नुकतेच साहित्य संमेलन पार पडले. मराठी भाषा दिनही साजरा झाला. साहित्य संमेलनासंबंधी प्रकाशित झालेल्या बातम्या, लेख इत्यादी वाचताना काही वर्षांपूर्वी पार पडलेल्या साहित्य संमेलनाची फार आठवण झाली. माजी पंतप्रधान मा. पी. व्ही. नरसिंहराव त्या संमेलनात पाहुणे म्हणून आले होते. मराठी व अन्य भाषां यांच्यात देवाणघेवाण वाढली पाहिजे असे ते म्हणाले होते. शिवाय मराठीतील ‘उच्चभ्रू’ ‘मधुचंद्र’ अशा शब्दांची उदाहरणे देत ते म्हणाले की मराठीतील असे काही शब्द कळण्यासाठी माणसाला केवळ मराठी येऊन पुरणारे नाही…त्याला इंग्रजीही आले पाहिजे. असे मराठीत वेषांतर-भाषांतर करून बस्तान बसवलेले अनेक शब्द तर मराठीत आहेतच पण गेल्या काही दशकात थेट पणे, भाषांतरित न होता पण वेषांतर करून आलेले इंग्रजी शब्दही काही कमी नाहीत. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात ते असे काही पोचले आहेत की जेमतेम काही मराठी यत्ता शिकलेल्याच्याही तोंडात ते कायमचे मुक्कामाला आले आहेत.
.
आज गावोगाव सिनेमागृहे झाली आहेत. मी शाळेत असताना माझा मित्र मला छातीठोकपणे म्हणाला होता की ‘सिनेमा’ हा मराठी शब्द आहे…इंग्लिशमध्ये सिनेमाला ‘पिक्चर’ म्हणतात. ‘चित्रपट’ हा बहुधा संस्कृत शब्द असावा असे आम्ही दोघांनी मिळून ठरवून टाकले. एखादा सिनेमा चांगला चालला, सर्व तिकिटे विकली गेली की ‘हाउसफुल’ ची पाटी लागते. हा ‘हाउसफुल’ शब्द देखील इंग्रजांचा डोळा चुकवून भारतीय भाषांत आलेला शब्द आहे.
विदेशात ‘हाउसफुल’ हा प्रकार नसतो नुसतेच ‘फुल’ किंवा ‘सोल्ड’ अशा पाट्या लागतात. त्यामुळे ‘हाउसफुल’ हा देखील विदेशी रूप असलेला अस्सल देशी मामला आहे. ह्या शब्दाचा इतिहास मुंबई पासून सुरु होतो असे ह्या क्षेत्रातले जाणकार सांगतात. मुळात सिनेमा हा प्रकार ह्याच शहरातून लोकप्रिय झाला असल्यामुळे बहुधा हे खरे असावे.
.
.
सिनेमा क्षेत्राने ह्या बाबतीत भरपूर भर घालून भाषा ‘समृद्ध’ करण्यास हातभार लावला आहे असेच म्हणावे लागेल. आता ‘हिरो’ ‘हिरोईन’ हे शब्द तसेच्या तसे वापरले तर कोणीही समजू शकेल पण ‘साइड-हिरो’ व ‘साइड-हिरोईन’ हे मूळ इंग्रजीत नसलेले शब्दही सफाईदार पणे जन्माला घातले व आपलेसे करून टाकले. ‘प्ले-बॅक’ हा देखील असाच शब्द. विदेशात एखाद्या व्यक्तीला चित्रपटात दुसरा आवाज देण्यासाठी डबिंग हाच शब्द वापरला जातो. भारतात मात्र सिनेमा वाल्यांनी ‘प्ले-बॅक’ हा शब्द रूढ केला. हाही वरवर इंग्रजी रूप असलेला वाटला तरी तसा तो नाही. आता वापरून वापरून लक्षावधी लोकांच्या तोंडात बसल्यामुळे तो इंग्रजी शब्दकोशात जाऊन बसलाही असेल. पाठोपाठ प्ले-बॅक सिंगर व मराठीत त्याचाच अवतार असलेले पार्श्व-गायक पार्श्व-गायिका हे शब्दही बघता बघता प्रचलित झाले.
.
एखादा सिनेमा खूप चालल्यावर ‘सुपर हिट’ झाला असे म्हटले जाऊ लागले हे आपण समजू शकतो पण तेही वर्णन कमी वाटल्यामुळे की काय पण ‘सुपर-डुपर हिट’ असाही शब्दप्रयोग होऊ लागला. हा मध्ये घुसलेला ‘डुपर’ देखील इंग्रजी चेहरेपट्टी असलेला पण इंगजी नसलेला शब्द. त्यामानाने ‘रील्स’ ची मराठीत ‘रिळे’ झाली हे किरकोळच म्हणावे लागेल. एखादा सिनेमा आवडला नाही तर तो ‘बंडल’ आहे असे म्हटले जाऊ लागले. हे ‘बंडल’ देखील मूळ इंग्रजीतील पण त्याचा तिथे अर्थ होतो ‘अनेक गोष्टींचा गठ्ठा’; पण इथे त्याचे भाषांतर न होता अर्थांतर वा भावांतर झाले आणि न आवडणार्या वस्तूचे वर्णन करताना एक विशेषण म्हणून त्याचा वापर रूढ झाला.
