राउंड द विकेट: महा ‘भारत’ आणि एकोणिसावा अध्याय – सर्ग २

महा ‘भारत’ आणि एकोणिसावा अध्याय – सर्ग २

RTW logo

.

.

.

.

.

.

धृतराष्ट्र म्हणाले – हे संजया, नव्या भारतीय युद्धात ‘माझे’ आणि ‘पंडूचे’ काय करतात हे कथन करायला आता तरी आरंभ करशील का? (संजय ने उत्तर देण्यापूर्वी आपला मोबाईल सायलेंट वर टाकला आणि मनाशी म्हणाला गेल्या दहा वर्षांत किती सवय झाली ह्याची…जणू पाच हजार वर्षे वापरत आहे!)

संजय म्हणाला – महाराज काळ बदलला आहे. फक्त राजघराण्यातील लोक हे ह्या रणाचे नायक नाहीत. जो-जो इच्छुक आहे तो-तो ह्या रणात उडी घेऊ शकतो. हे जनतेचे रण आहे…राजे रजवाडे मुठभर उरले आहेत ह्या रणांत. पूर्वी ज्यांचा उल्लेख अमुक अक्षौहिणी वगैरे आकड्यात व्हायचा त्यातील प्रत्येक आकड्याला आता प्रत्येकी एक मत आणि एक आयडेन्टिटी मिळाली आहे. ते सर्व आज, टेक्निकली का होईना, पण राज्यकर्ते आहेत. त्यामुळे पुन्हापुन्हा ‘माझे’ आणि ‘पंडूचे’ असे सारखे विचारात जाऊ नका.

sarga_02 RTW.

.

.

.

.

.

.

..
.

धृतराष्ट्र म्हणाले – जर तू म्हणतोस तसे कोणीही रणात उडी घेतो आहे तर कोण कोणाविरुद्ध लढतो आहे आणि कोणासाठी लढतो आहे? हे कसे समजायचे?

संजय म्हणाला – महाराज हा लढा पूर्वापार चालत आलेला आहे. तेव्हा तो हस्तीनापुरच्या सिंहासनासाठी होता आज तो इंद्रप्रस्थाच्या म्हणजे दिल्लीच्या सिंहासनासाठी होत आहे. अर्थात फरक इतकाच की पूर्वी तसे मोकळेपणाने मान्य केले जायचे की ‘हो आम्ही सिंहासनासाठी लढतो आहोत’. तो काळच मुळी त्रेता-कली युगाच्या संधिकालाचा होता. आज टळटळीत कलियुग सुरु आहे. त्यामुळे प्रत्येक लढणारा असे सांगेल की तो विकासासाठी लढतो आहे किंवा गुड-गवर्नन्स साठी लढतो आहे किंवा सेक्युलॅरिजम च्या रक्षणासाठी लढतो आहे. काही तर अमुक एक जण सिंहासनावर बसू नये यासाठी लढत आहेत.

धृतराष्ट्रा म्हणाले – बा संजया. माझ्या कानावर आरडाओरडा ऐकू येतो आहे. युद्ध सुरु झाले की काय?

संजय म्हणाला – महाराज धीर धरा. उतावळे होऊ नका. (बहुधा दुर्योधनाने बापाचाच गुण घेतला असणार!) महाराज हे युद्धाचे आवाज नाहीत. आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे आपापल्या पक्षाची – नेत्याची होर्डिंग, म्हणजे मोठी चित्रे , उतरवण्याची लगबग सुरु आहे महाराज आणि ते काढताना चाललेला आरडाओरडा आहे.

धृतराष्ट्र म्हणाले – कोणाची आहेत चित्रे. आणि का उतरवत आहेत?

संजय म्हणाला – महाराज कोणाची आहेत हे सांगणे कठीण आहे. भरपूर चित्रे आहेत पुढाऱ्याच्या आजूबाजूला. जणू काही चक्रव्यूहात अडकला आहे पुढारी. बहुधा वरच्या ओळीतली चित्रे त्याच्या दिल्लीच्या नेत्यांची असावीत आणि खालच्या ओळीतील चित्रे स्थानिक कार्यकर्त्यांची. तसं पाहिलं तर ‘नेता’ बनणं हे चक्रव्यूहात अडकण्यापेक्षा कमी गुंतागुंतीचे नसते महाराज. आणि होर्डिंग उतरवत आहेत ह्याचे कारण आता आचारसंहिता लागू झाली आहे.

