चैत्र चित्रे

मुंबईत चैत्र कधी येतो. धुळवडी नंतर (ज्या धुळवडीला भलेभले मुंबईकर न विसरता रंगपंचमी म्हणतात. पौर्णिमेनंतरच्या लगेचच्याच दिवशी येणारा दिवस पंचमी कसा असेल अशी पुसटशीही शंका त्यांच्या मनात येत नाही. असो!) सुमारे २ आठवडयाने. होळीनंतर काही दिवसातच कोकिळेचे कुहू-कुहू सुरू होते. मी मुंबईत रहाणाऱ्या अशा भाग्यवंतां पैकी आहे की ज्यांच्या परिसरात दरवर्षी कोकिळ फॅमिलीची पंखधूळ पडते. एके वर्षी तर मुंबईच्या प्रदुषणामुळे म्हणा किंवा आमच्या आसमंतातील असंख्य सामिष उपहारगृहांतील उरल्या सुरल्यावर कावळयाच्या नादाने चोच मारल्यामुळे म्हणा पण एका कोकिळेचा आवाज बसलेल्याचेही माझ्या चांगले स्मरणात आहे. एरवी सुमधुर वाटणारे कोकिळेचे कुहू-कुहू आवाज बसल्या नंतर किती भेसूर व करुण वाटते त्याचा अनुभव मी घेतला आहे. माझ्या मित्रांना जेव्हा मी हा माझा अनुभव सांगितला तेव्हा त्यांनी मित्रधर्माला स्मरून सुरूवातीस अविश्वास दाखवला. कोकीळेचा आवाज कसा बसेल? तुझाच कान बसला असेल! इत्यादी भाष्य करून हाहाहीही करून झाले; शेवटी एका चहा-भज्यांची किंमत चुकवून का होईना पण ‘ही कोकिळा व हा बसका आवाज’ असे सिध्द करण्यात मी यशस्वी झालो.

————————————

ते असो…. मी सांगत होतो चैत्राबद्दल. मुंबईत चैत्र आला म्हणून निराळे काही घडत नाही. वसंतॠतूचे आगमन, कोवळी पालवी वगैरे सारी पुस्तकात वाचलेली माहिती. मायनॉरिटीत गेलेल्या कोकिळांचे कूजन हे केवळ तुरळक अपवाद. मुंबईकरांना चैत्राच्या आगमनाचा सुगावा लागायचा तो अर्थातच पंचांगातून; व पंचांगही इतिहास जमा झाल्या पासून साळगावकारांच्या कालनिर्णय मधुन. बाजारात कैऱ्यांचे विपुल दर्शन घडू लागले, हिवाळयात पंधरा रुपयांच्या खाली घसरलेले मटारचे भाव विसाच्याही वर चढू लागले, महापालिकेचे मार्च अखेरीचे बजेट संपायच्या आत रस्त्यांवर डांबराची ओताओत सुरू झाली, पेपरात पंतप्रधाना पेक्षाही अर्थमंत्र्यांच्या बातम्या व फोटो अधिक दिसू लागले. रात्रीची प्लेझंट वाटणारी हवा क्रमाक्रमाने अधिक गरम होऊ लागली व घराघरातून अभ्यासाचा.. परीक्षांचा गलका सुरू झाला की समजावे चैत्र जवळ आला. मुंबईत चैत्राची चाहूल अशी अप्रत्यक्ष पणे का होईना लागते तरीपण वसंतॠतूचे आगमन वगैरे तर अक्षरश: अमूर्त गोष्टी.

