आम भारतीय कॉंग्रेस: ‘काट्याच्या अणि’ वर तीन विरोधी पक्ष

 

आम भारतीय कॉंग्रेस: ‘काट्याच्या अणि’ वर तीन विरोधी पक्ष

RTW logo
.

.

..

.

.

दिल्लीत झालेल्या निवडणुक तिच्या निकालामुळे ऐतिहासिक ठरणार ह्यात काहीच शंका नाही. पहिल्यांदाच एखाद्या विधानसभेला तीन विरोधी पक्ष मिळाले आहेत. हा लेख छापून येईपर्यंत जर काही ‘चमत्कार’ होऊन एखाद्याचा शपथविधी झाला तर गोष्ट वेगळी, अन्यथा तीन-तीन पक्ष, त्यातील दोन राष्ट्रीय व एक आकाराने म्युनिसिपल पण आकांक्षांनी राष्ट्रीय, एकमेकाशी विरोधीपक्ष बनण्याची स्पर्धा करत आहेत असे अभूतपूर्व चित्र समोर आले आहेत. असे काही होईल ह्याची घटनाकारांनीही कल्पना केली नसेल. सर्वाधिक सिटा मिळवलेल्या पक्षाचा नेत्याने एकेकाळी पोलिओ-मुक्ती अभियानात एक डॉक्टर ह्या नात्याने महत्वाचे काम केले आहे. त्याला आज आपल्या विधानसभेला झालेला राजकीय पोलिओ पाहताना किती वेदना होत असतील? ‘सर्व शिक्षा अभियान’ प्रमाणे ‘सर्व विरोधी विधानसभा’ कशी असेल आणि कशी चालेल ह्याची काही (निरि)क्षणचित्रे…
.

एक: (स्थान- राजभवन) – दिल्लीचे नायब राज्यपाल ह्या पदाला आणि ते पद भूषविणाऱ्या साहेबांना भलतेच महत्व आले आहे. आजपर्यंत ते कोण आहेत आणि आहेत किंवा नाहीत ह्याची फारशी फिकीर कोणाला नसायची. अनेक जण त्यांचा उल्लेख ‘गायब’ राज्यपाल असा करायचे इतके त्यांचे अस्तित्व दृष्टीआड होते. एकंदर ‘राज्यपाल’ नावाच्या वानप्रस्थी सिस्टीम मध्ये लाल दिव्याच्या प्रकाशात आपल्या राजकीय प्रवासाचे (की फरफटीचे!) सिंहावलोकन करणाऱ्यासाठी भरपूर वेळ असलेल्या माणसाला आज राज्य चालवण्याची धावाधाव करायला लागणार. विधानसभा भरो वा न भरो रस्त्याच्या खड्ड्यांपासून ते सरकारी बाबूंच्या पगारापर्यंतच्या उठाठेवी ह्या वयात कराव्या लागणार. तीन ‘कर्ती’ मुले घरी आहेत पण घर चालवण्याची जबाबदारी म्हातारपणी पडलेल्या वृद्ध बापासारखी राज्यपालांची स्थिती झाली आहे.
.

दोन: (स्थान – विधिमंडळ कार्यालय) – नायब राज्यपाल बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना विधिमंडळ उपाहार गृहाचा आकार दुप्पट करण्या बद्दल सूचना देत आहेत. त्यांचे बरोबरच आहे. हा निर्णय त्यांना घाईने घ्यावाच लागणार. विधानसभेत बसणारे सर्वच विरोधीपक्ष असल्यामुळे अचानक सभात्याग केल्यावर माणसे उपहारगृहातच येणार ना? मधू दंडवते, रामभाऊ म्हाळगी, नाथ पै यांच्या काळात म्हणे ते सभात्यागानंतर भवनातील ग्रंथालयात जाऊन बसायचे. आजच्या काळात त्या अपेक्षेच्या भरवशावर राहण्यात काहीच अर्थ नाही. आजवर फार फार तर अर्धे आमदार विरोधी बाकांवर बसतील आणि सर्वांनी सभात्याग केला (आणि एकही ग्रंथालयात गेला नाही!) असे गृहीत धरून उपाहारगृहे डिझाईन केले होते. आज सर्व अधिकारी, तंत्रज्ञ मा. राज्यपाल साहेबांकडून कमीत कमी वेळात दुप्पट क्षमतेचे कसे करता येईल त्याची चर्चा करीत आहेत.
.

