बोलाचीच कढी बोलाचाच भात.

बोलाचीच कढी बोलाचाच भात.

——————————–

ज्यांनी गेल्या शनिवारचा स्तंभ वाचला असेल त्यांना आजचे लेखन हे मागच्याच स्तंभाचा पुढला भाग आहे असे वाटल्यावाचून राहणार नाही. प्रत्यक्ष काही उचलून न देता केवळ गोडगोड बोलणार्‍या सर्वांनाच शाब्दिक माराचा अखिल भारतीय प्रसाद मिळाल्याचे दिसून येते. मथळ्यात लिहिलेली म्हण आपण आपल्या घरातील वडीलधार्‍या महिला मंडळींकडून विशेषत: आजीवर्गा कडून कडून कधीतरी ऐकली असेलच. तशीच फारशी प्रचलित नसलेली एक म्हण मराठी मधे आहे. “चुटक्यांचा मांडव, मुटक्यांच्या घुगर्‍या”. ह्याच अर्थाची हिंदीमधील म्हण मात्र काहीही सांकेतिक वगैरे न सांगता थेट मुद्दा मांडणारी आहे “चिकनी चुपडी बातोंसे पेट नही भरता” हिंदीतच ह्या अर्थीची आणखी एक म्हण आहे आणि ती मात्र पहिल्या म्हणितल्या थेटपणाशी सुतराम संबंध नसलेली, तिचा मतीतार्थ आहे “ना दाणा द्यायचा ना गवत द्यायचं, फक्त सहा वेळा खरारा करायचा” किंवा “देना थोडा दिलासा बहुत” (हिंदीतला दिलासा म्हणजे आश्वासन!), “नापे सौ गज, फाडे न एक गज” , “मन उमराव कर्म दरिद्री“, “मिस्सोंसे (मक्याने) पेट भरता हैं, किस्सोंसे नही” “लड्डू कहे मूँह मीठा नहीं होता” अशा अनेकविध म्हणींमधून मथळ्यात दिलेला भावार्थ प्रभावीपणे सांगितलेला दिसतो.

—————————–

उर्दूमध्ये व पंजाबीमध्ये हाच आशय सांगितला आहे “आग कहने से मूँह नहीं जलता” ह्या म्हणीमधून. काश्मिरीमध्ये “केवळ बोलतोय पण शिजवत तर काहीच नही” अशी तक्रारवजा म्हण आहे तर सिंधीमध्ये “केवळ अन्न पाणी म्हटल्याने तहान भूक शमत नही” असे बजावले आहे. शिवाय “बोलाच्या पुलावावर तुपाला काय तोटा” किंवा “हलवा हलवा असे बोलल्याने तोंड गोड कसे होईल” असा तडक सवाल केला आहे. शिवाय मघा हिंदीमधील सांगितलेल्या एका म्हणीचा गुजराती अवतारही आहे “गज गज बोलतो पण इंचभर सुद्धा फाडत नाही”. “जर बोलाचेच वाढायचे तर अगोड कशाला वाढायचे” अशी, खोचक पणाला मराठीशी पैजा जिंकणारीही, एक म्हण गुजरातीमध्ये आहे.

————————————–

तिकडे पूर्वेला बांग्लामध्ये “केवळ गप्पांनी भात शिजत नाही” असे सांगितले आहे; तर उडिया मध्ये एका म्हणीत “न देता धन मारे केवळ गप्पा” असे न देणार्‍याचे वर्णन केले आहे. तर दुसरीकडे “जो पर्यंत चंद्र-सूर्य आहेत तो पर्यंत देईन देईन म्हणत राहा” असे उपरोधिक पणे म्हटले आहे. शिवाय मिशीमध्ये अडकलेल्या पाण्याने काय तहान भागणार आहे?” अशी काहेशी विचित्र म्हणही त्या भाषेत प्रचलित आहे!

