‘सेल’ आणि पुरुष
.
सध्या सगळ्या रस्त्यांवर सण – उत्सवांचा आणि खरेदीचा माहोल सुरु झाला आहे. येणाऱ्या संभाव्य ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी विविध क्लुप्त्या दुकानदार लढवीत आहेत. प्लास्टिकच्या बाहुलीला कपडे नेसवून त्या दर्शनी ठेवण्या पासून ते जोरजोराने ओरडून गिऱ्हाईकाचे लक्ष वेधून घेण्याच्या प्रकारा पर्यंत सगळे प्रकार सुरु झाले आहेत. हे दिवस आहेत सेल नावाचे एक वार्षिक ‘कर्मकांड’ सुरु होईल. मी स्वत: जरी ‘उत्साही’ खरेदीदार नसलो तरी एका उत्साही खरेदीदाराचा मुलगा, एका अति-उत्साही खरेदीदाराचा पती आणि एका हाय-टेक आणि ऑनलाइन खरेदीदाराचा बाप देखील आहे. अर्थात हे मी केवळ माझे ह्या विषयातील प्राविण्य अंडरलाईन करण्यासाठी सांगतो आहे. पुढील मजकुरातून महिलांच्या ‘पर्चेसिंग पॉवर’ बददल चुरचुरीत वाचायला मिळणार असे वाटणाऱ्या वाचकांनी विशेषतः पुरुषांनी भ्रमनिरास होण्यापूर्वीच अन्य पानांकडे मोहरा वळवावा.
.
एक मात्र खरे. महिलांच्या खरेदी प्रेमाचा पुरुषांनी इतका बभ्रा केला की त्याच्या आड पुरुषांनी स्वत:साठी वेळोवेळी केलेल्या चोखंदळ खरेदी आणि त्या साठी केलेला चिकित्सकपणा झाकला गेला. पुरुष-वर्गाची ‘खरेदी’ विषयातील तथाकथित निष्क्रियतेचा बुडबुडा आता फुटताना दिसतो आहे. स्वत:चे कपडे, परफ्युम, शेविंग आणि आफ्टर शेविंग सामुग्री इतकेच काय तर टूथ ब्रश ते शेविंग ब्रश पर्यंतचे ब्रश, त्याचे ब्रँड, आकार, रंग, पोत अशा विषयात पुरुषांच्या आवडी-निवडी आश्चर्यकारक रित्या बदलताना दिसत आहेत. टीव्ही समोरचे तास कमी होत आहेत आणि आरशासमोरचे वाढले आहेत!
.
असं म्हणतात की दुसऱ्याकडे आपण जेव्हा एक बोट दाखवतो तेव्हा उरलेली तीन बोटे आपल्याच दिशेने ‘अंगुलीनिर्देश’ करत असतात. पुरुषांचे अक्षरशः तसे होत चालले आहे. ‘इम्पल्स बाइंग’ किंवा ‘झटका खरेदी’ बददल महिलावर्गाची, त्यांनीच दिलेला चहा पितापिता, टिंगल करताना आपण देखील त्याच मार्गाने चाललो आहोत हे त्यांना कळलेच नाही. “ऑफिस मध्ये अमक्याचा – तमक्या परफ्युम्स घेऊन आला होता चांगला वाटला (तमक्या नव्हे…परफ्युम!) म्हणून घेऊन टाकला” असे आता होऊ लागले आहे. “मित्रा बरोबर त्याच्यासाठी शर्ट घ्यायला मॉल मध्ये गेलो. चांगला बार्गेन होता. दोनावर एक फ्री होता म्हणून घेऊन टाकले” अशी पाव डझन शर्ट खरेदीची घोषणा होऊ लागली आहे. कदाचित १५-२० वर्षांपूर्वी पर्यंत ही वर्षाकाठी खरेदी होणाऱ्या शर्टची संख्या असायची.
.
हातात फार फार तर लग्नाच्या वेळची अंगठी असण्याचे दिवस सरले. आता कोण्या ‘कलीग’ ला प्रत्यय आला म्हणून ‘लकी-स्टोन’ ‘स्टड’ करुन ‘रिंग’ मध्ये घालण्याचे प्रकार वाढले. (चान्स घ्यायला काय हरकत आहे. सेव्हन-फिफ्टी इस नथिंग!). महागडे इम्पोर्टेड पेन, सिगारेट ओढणारा असेल तर ‘स्लिक-डिझायनर’ लायटर (स्लीक हे लायटर चे विशेषण – डिझायनर चे नव्हे!), महागडा फोन, स्विस घड्याळ आदि नव्या ‘पुरुषी’ दागिन्यांची चलती सुरु झाली. त्यातून सुप्त चढा-ओढी मधून होणारी खरेदीही वाढली.
.
