राउंड द विकेट: महा ‘भारत’ – एकोणिसावा अध्याय – सर्ग ४

राउंड द विकेट: महा ‘भारत’ – एकोणिसावा अध्याय – सर्ग ४

 

RTW logo.

.

.

.

.

.
संजय म्हणाला – महाराज, आता विविध पक्षांच्या उमेदवारांच्या जवळपास सर्व याद्या जाहीर झाल्या आहेत. कोण कु ठून आणि कोणासमोर लढणार, हेही आता नक्की झाले आहे. आपल्याला ‘तिकीट’ मिळाल्याची खात्री झाल्यानंतर प्रचाराच्या आखणीलाही आता वेग आला आहे. सर्वत्र…

धृतराष्ट्र म्हणाले – संजया, तू काय मला गृहीत धरतो आहेस?

संजय म्हणाला – मी समजलो नाही महाराज?

धृतराष्ट्र म्हणाले – मी कु रुवंशातील सर्वात ज्येष्ठ पुरुष आहे. काही सांगण्यापूर्वी तू माझी परवानगी घ्यायला हवी. माझी ऐकण्याची इच्छा आहे की नाही? हे विचारायला हवे. मी तुझे कथन ऐकू इच्छितो की आणखी काही ऐकू  इच्छितो, हे ज्ञात करून न घेताच तू ‘सुरू’ कसा झालास?

संजय म्हणाला – क्षमा असावी महाराज. मला कल्पना नव्हती की तुम्ही आज माझे कथन ऐकायला उत्सुक नसाल. मी पुन्हा कधीतरी सांगेन.

धृतराष्ट्र म्हणाले – कमालच आहे. हेही तूच ठरवलेस मला न विचारता? तुला कोणी सांगितले मला ऐकण्याची इच्छा नाही म्हणून?

संजय म्हणाला – महाराज, माझा आता माझ्या डोक्याचे पार दही होऊन गेले आहे. मी सांगितले तरी रागावता आहात आणि नाही सांगितले तरी रागावता आहात. तुम्हाला ‘घोडा’ म्हणायचे आहे की ‘चतुर’ म्हणायचे आहे, ते एकदा स्पष्ट सांगा.

धृतराष्ट्र म्हणाले – संजया, मला इतकेच म्हणायचे आहे की माझ्या ज्येष्ठत्वाचा मान राखून तू सांगण्यापूर्वी माझी अनुज्ञा मागावीस. मला विचारावेस, ”महाराज, आता सांगू की मग सांगू?” मग मी तुला सांगण्यासाठी अनुज्ञा देईन. तसे मला युध्दाचा वृत्तान्त ऐकायचाच आहे, पण मला गृहीत धरलेले आवडत नाही.

संजय म्हणाला – क्षमा असावी महाराज. ह्यापुढे असा प्रमाद होणार नाही… तर मी सांगत होतो की आता बरेचसे उमेदवार जाहीर झाले आहेत,  कोण कु ठे लढणार हे आता नक्की झाले आहे. जिंकण्याची खात्री, इच्छा असणाऱ्या शिबिरात इच्छुकांची गर्दी उसळलेली दिसत आहे, तर हरण्याची शक्यता असणाऱ्या शिबिरात शुकशुकाट दिसतो आहे. तिथे कोणी स्वत:ऐवजी आपल्या तरुण मुलाला लढण्यासाठी पुढे करतो आहे.

धृतराष्ट्र म्हणाले – हे तर विचित्रच ऐकतो आहे काहीतरी. स्वत:ऐवजी युवराजांना पुढे करतात म्हणजे कमालच आहे.

संजय म्हणाला – महाराज, इथे ‘बंदिवास’ टाळण्यासाठी आजारी पडून इस्पितळात भरती होण्याची प्रथा आजवर होती. पण आता लढत टाळण्यासाठी इस्पितळात भरती होणारे महाभाग दिसत आहेत. कुणाला आहे ती लढण्याची जागा बदलून हवी आहे, तर कुठल्या पक्षप्रमुखांना उमेदवारांनी दुसऱ्या ठिकाणी ‘मोर्चा’ सांभाळायला हवे आहे, तर कु णी ‘आपल्या सैन्याचे मत घेऊन मगच लढायचे ठरवेन’ अशी गर्जना करतो आहे.