—————————————

दक्षिण भारतातील भाषांमधेही ह्या विषयातल्या म्हणींचा मोठा व वैविध्यपूर्ण साठा आहे सुरुवातीला तमिळ मधील काही म्हणी पाहूया. “केवळ ‘शांती’ म्हणण्याने शांती लाभणार आहे का?”, “केवळ ‘साखर’ म्हटल्याने गोड लागणार आहे का?”, “केवळ ‘पाणी’ म्हटल्यामुळे आग विझेल का?”, “केवळ ‘आग’ म्हटल्यामुळे तोंडाची आग होईल का?” अशा काही थेट म्हणी त्या भाषेत आहे. शिवाय “जेवण जेवल्याने भूक भागते, केवळ जेवणाच्या दर्शनाने नाही” किंवा “स्वप्नात पाहिलेला तांदूळ जेवणासाठी उपयोगी पडेल का?” किंवा “मंत्र म्हटल्याने काय आंबा झाडावरून पडणार आहे?” अश्या, तोच मुद्दा ‘राउंड द विकेट’ सांगणार्‍याही काही म्हणी तमिळ मध्ये आहेत.

—————————-

तेलुगूमध्ये तर “वैद्याचे नाव घेतल्याने काय आजार बरा होणार आहे?”, “विहिरीवर जाऊन काहीतरी पुटपुटल्याने काय पोहणे येणार आहे?”, “स्वप्नात आलिंगन दिल्याने काय गर्भधारणा होईल?” असा चढत्या क्रमाने ‘हैद्राबादी’ झटका देणार्‍याही अनेक म्हणी आहेत. कन्नड मध्ये “ना जेऊ घातले ना न्हाऊ घातले पण भाच्यांवर ‘माया’ अपार” असे उपरोधिकपणे वर्णन करणारी एक म्हण आहे. “तेल विकणारीची तुमच्यावर माया आहे पण म्हणून काय तुमचे डोके थंड होणार आहे (तेल न घालता)” असे प्रसंग वर्णन करणारी, “चित्रातील हत्तीला काय पिल्ले होणार आहेत?” किंवा “चित्रातील दुधीभोपळा काय भाजी करण्यासाठी उपयोगी येणार आहे?”अशी तडक विचारणा करणारी, “स्फुंदून-स्फुंदून रडण्याने काय जाते फिरणार आहे” अश्या एक ना अनेक म्हणी कन्नड मध्ये आहेत. त्या व्याविरिक्त आतापर्यंत पर्यन्त उल्लेख झालेल्या अनेक म्हणींचे थोड्याफार फार फरकाने येणारे असंख्य म्हणी दक्षिणेकडील भाषांमध्ये आहेत.

————————————–

भाषेच्या संदर्भात हिंदीमध्ये एक म्हण फार प्रचलित आहे. “कोस कोस पर पानी बदले चार कोस पर बानी”. भारतासारख्या खंडप्राय देशात दर चार कोसावर बदलणार्‍या विविध भाषांमधूनही अस्तित्वात असणारे हे आंतरिक एकात्मतेचे सूत्र कै. विश्वनाथ नरवणे यांनी मोठ्या कष्टाने आपल्या समोर आणले आहे. त्यासाठी १९६४ ते १९७६ अशी तब्बल बारा वर्षे त्यांनी देशभर प्रवास केला. भारतीय भाषांतल्या ह्या व अशा म्हणी पाहिल्यावरच त्यांच्या मध्ये अस्तित्वात असलेल्या ह्या एकात्मतेच्या सूत्राचे दर्शन तर आपल्याला होतेच त्याचबरोबर एवढ्या अवाढव्य देशातल्या डझनावारी भाषा बोलणार्‍या लोकसमूहाने ते पिढ्यांपिढ्या कसे संक्रमित केले असेल ह्याचे आश्चर्यही वाटल्याशिवाय राहत नाही. कदाचित ‘सूत्र’ कसे व कोणाकडून स्वीकारायचे असे पेच फक्त ‘अभिजनांना’ पडत असावेत ‘लोकांना’ नाही.

संदर्भ: भारतीय कहावत संग्रह, स्व. विश्वनाथ नरवणे

(प्रथम प्रसिद्धी: ’मायबोली’, सकाळ, मुंबई, शनिवार  ०३ एप्रिल  २०१०)

This entry was posted in भाषा भगिनींची एकात्मता and tagged , , . Bookmark the permalink.

1 Responses to बोलाचीच कढी बोलाचाच भात.

  1. हेमंत मराठे म्हणतो आहे:

    वा शरद फारच छान !
    उत्तम लेख.
    पुढील लेखांकारता शुभेच्छा !
    हेमंत

यावर आपले मत नोंदवा