.
अर्थात असे भाषिक पराक्रम केवळ सिनेमा वाल्यांनीच केले असे मात्र नाही. सगळ्यांनीच आपापल्या मकदुरा प्रमाणे व प्रतिभेप्रमाणे त्याला हातभार लावला. एखाद्या गोष्टीची ‘दुप्पट’ ह्या अर्थी ‘डबल’ हा शब्द मराठीत रूढ झाला हे आपण समजू शकतो. शहरीकरणामुळे असे शब्द वापरात येतात. पण गम्मत म्हणजे ‘तिप्पट’ ह्या अर्थाने ‘टिबल’ हा शब्द आपण सफाईने निर्माण केला, स्वीकारला आणि प्रचलित केला. आता खरे तर ‘दीड’ किंवा ‘दीड पट’ हा शब्द मराठीत किती जुना आहे? शाळेत नेहमीच्या पाढ्याच्या बरोबरीने दिडकी अडीचकी असायची असे माझे आई वडील सांगायचे. पण संध्याकाळच्या वा रात्रीच्या वेळी शहरा पासून काहीसे दूर जायचे म्हटल्यावर रिक्षावाला आपल्याला ‘हाफ-रिटन’ (रिटर्न नव्हे रिटन!) पडेल असे सहज सांगतो. वास्तविक त्याला दीडपट भाडे होईल असेच म्हणायचे असते! हा ‘हाफ-रिटन’ देखील इंग्रजी चेहरा मोहरा असलेला पण अस्सल मराठी ठसका असलेला शब्द आहे.
.
आजारी असल्याबद्दल ‘सिक’ आहे तर कधी ‘शिक्’ आहे असे हळू हळू रूढ झाले. त्यातूनच आजारपणाला ‘सिकनेसपणा’ व नंतर आलेल्या थकव्याला ‘विकनेसपणा’ इथवर मजल गेली. खरे तर गळ्यातली ‘सोनसाखळी’ हा अलंकार किती तरी शतके पुरुष व महिलांत सारखाच लोकप्रिय आहे पण इंग्रजीच्या साहचार्यामुळे त्या अलंकाराचीही म्हणता म्हणता ‘चैन’ झाली. ‘उत्तीर्ण’ ह्या अर्थी इंग्रजीत वापरला जाणारा ‘पास’ आपण स्वीकारलाच पण त्याच्याच विरूध्द अर्थी म्हणून ‘नापास’ नावाचा हायब्रीड भाऊही तयार केला.

गल्लीत क्रिकेट खेळताना ‘फोर’, ‘सिक्स’ हे तर तसेच्या तसे स्वीकारलेच पण तिथल्या काल्पनिक मैदानातील काल्पनिक चौकार रेषेच्या २५-५० फुट आधी अजून एक काल्पनिक रेषा कल्पून तिथवर मारलेला फटका ‘टू-डी’ म्हणून जाहीर व्हायचा. क्रिकेट मधील हे ‘योगदान’ आय.सी.सी. द्वारे उपेक्षितच राहिले! बांधकामात वापरणारी रेती चाळून खाली उरलेले टाकाऊ दगड-गोटे ‘शिंगल’ नामे प्रचलित कसे झाले आणि त्यासारखे अन्य टाकाऊ घटक मिळून झालेला निरुपयोगी ढिगारा ‘रॅबीट’ कसा झाला हे देवच जाणे!
.
गेल्या दोन दशकांत तर तंत्रज्ञानाच्या आणि नवनवीन वस्तूंच्या प्रभावामुळे अशा नव्या शब्दांचे भांडारच खुले झाले आहे. मोबाईल फोन वा सेलफोन आल्यानंतर त्याच्या वापरामुळे नवनवीन इंग्रजी शब्दांशी आपला परिचय झाला आणि आपली नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा त्यायोगे नवे शब्द वा त्यांचे अर्थ-भाव निर्माण करू लागली. एखाद्या ठिकाणी ‘नेटवर्क’ ची ‘रेंज’ मिळत नसेल तर ‘टॉवर’ मिळत नाही असे बोलले जाऊ लागले. फोन बराचवेळ वापरून डिस्चार्ज होत आल्यावर ‘जेम तेम दोन काड्या चार्जिंग उरलाय’ असे वाक्प्रचार रूढ झाले. कळस म्हणजे ‘मिस कॉल’ हा शब्द नाम व क्रियापद ह्या दोन्ही अर्थी वापरला जाऊ लागला.
