राउंड द विकेट: महा ‘भारत’ – एकोणिसावा अध्याय – सर्ग ३

महा ‘भारत’ – एकोणिसावा अध्याय – सर्ग ३

RTW logo

 

 

 

 

 

 

धृतराष्ट्र – बा संजया, नवे भारतीय युध्द सुरू झालेले दिसतेय. मला भेरींचे आणि अस्त्रांचे आवाज ऐकू येत आहेत.

संजय – महाराज, आपण शांत व्हावे आणि थोडा धीर धरावा. अजून युध्द सुरू व्हायला अवकाश आहे. युध्दाच्या विषयात असा उतावीळपणा बरा नव्हे. क्षमा असावी, पण ह्याच उतावीळपणामुळे ५००० वर्षांपूर्वी तुम्ही आणि तुमच्या युवराजांनी सगळा देश युध्दभूमी करून टाकला होता, ते विसरलात काय?

धृतराष्ट्र – नाही संजया, ते शल्य घेऊन तर मी असा भटकतोय सद्गतीविना इतका काळ. पण मी खरंच युध्द सुरू होताना येतात तसे भेरींचे आवाज ऐकले. पर्जन्यास्त्र, अग्नी-अस्त्र सोडल्याचेही आवाज ऐकले आणि मुख्य म्हणजे वीरगती प्राप्त झालेल्या वीरांच्या माता-पत्नींचे विलाप ऐकले. तू नाही का ऐकलेस संजया?

sarga 3

 

 

 

 

.

.

 

 

 

संजय – ऐकले महाराज, सर्व ऐकले. पण त्यांचा आणि युध्दाचा काहीही संबंध नाही. तुम्हाला आता सविस्तर सांगतो. सेमिनारमध्ये ज्ञानी माणसे सांगतात तसे, म्हणजे शेवटचा मुद्दा पहिल्यांदा, अशा क्रमाने सांगतो… महाराज, वीरगती प्राप्त झालेले वीर धारातिर्थी पडले, ते युध्दात नाही, तर ते आपल्याच प्रदेशातील शत्रूंकडून मारले गेले. गम्मत म्हणजे त्यांना मारणाऱ्यांना शत्रू म्हटलेलेदेखील अनेकांना आवडत नाही. आणि… आणखी दोन सागरी सैनिकांना वीरगती मिळाली, तीही शत्रूमुळे नाही, तर आपल्या युध्दसामग्रीत असलेल्या दोषांमुळे. पण तसे बोललेलेही अनेकांना आवडत नाही. निरनिराळया हिंसांबद्दल बोलताना निरनिराळे निकष लावण्याची पध्दत आहे सांप्रत भारतात…

धृतराष्ट्र – संजया, ते समजले. पण पर्जन्यअस्त्राचा आवाज मी ऐकला, त्याचे काय?

संजय – महाराज, मी पुन्हा विनंती करतो की आपण ५००० वर्षांपूर्वीच्या ‘सुवर्णकाळातून’ जितके लवकर बाहेर याल, तितके आपल्यासाठी चांगले आहे. तुम्ही ज्याचा आवाज ऐकलात, त्याला  ‘वॉटर कॅनन’ म्हणतात. एका शिबिरातले लोक दुसऱ्या शिबिराच्या कार्यालयावर चाल करून गेले आणि तुंबळ दगडफेक – खुर्चीफेक झाल्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा जोरदार फवारा मारला, त्याचा आवाज होता. आणि मग त्याचाच बदला म्हणून दुसऱ्या शिबिरातल्या लोकांनी पहिल्या शिबिराच्या ‘टोप्या’ भर रस्त्यात जाळल्या. ह्या त्या मानाने क्षुल्लक गोष्टी आहेत. तुम्ही त्याला ‘पर्जन्य अस्त्र’ ‘अग्नी अस्त्र’ म्हणालात, त्याचे मला हसू येते आहे.

