पहिला नववर्ष दिन

आज नव्या वर्षाचा पहिला दिवस. अनेक जुनेच संकल्प नव्या उत्साहाने पुन्हा करण्याचा दिवस. शालेय वयात असताना रोज दैनंदिनी लिहिण्याचा संकल्प करून एका एक जानेवारीला रात्री पूर्ण दिवसाचा वृत्तांत खुलासेवार लिहिल्याचे मला आठवते आहे. त्या दिवशी मला ते एक पूर्ण पानही अपुरे वाटले होते. संक्रांती पर्यंत तो उत्साह अर्ध्या पानावर आला. आणि संक्रांती पासूनच डायरी लेखनाच्या उत्साहावर जी संक्रांत आली त्यामुळे ३० जानेवारीचा हुतात्मा दिन लेखणीने दिवसभर मौन पाळल्यामुळे कोराच गेला. वाढत्या वयानुसार डायरीचा आकार, किंमत इ. गोष्टी वाढत गेल्या तरीदेखील डायरी लेखनाची स्थिती कमी-अधिक प्रमाणात तशीच राहिली.

—————-

जी गोष्ट डायरी लिहिण्याची, तीच गोष्ट व्यायामाची, हस्ताक्षर सुधारण्याची आणि ‘यंदा अभ्यास नीट करायचा’ असे ठरवण्याची. दरवर्षी ३१ डिसेंबर च्या रात्री हे सारे फसलेले संकल्प अक्राळ-विक्राळ भुते होऊन स्वप्नात येतात. मी दचकून जागा होतो. उरलेली रात्र झोपे शिवाय जाते. कधीतरी पहाटे डोळा लागतो आणि नव्या वर्षी जाग येते तेव्हा घड्याळात सात-साडेसात वाजलेले असतात…आणि या वर्षी लवकर उठण्याचा संकल्पही जुन्या यादीत जाऊन पडतो.

—————–

त्यातल्या त्यात बरी गोष्ट अशी की आपल्या देशात नववर्ष दिन बरेचदा येतात. एक जानेवारी झाल्या नंतर दोन-तीन महिन्यातच गुढीपाडवा येतो. हिंदू पंचांगा प्रमाणे येणारा हाही एक नववर्षदिनच असतो. त्याच सुमारास एक एप्रिलला येतो आर्थिक वर्षाचा पहिला दिवस. सर्व व्यावसायिक, व्यापारी, उत्पादक यांच्या आर्थिक वर्षाचा पहिला दिवस. व्यापाराच्या, कारखानदारीच्या नावाखाली लोकांना ‘फूल’ करणारेही काही महाभाग असतात. त्यामुळे आर्थिक नववर्षदिन ‘एप्रिल फूल’ च्या दिवशी यावा हा योगायोगच नाही का?

—————-

त्यानंतर कधीतरी जून महिन्यातच शैक्षणिक वर्षाला सुरुवात होते. सर्व विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक यांच्या दृष्टीने एका नव्या वर्षाचा आरंभ होतो. विद्यार्थी व शिक्षकांच्या अनुक्रमे इयत्तेत व सिनीऑरिटी मध्ये एका वर्षाने  वाढ होते. त्यानंतर ऑगस्ट च्या मध्यावर येतो स्वातंत्र्यदिन. आपला देश आणखी एका स्वतंत्र वर्षात पदार्पण करतो. नंतर ऑक्टोबर – नोव्हेंबर मध्ये येतो दिवाळीचा पाडवा. विक्रम संवताचा पहिला दिवस. अनेक व्यावसायिक, व्यापार्‍यांसाठी नव्या वर्षाच्या चोपड्या घेण्याचा मुहूर्त. ह्याच सार्‍या कालखंडात आपला एक वाढदिवसही यतो. आपल्या दृष्टीने तोही खरा नववर्ष दिनच असतो. त्याव्यतिरिक्त नवरोज, ईद अशांसारखे सेक्युलर नववर्ष दिन येतात ते वेगळेच.

—————–

एखाद्या चांगल्या कामासाठी, निश्चय करण्यासाठी, संकल्पासाठी एखाद्या एक तारखेचे, एखाद्या नववर्षदिनाचे निमित्त शोधणार्‍या माझ्या सारख्या अनेकांना वर्षाकाठी बरेचदा येणारे हे सर्वच नववर्षदिन एखाद्या पर्वणी सारखे वाटतात. आपणा सर्वांना या नव्या वर्षाच्या पहिल्या नववर्षदिनी मनापासून शुभेच्छा!



This entry was posted in ललित. Bookmark the permalink.

8 Responses to पहिला नववर्ष दिन

  1. विवेक सिनारे म्हणतो आहे:

    खूप छान ! रेफ्रेश करणाऱ्या शुभेच्छा मिळाल्या . खरोखर चांगले काम करण्या साठी किती सारे मुहूर्त आहेत आपल्याकडे.

  2. sumedha म्हणतो आहे:

    शरदमणी,

    नवीन वर्षाच्या सुरुवातीला जोमदार लेख वाचून बरे वाटले .बरेच दिवसात लिहिले नव्हते का काही ? मेलबॉक्स मध्ये काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते . नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा .

    • sharadmani म्हणतो आहे:

      धन्यवाद. वाचल्या बद्दल आणि प्रोत्साहना बद्दल. तसे लिहीत होतो पण पोस्ट केले नव्हते. आता नियमाने blog वर प्रसिद्ध करायचे ठरविले आहे. बघुया.

  3. Kanchan म्हणतो आहे:

    Chaan! Nav varshachya shubheccha!

  4. mahesh म्हणतो आहे:

    खरंय! नववर्षाच्या संकल्पांची अक्षरश: होळी होते!!! म्हणुन ह्या वर्षी संकल्प करायचाच नाही असं ठरवुन टाकलं…. ‘संकल्प करणे’ आणी ‘ठरवणे’ यांत फरक आहे का? नेमका काय??? असो, नववर्षाच्या शुभेच्छा!!!

    • sharadmani म्हणतो आहे:

      धन्यवाद. वाचल्या बद्दल आणि प्रोत्साहना बद्दल.
      तुला नरसिंह राव साहित्य संमेलनात काय म्हणाले ते आठवताय का? ते म्हणाले की मराठी नीट कळण्यासाठी English नीट आली पाहिजे! अन्यथा उच्चभ्रू, मधुचंद्र असे शब्द कळणार नाहीत. ज्याला ’decide’ आणि ‘resolve’ ह्यातला फरक समजेल त्याला ‘ठरवणे’ आणी ‘संकल्प करणे’ ह्यातील फरक सहज कळेल!
      असो, नववर्षाच्या शुभेच्छा!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s