राउंड द विकेट: नॉन्सेन्स

नॉन्सेन्स
RTW logo.

.

.

.

.
काळी 7.15 :  ”नॉन्सेन्स!  अजून किती वेळा चहा ढोसणार आहात?” एक कडक प्रश्न आला. वाघ-बकरी किंवा, ‘कडक मिठी खुश्बूदार गिरनार ममरी’ चहापेक्षाही कडक… (पण मिठास आणि खुशबू वगळून!) मला प्रश्नातील ‘स्पिरिट’ नवे  नव्हते. नवा होता तो ‘नॉन्सेन्स’ शब्दाचा आघात. हे काय भलतेच? वडाच्या फेऱ्या अन-वाइंड झाल्या की काय? पाडव्याची ओवाळणी डी-मॅट करून माझ्या अकाऊंटमध्ये रिफंड केली की काय? करवा चौथला चंद्र चाळणीतून पाहण्याऐवजी कुकरच्या रिंगमधून पाहिला की काय? अशा परिस्थितीतही मला मजा सुचली. गुणगुणावेसे वाटले – ‘हंगामा क्यूं हैं बरपा, चाय ही तो पी है।’ पण तसे काही मी केले नाही. मला उलगडा झाला नसला तरी मी विषय न वाढवता मनातल्या मनात ‘नंतर बघू…’ असे म्हणत नरसिंहराव  सरकारसारखा ‘मामला विचाराधीन’ ठेवला.
.
सकाळी 8.30 : नाश्ता करून कामावर जायला निघालो. खाली रिक्षा होती. नेहमीप्रमाणेच एका रिक्षात बसत-बसत म्हणालो, ”स्टेशन.” ”अजून गॅस भरायचाय. बसण्यापूर्वी विचाराल की नाही रिक्षा खाली आहे का ते? उगाच बावटा अर्धा करून ठेवलाय काय… नॉन्सेन्स!” पुन्हा तेच. नेहमी बऱ्या बोलाने आणि सुहास्य वदनाने ‘बसा साहेब’ म्हणणाऱ्या रिक्षावाल्याला आज काय झाले?  आज युनियनने ‘नियमानुसार काम’ वा तत्सम आंदोलन सुरू केले की काय? पण तसे असते तर त्याला ‘नियमानुसार’ भाडे  नाकारता आले नसते. शिवाय ज्या भयंकर पध्दतीने ते रिक्षा चालवतात ते पाहता त्यांचे काम ‘नियमानुसार’ चालत नसून ‘यमानुसार’ चालते, असाही विचार माझ्या मनात येऊन गेला. भाडे नाकारणे या प्रसंगातही आपल्याला विनोद सुचतो आहे, हे आपण ‘प्रतिभावान’ असल्याचे लक्षण आहे अशी स्वयंप्रशस्ती करत मी दुसरी रिक्षा शोधू लागलो.
.
सकाळी 11.30 : ऑफिसमध्ये कामाचा पाहिला ‘स्पेल’ संपवत आता जरा पाय मोकळे करावे आणि ‘कटिंग’ घ्यावा असा विचार करत शेजारच्या डेस्कवरच्या रघ्याला म्हणालो, ”चल बे,  थोडा चहाबिहा पिऊन येऊ.” रघ्या विदर्भातील असल्यामुळे त्याच्याशी बोलताना हटकून ‘चल बे’, ‘सांगून राहिलो’ असे शब्दप्रयोग केले की तो एकदम खुशीत येतो, असा आजवरचा अनुभव. पण आज काहीतरी विपरीतच घडले. ”नको बे तुझा चहा… आणि ‘बिहा’च्या नावाखाली खारी, क्रीम रोल काहीही खातोस बे. पोटाचा सत्यानाश. नंतर डबाही संपत नाही माझ्याने.” खरे तर मीच त्याला म्हणणार होतो, ”नॉन्सेन्स, इतकी वर्षे हाच ‘चहा’ आणि ‘बिहा’ चेपतोयस आणि आज पोटाची काळजी सुचतेय काय?” पण मी काही बोलायच्या आत रघ्याच गरजला ”…आणि बारा ही काय चहा प्यायची वेळ आहे? नॉन्सेन्स!” माझ्या अनुच्चारित ‘नॉन्सेन्स’ची रघ्याच्या उच्चारित ‘नॉन्सेन्स’ने परतफेड झाली. मला एका गोष्टीची मजा वाटली. कु ठल्याही कामाला उशीर होऊ  नये म्हणून स्वत:चे घडयाळ अर्धा तास पुढे ठेवणारा रघ्या तीच वेळ खरी मानून आज खारी आणि चहा नाकारत होता. माझ्या ह्या निरीक्षणावर खूश होत्सासा मी रघ्याच्या ‘नॉन्सेन्स’ला माफ केले.
.