धृतराष्ट्र म्हणाले –  हे तर आमच्या वेळच्या युध्दापेक्षा रोचक होत चालले आहे. त्या वेळी दोन्ही बाजूचे वीर नुसते फुरफुरत होते. वीरश्री मिळते की वीरगती? हा नशिबाचा खेळ होता. पण लढण्याचे कर्तव्य कोणी सोडले नाही.

संजय म्हणाला – महाराज, एक आठवण करून देतो. लढण्याचे कर्तव्य सोडण्याची भाषा मात्र झाली एका वीराच्या हातून आणि तो होता अर्जुन. आणि त्याने तशी भाषा करण्याचे कारण होते ‘समोर’ उभे ठाकलेले आपले ‘आप्त’ ‘स्वकीय’ आणि ‘गुरुवर’. अर्थात त्याला सबुरीचे दोन शब्द सुनवून कर्तव्याची जाणीव देणारा श्रीकृष्ण होता तेव्हा.

धृतराष्ट्र म्हणाले – मग आज हे सबुरीचे शब्द सांगणारा कोण आहे ह्या युध्दात?

संजय म्हणाला – ‘समाजाने राज्यकर्त्यांना जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे’ असे म्हणणारे पुष्कळ जण आहेत महाराज. ते काम करण्याची इच्छा असणारे किंवा ते काम आम्हीच करणार असे म्हणणारे बरेच आहेत. पण तसे परिणामकारकपणे करू शकणारे मात्र दुर्दैवाने कोणीच नाही, महाराज.
sarg 4.

.

.

.

 

 

.

.

धृतराष्ट्र (हताशपणे) म्हणाले – अरे अरे, ही तर फारच वाईट परिस्थिती आहे, संजया!

संजय म्हणाला – हे तर काहीच नाही महाराज. आणखी असे की ‘समोर’ उभे असणारे आप्त, स्वकीय आणि गुरुजन ‘समोरच’ दिसू शकतात, पण शेजारी उभा असलेला आप्त, स्वकीय आणि गुरुजन यांच्यापैकी एखादा मनाने ‘शेजारी’ नसून ‘समोर’ असतो, ही परिस्थिती आणखीनच गंभीर असते. तुम्हाला हे सर्व नवीन तर आहेच, पण सहजपणे समजणारेदेखील नाही… हे मी समजू शकतो! त्यामुळे महाराज, वीरश्रीची आणि कर्तव्यभावनेची जागा आता भयाने आणि संशयाने घेतली आहे. खांद्यावर ‘ध्वजा’ तर आपलीच दिसते, पण चेहऱ्यावर ‘मजा’ तर भलतीच दिसते, असेही दिसू लागले आहे. काल आपल्यासाठी चर्चासत्रात भांडणारा अचानक आपल्यासमोर उभा ठाकलेला दिसतो, अशी परिस्थिती आली. आता अशा कठीण समयी दर संसदीय क्षेत्रागणिक मला सर्वत्र अर्जुनच अर्जुन दिसायला लागले आहेत आणि दर अर्जुनामागे एक कृष्ण उभा करण्याची ताकद ह्या समाजात नाही महाराज!

संजयाचे हे बोलणे ऐकून महाराज विचारात पडले आणि प्रश्न विचारेनासे झाले. संजयने ‘महाराजांची चिंतनाची वेळ झाली असावी’ असा ह्या शांततेचा सोयिस्कर अर्थ काढला आणि मघाशी महाराजांना समजावून सांगताना ‘घोडा तरी म्हणा किंवा चतुर तरी म्हणा’ हे म्हटलेले वाक्य लक्षात ठेवत आणि त्याच्यापासून प्रेरणा घेत ‘जुन्या पडोसनची व्हीसीडी कु ठे मिळेल बरं…?’ असा विचार करत त्या दुकानाच्या दिशेने पोबारा करण्यासाठी दबत्या पावलाने महाराजांच्या कक्षातून काढता पाय घेतला.

 

चित्र साभार – खलील खान

(प्रथम प्रसिद्धी: विवेक साप्ताहिक, ०६ एप्रिल  २०१४. )

 

This entry was posted in विनोदी/ उपरोधिक and tagged , , , . Bookmark the permalink.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s