राउंड द विकेट: सात जानेवारीच्या शुभेच्छा…

सात जानेवारीच्या शुभेच्छा…
.
RTW logo
.

.

.

.

.

नवे वर्ष सुरु होऊन एक आठवडा झाला आहे. नववर्ष संकल्पांचा उत्साह आता ओसरला असेल. स्वत:च्या सातत्याबद्दलच्या आपल्या भरमसाठ कल्पना ठिकाणावर आल्या असतील आणि अशा प्रसंगी जर एका अनपेक्षित कॉर्नर मधून चार समजुतीचे शब्द कानावर आले आणि मित्रत्वाचा सांत्वनपर हात पाठीवरून फिरला तर किती आनंद वाटेल? आपल्याला त्या आनंदाचा प्रत्यय निदान अंशत्वाने तरी मिळावा म्हणून हा लेखनप्रपंच आणि म्हणूनच सात जानेवारीच्या मित्रत्वाच्या शुभेच्छा.
.
7 janevarichya shubhechha.

एक जानेवारी. नव्या वर्षाचा पहिला दिवस. अनेक जुनेच संकल्प नव्या उत्साहाने पुन्हा करण्याचा दिवस. शालेय वयात असताना रोज दैनंदिनी लिहिण्याचा संकल्प करून एका एक जानेवारीला रात्री पूर्ण दिवसाचा वृत्तांत खुलासेवार लिहिल्याचे मला आठवते आहे. त्या दिवशी मला ते एक पूर्ण पानही अपुरे वाटले होते. संक्रांती पर्यंत तो उत्साह अर्ध्या पानावर आला. आणि संक्रांती पासूनच डायरी लेखनाच्या उत्साहावर जी संक्रांत आली आणि त्यामुळे ३० जानेवारीचा हुतात्मा दिन लेखणीने दिवसभर मौन पाळल्यामुळे कोराच गेला. वाढत्या वयानुसार डायरीचा आकार, किंमत इ. गोष्टी वाढत गेल्या तरीदेखील डायरी लेखनाची स्थिती कमी-अधिक प्रमाणात तशीच राहिली.

.

जी गोष्ट डायरी लिहिण्याची, तीच गोष्ट व्यायामाची, हस्ताक्षर सुधारण्याची आणि ‘यंदा अभ्यास नीट करायचा’ असे ठरवण्याची. दरवर्षी ३१ डिसेंबर च्या रात्री हे सारे फसलेले संकल्प अक्राळ-विक्राळ भुते होऊन स्वप्नात येतात. मी दचकून जागा होतो. उरलेली रात्र झोपे शिवाय जाते. कधीतरी पहाटे डोळा लागतो आणि नव्या वर्षी जाग येते तेव्हा घड्याळात सात-साडेसात वाजलेले असतात…आणि या वर्षी लवकर उठण्याचा संकल्पही जुन्या यादीत जाऊन पडतो.

त्यातल्या त्यात बरी गोष्ट अशी की आपल्या देशात नववर्ष दिन बरेचदा येतात. एक जानेवारी झाल्या नंतर दोन-तीन महिन्यातच गुढीपाडवा येतो. हिंदू पंचांगा प्रमाणे येणारा हाही एक नववर्षदिनच असतो. त्याच सुमारास एक एप्रिलला येतो आर्थिक वर्षाचा पहिला दिवस. सर्व व्यावसायिक, व्यापारी, उत्पादक यांच्या आर्थिक वर्षाचा पहिला दिवस. व्यापाराच्या, कारखानदारीच्या नावाखाली लोकांना ‘फूल’ करणारेही काही महाभाग असतात. त्यामुळे आर्थिक नववर्षदिन ‘एप्रिल फूल’ च्या दिवशी यावा हा योगायोगच नाही का?