एकदा ‘क्रॉस’ नावाच्या कंपनीचे पेन दाखवत मित्र आला. त्याला म्हणे एका ‘सेल’ मध्ये स्वस्त मिळाले. “कितीला मिळाले असेल?” त्याने विचारले. आता सेल मध्ये आहे म्हणजे स्वस्त असणार असा हिशेब करुन आणि पेनच्या आजवर ऐकेल्या किमतीचा ‘मसावी’ काढून मी अंदाज वर्तवला…”असेल दीडशे चे” “दीडशे?” त्याने तुच्छता मिश्रित कणवेने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला ह्याची रिफील सुद्धा दिडशेला मिळणार नाही. पण मी तर तुला लिहिताना कधी पाहिले नाही? मी विचारले. तो म्हणाला “त्याचा काय संबंध? हे एक ‘अॅक्सेसरी’ म्हणून किती ‘एलिगण्ट’ दिसते. तू तर लिहिणारा आहेस, तू कुठले पेन वापरतोस. मी म्हणालो दहा रुपयात जे मिळेल ते!
.
यू.एस.बी पोर्ट वर चालणारा पंखा, शुभ-शकुन म्हणून घेतलेला क्रिस्टल पिरॅमिड, कार च्या लायटर पोर्ट च्या विजेवर चालणारा ‘कार व्हॅक्यूम क्लीनर’, एक कप पाणी उकळवणारी विजेची किटली…पुरुष काय वाट्टेल ते घ्यायला लागले आहेत. अति उत्साहात आणलेल्या ‘नॅशनल जॉग्रोफिक’ च्या सी.डी. कडे पोरं ढुंकून पाहात नाहीत किंवा क्रेडिट कार्ड च्या ऑफर वर घेतलेला ‘एलिगंट कटलरी सेट’ला बायकोने अद्याप ‘टेबल’ दाखवलेले नाही अशा क्षुल्लक गोष्टींनी ते अजिबात विचलित होत नाहीत इतके ते आता अट्टल खरेदीदार झाले आहेत आणि विक्रेतेही त्यांच्यासाठी वेळोवेळी ‘सेल’ लावतच आहेत.
.
आपण तसे नाही हे दाखविण्यासाठी मी एकदा घोषणा केली की मी यंदा एकही कपडा ‘सेल’ मधून आणणार नाही. माझा संकल्प टिकला नाही हे सांगायला नकोच. पण जर मी त्या संकल्पाला निग्रहाने चिकटून राहिलो असतो तर अंत्यविधीचे सामान मिळणाऱ्या दुकानातील झिरझिरीत पंचावर मला वर्ष काढावे लागले असते.
.
– मणिंदर
(प्रथम प्रसिद्धी: साप्ताहिक विवेक, २९ सप्टेंबर २०१३)
कित्ती बरं वाटलं वाचून म्हणून सांगू!!! सगळ्या मित्रांना लिंक forward केलीय… इथून पुढे अवाक्षर बोलणार नाहीत याविषयी!! शरद दा, तमाम स्त्रीवर्गाकडून Thank You!
धन्यवाद. वाचत जा. कळवत जा. अर्नब गोस्वामी जसा तमाम देशाच्या तर्फे विचारतो तसे तू तमाम स्त्रीवर्गाकडून thanks देतेस? फारच छान 😉
हाहाहा…
तुमचा ब्लॉग आहे हे आज पहिल्यांदाच कळले त्याबद्दल क्षमस्व !! फिलिंग – गर्वहरण, सूर्य-काजवा वगैरे !! असो…
लेख अप्रतिम आहे… आजूबाजूला कॉर्पोरेट वागण्याच्या नादात नकळत शॉपिंगच्या बाबतीत स्त्रियांच्या वारसा हक्काची ‘कॉपी’ करणारे कैक आहेत हे वाचताना जाणवत राहिले…
(थोडेसे टेक्निकल – बाकी हे टेम्प्लेट अप्रतिम आहे… ब्लॉगरलाही मिळेल का ?)
बाकी सर्वासाठी धन्यवाद.
टेक्निकल क्वेरी बद्दल: माहित नाही! 🙂
छान….मी पण असाच आहे याची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद …….
हा हा! धन्यवाद. वाचल्या बद्दल आणि आवर्जून कळवल्या बद्दल.
छान – मी किती मागासलेला आहे हे मला वारंवार ऐकवणाऱ्या पत्नी व मुलीसह आता तुम्ही पण … अरेरे !
हा हा हा!
शरदमणीजी; २०१३ साली किंवा तोपर्यंत जी परिस्थिती होती ती तुम्ही हुबेहूब मांडली. Nice observation. अहो आता दिल्ली किंवा मुंबई ला मंत्रालयातून तुमची काही काम काढून घ्यायला अशी काम करुन देण्याचं आश्वासन देणा-या भाटांचेही (हा sophisticated शब्द झाला खरा शब्द आहे; भाड्या) आताशा सेल लागतांत. अर्थात highest quote give nearly guarantee. तर असं आहे.
हा हा! धन्यवाद. वाचल्या बद्दल आणि आवर्जून कळवल्या बद्दल.