रात्रौ 8.30 :  घरी परतून एकीकडे रोजच्या पेपर्समधला संपादकीय पानांवरील मजकूर वाचत आणि एकीकडे मुलाने टी.व्ही.वर लावलेल्या इंग्रजी संगीतातील अनाकलनीय गोंगाटाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत असतानाच अचानक गोंगाट – सॉरी… गाण्याचा आवाज कमी झाला. स्पीकर्स बंद पडले की टीव्ही? असा प्रश्न पडून मी टीव्हीकडे पाहणार, तोच चिरंजीवच माझ्याकडे स्मितहास्य करत पाहत आहेत, हे माझ्या लक्षात आले. हा ‘प्रेमकटाक्ष’ मला नवीन नव्हता. मला कुतूहल होते त्या स्मितहास्यामागील कारणाचे आणि त्याहीपेक्षा त्या कारणाशी जोडलेल्या संभाव्य आर्थिक तोशिशीचे. आता कशाचीतरी प्रस्तावना येणार, असा मी अंदाज करत असताना माझा अंदाज चुकवत थेट आकडाच माझ्या कानावर आदळला. ”टू हंड्रेड ओन्ली, बाबा”

”अरे, ही काय पध्दत आहे? कशाला हवेत काही सांगशील की नाही?” मी विचारले. ”रिचार्ज’ करायचाय!”

”कोणाला?” मी विचारले.

”उगाच पीजे मारू नका. फोन रिचार्ज करायचाय.”

”पण परवाच केलास ना?” माझा बचाव. ”तुम्ही ज्याला परवा म्हणताय, त्याला दोन आठवडे झाले… आणि हा वेगळा. इंटरनेटचा.”

”अरे, माझ्या लॅपटॉपवर पाहताच की रात्री उशिरापर्यंत…” मी.

”बाबा, ‘पाहता’ काय म्हणता? इंटरनेट म्हणजे काय सिनेमा आहे पाहायला? आणि मी फोनवरच प्रिफर करतो. कधीही टचमध्ये राहता येतं.”

”मी काय कॉलेजमध्ये गेलो नाही? आम्हाला केवळ कॅन्टीनमध्ये वडापाव खायचे पैसे पुरायचे!”

मी म्हणालो खरा, पण माझे वाक्य पुरे होण्याच्या आत मुलगा उद्गारला, ”कारण तेव्हा इंटरनेट नव्हता बाबा …..”
.
‘बाबा’ नंतरची पुटपुट मला ऐकू आली नाही. पण दिवसभराच्या अनुभवांवरून तो बहुधा ‘नॉन्सेन्स’ म्हणाला असणार, असा विचार माझ्या मनात आला आणि मी जोरात ओरडलो. ”काय समजतं का तुला, काय बोलतोस ते?”…
.
”अहो ओरडताय काय…? आणि हे काय? काहीच लिहिले नाहीत अजून?” हिच्या बोलण्याने मला जाग आली. लिहायला म्हणून लवकर उठून बसलो आणि तेवढयात बसल्याबसल्याच पुन्हा डोळा लागला. ज्या पक्षाला आपण आयुष्यात मत दिले नाही, त्या पक्षाच्या युवराजाने आपल्याच पक्षाच्या वृध्द पंतप्रधानांची आणि त्यांच्या मंत्रीमंडळाच्या निर्णयाची जाहीरपणे ज्या शब्दाने संभावना केली, त्या शब्दाचा आपल्या मनावरही असा परिणाम व्हावा ह्या कल्पनेने मला हसू आले. मी लॅपटॉप पुढे ओढला आणि अनेक मिनिटे रिकाम्या राहिलेल्या टेम्प्लेटवर लेखाचे शीर्षक लिहिले…’नॉन्सेन्स!’

– मणिंदर

(प्रथम प्रसिद्धी: साप्ताहिक विवेक, १३ ऑक्टोबर २०१३)

 

This entry was posted in विनोदी/ उपरोधिक and tagged , , , , . Bookmark the permalink.

8 Responses to राउंड द विकेट: नॉन्सेन्स

  1. Ashish म्हणतो आहे:

    Khup chhan mani(inder). Ashach googlya taakat raha…

  2. Dr. Sadhana Sathaye म्हणतो आहे:

    nyce one!! enjoyed reading.

  3. priti kubal म्हणतो आहे:

    kya baat hai sir..hai mastach

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s