त्यानंतर कधीतरी जून महिन्यातच शैक्षणिक वर्षाला सुरुवात होते. सर्व विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक यांच्या दृष्टीने एका नव्या वर्षाचा आरंभ होतो. विद्यार्थी व शिक्षकांच्या अनुक्रमे इयत्तेत व सिनीऑरिटी मध्ये एका वर्षाने  वाढ होते. त्यानंतर ऑगस्ट च्या मध्यावर येतो स्वातंत्र्यदिन. आपला देश आणखी एका स्वतंत्र वर्षात पदार्पण करतो. नंतर ऑक्टोबर – नोव्हेंबर मध्ये येतो दिवाळीचा पाडवा. विक्रम संवताचा पहिला दिवस. अनेक व्यावसायिक, व्यापार्‍यांसाठी नव्या वर्षाच्या चोपड्या घेण्याचा मुहूर्त. ह्याच सार्‍या कालखंडात आपला एक वाढदिवसही यतो. आपल्या दृष्टीने तोही खरा नववर्ष दिनच असतो. त्याव्यतिरिक्त नवरोज, ईद अशांसारखे सेक्युलर नववर्ष दिन येतात ते वेगळेच.

एखाद्या चांगल्या कामासाठी, निश्चय करण्यासाठी, संकल्पासाठी एखाद्या एक तारखेचे, एखाद्या नववर्षदिनाचे निमित्त शोधणार्‍या माझ्या सकट अनेकांना वर्षाकाठी बरेचदा येणारे हे सर्वच नववर्षदिन एखाद्या पर्वणी सारखे वाटतात. आपणा सर्वांना ह्या नव्या वर्षाच्या पहिल्या नववर्षदिनी भरपूर शुभेच्छा तर मिळाल्या असतीलच. पण आता, सात जानेवारीला, सेल्फ रिअलायझेशनच्या अत्युच्च क्षणी मी आपल्याला शुभेच्छा देतो आहे.

आता आपल्या जी-मेल अकौंट ची साफसफाई एक जानेवारीला झाली नाही. ठीक आहे…हा काही जीवन-मरणाचा प्रश्न नाही. फेसबुक वा तत्सम इ-टवाळखोरीत एका वेळेस मोजकी दहा…फार तर पंधरा मिनिटेच घालवायची हे पहिल्या आठवड्यात नाही जमले. इट्स ओके जमेल हळूहळू. कदाचित ‘तिथला’च एखादा ह्याबद्दल चांगली टीप देऊन जाईल. कुठल्याही प्रकारे ‘कनेक्टेड’ नसलेल्या वयस्क मामीला, मावशीला, काकाला भेटायचे राहून गेले पहिल्या आठवड्यात…अहो चालायचेच! अजून तीन विकेंड, एक ईद आणि एक २६ जानेवारी आहे की वट्ट! तेव्हा जमवा.

मुद्दा असा, की हे सर्व करण्याची धडपड आपण मनात बाळगतो हे तर आपल्या मनाच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. ही उभारीच नसेल तर काय उरेल आपल्याकडे? तेव्हा ह्या शुभेच्छा सदोदित आहेतच तुमच्यासाठी आणि तुमच्या बरोबर. ह्या वर्षातल्या कुठल्याही महिन्यासाठी कुठल्याही तारखेसाठी आणि कुठल्याही आठवड्यासाठी. लाइफटाइम व्हॅलिडीटी असलेल्या. त्या कधीही उघडा आणि वापरा. ६, १३, १९, २७…कधीही वापरा. तूर्तास ह्या स्वीकारा. सात जानेवारीच्या मनापासून शुभेच्छा!
.
(प्रथम प्रसिद्धी: साप्ताहिक विवेक,  जानेवारी २०१४)

This entry was posted in विनोदी/ उपरोधिक and tagged , , , , . Bookmark the permalink.

4 Responses to राउंड द विकेट: सात जानेवारीच्या शुभेच्छा…

  1. seema gokhale म्हणतो आहे:

    उत्तम

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s