजात वावरणारे स्वयंसेवक देखील जाती-उपजातींच्या छोट्या व खोट्या अभिनिवेशांवर मात करत आपले कौटुंबिक जीवन आकारत आहेत. विविध मागास घटकांसाठी असणाऱ्या सरकारी सकारात्मक योजनांच्या बद्दल व राज्यघटनेद्वारे स्थापित झालेल्या आरक्षणाच्या तरतुदींबद्दल स्वत: लाभार्थी नसणाऱ्या स्वयंसेवकांत व संघ समर्थक घरांत देखील स्वीकारार्हतेची व समर्थनाची जाणीव निर्माण करण्यात संघाने यश साध्य केले आहे. आंतरजातीय, आंतरभाषिक विवाह अशांकडे अनेक ‘संघाच्या घरांत’ जुन्या अभिनिवेशांचा लवलेशही न ठेवता स्वागतशील भावनेने बघितले जात आहे. योग्य सामाजिक वर्तणुकीचे आग्रह, सामाजिक समतेची जाणीव वगैरे गोष्टी सभा-संमेलनाच्या वा भाषणबाजीच्या न राहता साध्या साध्या स्वयंसेवकांच्या दैनंदिन व्यवहाराचा व संस्थाजीवन म्हणून नित्य आग्रहाचा भाग झाला आहे. आज दिसणाऱ्या ह्या विशाल व आश्वासक पटलाचे प्रथम संकल्पचित्र गुरुजींच्या आग्रहाने व त्यांच्या प्रेरक मार्गदर्शनाखाली निर्माण झाले होते हे विसरून चालणार नाही. गुरुजींचे सामाजिक परिवर्तनासाठीचे हे योगदान अनन्यसाधारण व चिरंजीवी आहे.
-शरदमणी मराठे
sharadmani@gmail.com
+91 9920860749
संदर्भ ग्रंथांची सूची:
- ‘समरसतेचा आदर्श’ – संपादक, रमेश पतंगे
- श्री गुरुजींचे सामाजिक चिंतन – संकलक, रा.वि.बोंडाळे
- श्री गुरुजी एवं वनवासी, वनवासी कल्याण आश्रम प्रकाशन
- सामाजिक क्रांति का दर्शन, संपादक, राकेश सिन्हा
- Shri Guruji REMINISCENCES by K. Suryanarayana Rao
श्री गुरुजींवर वाचलेला आजवरचा सर्वात सर्वसमावेशक लेख. त्यांना प्रतिगामी ठरविणाऱ्यांच्या मनातील सर्व शंका यातून दूर व्हाव्यात.
धन्यवाद दत्ता.
सुप्रभात
उत्तम लेख.श्री गुरूजीं चे काही वचन रूपात असल्यास तेही उपयोगी होतील.
धन्यवाद गीताताई. तुम्ही म्हणता तसे एक पुस्तकच आहे. ३ दिवसांच्या मा. मोहनरावांच्या भाषण मालिकेत त्यांनी त्याचा उल्लेखही केला आहे. पण मी अद्याप पाहिलेले नाही. हा लेख दिवाळी अंकासाठी लिहिला होता आणि भाषण-त्रयी पूर्वीच रवाना झाला होता. आता ते पुस्तक वाचेन व पूरक लिखाण करेन. अजूनही काही जणांनी तसे सुचवले आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.
हिंदुत्वाची मोठी रेष मारून जातिभेदाच्या छोट्या रेषा मिटवता येतील, हा एक भ्रम आहे, हे काळाच्या ओघात दिसून आले आहे. अन्यथा विविध जातींच्या आरक्षणासाठी इतकी चढाओढ आज निर्माण झाली नसती. संघाने नेहमी सामाजिक समरसतेची मांडणी केली, पण प्रत्यक्षात मात्र त्यात केवळ हिंदू धर्मातील समरसता अपेक्षित आहे किंवा हिंदू धर्मियांचे संघटन व्हावे म्हणून समरसता अपेक्षित आहे. भाजपचे सरकार आल्यापासून जे वातावरण दिसते आहे, त्यात समरसता तर कुठे दिसत नाही.
ज्यांना हा भ्रम वाटतो त्यांनी स्वतंत्रपणे जातीअंताची मांडणी करणे व तसे स्वतंत्रपणे कार्यरत होणे इष्ट ठरेल. सामाजिक कामाच्या विशाल क्षितिजावर अशा विविध प्रयोगांना मुभा आणि स्कोप आहे. संघ देखील एक प्रयोगच आहे. १९२५ पूर्वी व नंतर असे प्रयोग झाले आहेत होतही आहेत. सर्वांचे स्वागत.
उत्कृष्ट
धन्यवाद.
लेख खूप सुंदर आणि सर्वसमावेशक झाला आहे. ज्यांना श्री गुरुजीं बद्दल माहिती नाही त्यांनी tar आवर्जून वाचावा.
धन्यवाद. आवर्जून कळवले त्याचा आनंद वाटला.
उत्कृष्ट लेख
धन्यवाद. आवर्जून कळवले ते आवडले.
👌👌👏
लेख आवडला. जातीबद्वदल वयंकाराची भावना यातील वयंकार याचा अर्थ कळला नाहीं . धन्यवाद
एका व्यक्तीच्या स्वत:बद्दलच्या भरमसाठ कल्पना म्हणजे जसे अहंकार. त्याचेच PLURAL. समूहाचा आपल्या समूहा बद्दलच्या भरमसाठ कल्पना म्हणजे वयंकार.
लेख अतिशय समर्पक वाटला. श्री गुरूजींबद्दल पूर्वीपासून पसरवलेल्या गैरसमजांना हे योग्य उत्तर आहे.
धन्यवाद. ह्यावर चर्चा झाली तर चांगले होईल. मी देखील गुरुजींचे सर्वच वाचले आहे असे नाही.
Very well articulated. Excellent arguments. Congratulations.
धन्यवाद सर. तुमची प्रशंसा म्हणजे लिहीणाऱ्यासाठी टॉनिकच
वा छानच….. अशाच अभ्यासपूर्ण लेखांची आवश्यकता आहे
धन्यवाद. हिंट कळली. नियमीत लिहीत जाईन! 😄
लेख अतिशय माहितीपूर्ण आणि आशयघन आहे.
अनेक संदर्भ कळले
धन्यवाद. काही राहिले असे वाटले तर तेही कळवा. किंवा मांडणी अधिक सोपी होण्यासाठी काही सूचना असतील तर त्याही कळवा.
आज फेसबुकवर आपण या लेखाची लिंक दिल्यामुळे लेख वाचता आला. अतिशय अभ्यासपूर्ण व माहितीपूर्ण लेख आहे. शिवाय लेखनाची आपली शैलीही नेमकेपणाची व मुद्देसूद आहे. मी आपला हा लेख माझ्या व्हाटस्ॲप गृपवर शेअर करते.धन्यवाद 🙏🏻
अवश्य शेअर करा. आवर्जून कळवलेत त्यासाठी धन्यवाद.
धन्यवाद ताई.