धृतराष्ट्र म्हणाले – बा संजया, ही आचारसंहिता काय असते? आम्ही ज्योतिष शास्त्रासंबंधी भृगुसंहिता, वैद्यकविद्येसाठी चरकसंहिता इत्यादींच्या बद्दल ऐकले आहे. आचारसंहिता काय करण्याचे शिक्षण देते? तिचा नव्या भारतीय युद्धाशी संबंध काय? आणि…

संजय (मध्येच अडवत) म्हणाला – महाराज तुम्ही अशी प्रश्नांची सरबत्ती करू नका… ‘आजच्या सवाल’ सारखी. तुमचा प्रत्येक प्रश्न पाच मार्कांचा, दीर्घोत्तरी, ऑप्शन नसलेला आणि ‘हॉट्स’ प्रकारातला आहे. मला समजावून सांगायला जरा वेळ लागेल. महाराज, आचार संहिता म्हणजे निवडणून जाहीर झाल्यावर उमेदवाराने, राजकीय पक्षाने आणि सरकारने काय करू नये याची नियमावली. थोडक्यात सांगायचे तर इतर संहिता काही करण्याविषयी शिकवतात तर आचारसंहिता न करण्याबद्दल शिकवते.

धृतराष्ट्र म्हणाले – मला समजले नाही. काही ‘न’ करण्याचे नियम कसे असू शकतात? उदा “आज मी काहीच करणार नाही” त्याला नियम कशाला. हो मी व्यापार करणार आहे, मी परीक्षा देणार आहे, मी प्रवास करणार आहे अशा गोष्टींना ते ते म्हणजे व्यापाराचे, प्रवासाचे, परीक्षांचे नियम असतात…

संजय म्हणाला – महाराज कृपा करून माझीच परीक्षा घेउ नका. ह्या ‘सिस्टीम’ चा मी काही प्रवक्ता नाही. जसे तुम्हाला प्रश्न पडत आहेत तितकेच किंवा त्याहूनही जास्त प्रश्न मला पडत आहेत. तरीही मी माझ्या अल्पमतीची पराकाष्ठा करत नम्र सेवा बजावत आहे ह्याची जाणीव असू द्यावी. निवडणुका जाहीर झाल्यावर योग्य मर्यादेत खर्च करणे, सत्तेवर असलेल्या पक्षांनी मतदारांना प्रलोभन देणारे वाटेल असे निर्णय घेऊ नये. म्हणजे एकंदरीतच महत्वाचे निर्णय सरकारांनी घेऊ नये. प्रचारामध्ये असत्यकथन करू नये. आपली निवडणूक पूर्व मालमत्ता काय आहे ते जाहीर करावी वगैरे. हे सगळे टी.एन.शेषन यांच्या काळात सुरु झाले. जी निवडणूक प्रक्रिया आपल्या लोकशाही रचनांच्या मूलस्थानी आहे तीच सदोष राहिली तर त्यावर उभा केलेला डोलारा कसा टिकणारा. त्यातूनच व्यवस्था परिवर्तनाचे टप्पे उलगडत जातील…

…त्यापुढे व्यवस्था, सिस्टिम वगैरे संजय बराच काळ बोलत राहिला. बराच वेळ धृतराष्ट्र महाराजांच्याकडून कुठलीच प्रतिक्रिया येत नाही हे लक्षात आल्यावर त्याने महाराजांकडे पाहिले असता त्याच्या लक्षात आले की आपण सिस्टीम आणि त्यातील बदल वगैरे बोलत असताना त्यांचा डोळा लागला. स्वाभाविकच आहे. अशा ‘रिफॉर्म’ च्या चर्चा सुरु असताना सोयीस्कर दुर्लक्ष्य करीत डुलक्या काढण्याचा राजकारण्यांचा क्रम गेली पाच हजार वर्षे चालत आला आहे.

चित्र साभार – खलील खान

(प्रथम प्रसिद्धी: विवेक साप्ताहिक, मार्च २०१४. )

This entry was posted in विनोदी/ उपरोधिक and tagged , , , , . Bookmark the permalink.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s