‘जवळ आलास की मिसकॉल मार’ अशा सूचना दिल्या जाऊ लागल्या. ‘कंजूष मेली; कधी फोन करायची नाही. नेहमी मिसकॉल देईल’ अशा तक्रारी होऊ लागल्या. हे प्रकरण इतके वाढले की एखाद्या आंदोलनात ‘अमुक नंबर वर केवळ मिसकॉल द्या – तुमचे मत नोंदले जाईल’ असे आवाहनही होऊ लागले.
.
अर्थात अजून ‘सिक्स्थ सेन्स तंत्रज्ञान’ ‘नॅनो तंत्रज्ञान’ ‘स्टेमसेल तंत्रज्ञान’ ह्या गोष्टी रुळायच्या आहेत. त्या रुळल्यावर आपले लोक अजून कुठल्या कुठल्या नव्या शब्दांना जन्म देणार आहेत वा प्रचलित इंग्रजी शब्दांना देशी अर्थाची झूल चढवणार आहेत ह्याची कल्पनाच करवत नाही. जाऊ द्या…जेव्हा हे घडेल तेव्हा पाहता येईल. आत्तापासून कशाला हवाय ‘डोक्याला हेडेक’
(प्रथम प्रसिद्धी: सकाळ, मुंबई आवृत्ती, दि १२ मे २०१२)
समृद् + ध = समृद्ध
धन्यवाद. दुरुस्त केले आहे.
chaan !
धन्यवाद. आवर्जून कळवलेत हे फार चांगले झाले. लिहिणाऱ्याला हुरूप येतो.
कुल,म्हंजे आपली मराठी खरेच समृद्ध होतीयाय तर!
खरं आहे. भाषा अशीच समृध्द होते. आणि केवळ शब्दांनेच नव्हे तर काही वेळा शेजारच्या भाषेच्या व्याकरणाचे ही आघात घेअले जातात. अनेक वेळा विशेषत: टेलिफोन कंपन्यांच्या रेकॉर्डेड मेसेज मध्ये “आम्ही क्षमस्व आहोत” असे ऐकायला मिळते. नुसते ‘क्षमस्व’ म्हटले तरी तोच अर्थ ध्वनित होतो पण “we are sorry” ह्या वाक्यातील फक्त शब्द मराठी वापरून आणि इंग्रजीचे व्याकरण तसेच ठेवलेले आढळते. कालांतराने आपल्याला त्याचीही सवय होते. आहे की नाही गम्मत!
मस्त, छान झाला आहे लेख!
ते ‘रॅबिट’चे कोडे मलाही पडलेले आहे 🙂
स्थापत्य क्षेत्रात अशी अनेक कोडी आहेत. त्यामानाने ‘रॅबिट’ हे तर फारच मामुली!
nehamipramane mast! mahitipurna ani prasanna!
धन्यवाद. वाचत जा. कळवत जा. तुला ‘रीडर’ लिस्ट मध्ये add करतो म्हणजे नवे लिहिलेले मेल ने कळवत जाईन.
Uttam…farach sundar!!
तुला धन्यवाद तरी कसे देऊ? तू नेहमी कळवतोस. तसेच कळवत जा. मुख्य म्हणजे खटकलेले देखील कळव
mast. 🙂
धन्यवाद महेश.
manincha ek ajun dhammal….
thank you boss.
marathi ase aamuchi (mother)bholi……..amhi manato ti jagjanani
हा हा हा. भले शाब्बास.
Maja aali article vachun
धन्यवाद दोस्त.
पिंगबॅक 60 Things That Defined Your Childhood In India | GossipViews.com
पिंगबॅक 60 Things That Defined Your Childhood In India | Knowledge 'N' Entertenment
मस्त लेख. राबीट हे कदाचित रबिश चे अपभ्रष्ट रूप असेल. कचरा, उरलेसुरले असा ह्या शब्दाचा एक अर्थ आहे.
अजून काही शब्द
ड्याम्बीस, डामरट हेही शब्द इंग्रजीतून आले असावेत. पण ते फक्त मराठीतच आहेत.
पुण्यात पोहण्याच्या तलावाला अमुक टॅंक म्हणायची पद्धत आहे. टॅंक ह्या शब्दाचा स्विमिंग पूल असा अर्थ जगाच्या पाठीवर अन्य कुठेही ऐकलेला नाही.
पोस्टपोन असते मग त्याच्या विरुद्ध प्रीपोन असा एक नवा शब्द भारतात पैदा झाला.
छान लेख. सहज आठवले, मराठीतला जगन्नाथाचा रथ, आता ऑक्सफर्ड शब्दकोशात juggernaut असा वेष पालटून विराजमान आहे. मराठी ने इंग्रजी कडून घेतले खरे… आणि थोडेसे दिले पण आहे !