धृतराष्ट्र –  संजया, मला काही कळेनासे झाले आहे. भेरींचा, अस्त्रांचा, वीरगतीप्राप्त लढवय्यांचा संबंध ह्या लढाईशी नाही म्हणतोस, तर मग हे आत्ताचे भारतीय ‘युध्द’ असते तरी कसे, हे तू मला विशद करावेस. खरे तर मी सुरुवातीपासून हेच तुला सांगत आहे, पण तू मात्र ते सोडून सगळा फापटपसारा मला सांगत आहेस.

संजय – महाराज, मी पूर्वीच सांगितले की आता लोकांचे राज्य आहे. दर पाच वर्षांनी लोक आपला राज्यकर्ता निवडतात. अनेक वर्षे एकाच ‘शिबिरातील’ लोक वर्षानुवर्षे राज्य करत होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. पंधरावीस छोटया-मोठया शिबिरातील लोक मिळून राज्य करतात. ह्या सर्व शिबिरातले लोक मिळूनदेखील राज्य करण्याइतकी संख्या होत नाही काही वेळा. मग शिबिराबाहेर ‘अपेक्षेत’ टेहळणारे, तिसऱ्या शिबिरात तात्पुरत्या ट्रंका-वळकटया ठेवलेले किंवा विरोधी शिबिरात असलेले पण विरोधाची जाणीव बोटचेपी असणारे असे सर्व मिळून राज्य करण्याचा प्रयत्न करतात.

धृतराष्ट्र – मला हळूहळू समजते आहे तू म्हणतोस ते. मी ज्या यंत्रावर मागे चर्चा ऐकली, त्याच यंत्रावर अनेक जण ‘आम्ही कुठल्याच गटात जाणार नाही’ किंवा ‘आम्ही सिस्टिम बदलण्यासाठी लढतो आहोत’ वगैरे बोलत होते. त्यातील एक जण कुठल्या भाषेत बोलत होता ते कळले नाही, पण निवेदक ‘द्रविड’ ‘द्रविड’ असे म्हणत होता. आणि बाप-लेकाच्या भांडणाबद्दलदेखील बोलत होता. पण ते मला काही कळले नाही.

संजय – होय महाराज. तो माणूस तामिळ भाषेत बोलत होता. पंडू महाराजांची ‘माद्री’ ज्या प्रदेशातून आली, त्या प्रदेशातील भाषा आहे. आणि तुम्ही ऐकलेत ते बरोबरच आहे. त्यांच्या शिबिराचे नाव आहे ‘द्रविड मुन्नेत्र कळघम’.

धृतराष्ट्र – काय विचित्र नाव आहे संजया! (कधी नव्हे ते स्मितहास्य करीत महाराज म्हणाले.)

संजय  – महाराज, नाव विचित्र आहे हे तुम्ही बोलताय? महाराज, तुमच्या पिताश्रींचे नाव होते ‘विचित्रवीर्य’. असले ‘विचित्र’ नाव त्यानंतर गेल्या ५००० वर्षात कुणी आपल्या मुलांना ठेवले नसेल आणि तुम्ही म्हणता ‘द्रविड मुन्नेत्र कळघम’ हे नाव विचित्र आहे? आपल्या नावात ‘द्रविड मुन्नेत्र कळघम’ हे तीन शब्द असलेले मद्रदेशात निदान तीन पक्ष म्हणजे ‘शिबिरे’ आहेत महाराज.

राज्यकर्ते बनण्याच्या ‘मॉडर्न’ पध्दतीने आधीच कन्फ्यूज झालेले महाराज आता अशा विचित्र नावाने तीन पक्ष आहेत म्हटल्यावर आणखीनच कन्फ्यूज होऊन विचार करू लागले आणि त्यांचा, न पाहणारा, डोळा चुकवून संजय टीव्हीचा ‘चर्चासत्र’ चॅनल बदलून सिनेमाचा चॅनल शोधू लागला.

चित्र साभार – खलील खान

(प्रथम प्रसिद्धी: विवेक साप्ताहिक, २९ मार्च २०१४. )

This entry was posted in विनोदी/ उपरोधिक and tagged , , , , . Bookmark the permalink.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s