तीन: (स्थान – विधानसभा गृह) – सभागृहातील आतली रचना बदलण्यासाठी ‘विहित नमुन्यात’ ‘देकार’ मागवले आहेत. सभापतींच्या आसनासमोर अर्धवर्तुळाकार रचनेत असलेली सर्वच बाके विरोधीपक्षांची असणार आहेत. आणि सभापतींच्या जवळ पण विधिमंडळ कर्मचारी बसतात त्यांच्या अलीकडे ‘सत्तारूढ’ अधिकाऱ्यांची बसण्याची व्यवस्था करण्याची योजना आहे. शिवाय तीन राजदंड बनवण्यात येणार आहे. अनेकदा विरोधकांनी राजदंड पळवण्याची उदाहरणे आहेत. सभात्याग, निंदाव्यंजक ठराव विवध नियमांच्या अंतर्गत चर्चा आदि वैधानिक आयुधाप्रमाणे राजदंड पळवणे हे ही आयुध मानले जाते. आता तीनही विरोधीपक्षांना एकाचवेळी राजदंड पळवण्याची इच्छा झाल्यास कोणावर अन्याय नको म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे.
.

चार: (स्थान – विधानसभा अधिवेशन) शेवटी इलाजच उरला नाही. अभिभाषणानंतर मा. राज्यपालांनीच अर्थसंकल्प मांडला. त्याच्या उत्तरादाखल जेव्हा प्रमुख विरोधीपक्षनेत्यांनी म्हटले “हा अर्थसंकल्प लोकविरोधी आहे, चलनवाढीला खतपाणी घालणारा आहे आणि जनतेचे कंबरडे मोडणारा आहे…” त्यांचे बोलणे पूर्ण होण्याच्या आत अन्य विरोधी बाकांवरून एकच ओरडा सुरु झाला. अन्य विरोधीपक्षांचे म्हणणे होते की अर्थसंकल्पाच्या विरोधात बोलण्याचे तीन प्रमुख पारंपारिक आक्षेप एकाच पक्षाने मांडले तर आम्ही काय छपाई बद्दल आणि प्रुफ-रीडिंग बद्दल बोलायचे? राज्यपालांनी हा आक्षेप ग्राह्य मानून मुद्दे वाटून घेण्याची ‘व्यवस्था’ दिली.

aam bhartiya congress
पाच: (दिल्लीतील एक गल्ली) विरोधीपक्ष नंबर दोन च्या नेत्याकडे त्याच्या मतदारसंघातील एक ज्येष्ठ नागरिक गेले आणि म्हणाले “आम्ही स्थानिक ऑफिस मध्ये रस्ता दुरुस्तीसाठी गेले सहा महिने खेटे घालतोय काही होत नाही तुम्ही लक्ष घालणार का?” कमावलेल्या साधेपणाने चष्मा सावरत आणि नम्र नकार देत तो नेता बाणेदारपणे उद्गारला “आम्हाला लक्ष घालण्याचा जनादेश लोकांनी दिला नाही त्यामुळे मी लक्ष घालू शकत नाही पण जर का काम सुरु झाले तर त्यात काय काय अयोग्य झाले ह्याची लक्तरे आम्ही वेशीवर टांगल्याशिवाय राहणार नाही…” ते पाठमोरे वळल्यावर त्या ज्येष्ठ नागरिकाने त्यांच्या दिशेने हातांची ‘असंसदीय’ हालचाल केली आणि उद्गारले. “XXXजुनीच सिस्टीम चांगली होती. XX दोन पैसे खर्च व्हायचे पण निदान कामे तरी व्हायची!

This entry was posted in विनोदी/ उपरोधिक and tagged , , , , . Bookmark the permalink.

2 Responses to आम भारतीय कॉंग्रेस: ‘काट्याच्या अणि’ वर तीन विरोधी पक्ष

  1. Sadhana Sathaye म्हणतो आहे:

    mast article!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s