—————–

माझ्या मनातल्या चैत्राच्या आठवण म्हणजे वसंताची चाहूल नव्हे तर परीक्षांची चाहूल. होळीच्या पुरणपोळयांवर वा गुढीपाडव्याच्या श्रीखंड-जिलब्यांवर अभ्यासाच्या, परीश्रेच्या तयारीच्या तगाद्याचा वर्ख कायमचाच लागलेला. अर्थात वसंतॠतूच्या प्रारंभीचा परीक्षाज्वर वगैरे फार टिकायचा नाही. शाळेच्या परीक्षांच्या शेवटच्या पेपराचे टाकणे टाकले की साधारण एप्रिलच्या मध्यावर ‘मे महिन्याची सुटी’ (मुलाच्या परिभाषेतले उन्हाळयाच्या सुटीचे नाव!) सुरू व्हायची. भाडयाची सायकल चालवणे, समुद्रावर वाळूत खेळायला जाणे, झाडावर चढणे, पडलेल्या, पाडलेल्या किंवा आईने लोणच्यासाठी आणलेल्यातल्या पळवलेल्या कैर्‍यांची दुपारी तिखटमीठ लावून पार्टी करणे व त्यासोबत आणखी तिखटमीठ लावून ‘प्रत्यक्ष पाहिलेल्या’ भूताच्या गोष्टी सांगणे असा दोन महिने चालणारा व्यक्तिमत्व विकासाचा एक अनौपचारिक कार्यक्रम सुरू व्हायचा. त्यावेळी आमच्या पालकांनी छंदवर्ग, साहसशिबीर, व्यक्तिमत्व विकास शिबिर, अशा आकर्षक नावांच्या बेगडात गुंडाळलेल्या एखाद्या उन्हाळी शाळेत घातले नाही हे आमच्यावर उपकारच म्हणायचे. त्यावेळी आमच्या घरासमोरच्या रस्त्यावर फारशी रहदारी नसायची. काँक्रीटचा जाडजूड थर घालून त्याचा विकास झालेला नव्हता. त्या काळयाभोर रस्त्यावर भरउन्हात सायकल चालवणे हा अविस्मरणीय अनुभव होता. चेहर्‍यांवर गरम वार्‍याचा शेक जाणवत असायचा. दूरवर, साधारण महापौरांच्या बंगल्याच्या आसपास, त्या डांबरीरस्त्यावर मृगजळही दिसायचे. कदाचित तेव्हाच मनात कुठेतरी राजकीय प्रतिष्ठेची ठिकाणे व मृगजळ ह्यांचे समिकरण डोक्यात फिट बसले असावे.

————————–
 

चैत्राची आणखी एक आठवण म्हणजे आमच्या घराजवळ रस्त्यावर असलेल्या पिवळया फुलांच्या झाडाची आठवण. आमच्या घराच्या दारात एक झाड आहे. शब्दश: सांगायचे तर आवाराच्या दाराबाहेर रस्त्यावर आहे ते. पूर्वी फुटपाथवर होते; पण जसा जसा रस्त्याचा विकास होत गेला तसा तसा फुटपाथ आज्ञाुंच्चन पावत मूळ रुंदीच्या पावभर उरला. आणि माझ्या लहानपणी फुटपाथ वर सुरक्षित असलेले ते झाड अक्षरश: रस्त्यावर आले.

 

साधारणत: चैत्र महिन्याच्या आसपास त्याला पिवळया रंगाची फुले धरतात. देठाच्या बाजूला किंचित तपकिरी होत जाणाऱ्या तीन-चार पाकळयांची फुले दिसायला लागतात आणि काही दिवसांतच हजारो फुलांनी लगडलेले झाड पूर्ण पिवळे होऊन जाते. आकारा-रुपाने ते झाड म्हणजे गुलमोहराचाच जत्रेत हरवलेला भाऊ वाटतो. ह्या झाडाला सोनमोहर म्हणतात हे मला अगदी अलिकडे समजले.

—————————–
 

ते झाड माझ्या व माझ्या भावंडांच्या बालपणाचा एक अविभाज्य भाग बनून गेले होते. उन्हाळयाच्या सुटीतील असंख्य उपक्रम (कीउपव्याप!)ह्या झाडाच्या सहभागाने झाले होते. लपालपी / डबाऐसपैस / भोज्ज्या असल्या खेळात एका भिडूची लपण्याची सोय ह्याझाडाने अनेक वर्षे केली. झाडाच्या दृष्टीने आजही हरकत नसावी, पण आमचे आकार वाढण्याचा वेग व झाडाच्या बुंध्याचा व्यास वाढण्याचा वेग ह्यात थोडी तफावत आहे!अंगणात केलेल्या मातीच्या किल्ल्याच्या सजावटीतील मोठा भार ह्या झाडाच्या फुलांनी उचलला होता. रस्त्यावरील मैलाच्या दगडापासून ते खांब्यावरील दिव्या पर्यंतच्या सर्व भूमिका त्या फुलांनी निमूटपणे निभावल्या. त्या किल्ल्यातील परिसराच्या शोभेकरता आवारात आपोआप वाढलेली अनेक रोपटी उपटून लावण्यात आली. विविध मापाच्या व आकाराची पाने असलेल्या सर्व झाडांना फुले मात्र एक सारखी पिवळी! नाचातील राधाकृष्णां च्या गळयात हार पडायचे ते ह्याच फुलांचे. एका सुटीत तर दणक्यात साजरे केलेलेभावला-भावलीचे लग्न ह्याच फुलांच्या भरवशावर पार पडले होते. मोठे झाल्यावर ही त्याफुलांच्या पाकळया पुस्तकात सुकवुन त्यांचे भेटकार्ड ही आम्ही भावंडे बनवत असू.

———————————–
 

त्या फुलांना ना सुगंध, ना लांब सडक डेख. देव पूजे पासून फुलदाणी पर्यंतच्या कुठल्याही मोठयांशी संबंध येणार्‍या गोष्टीं साठी ते अत्यंत निरुपयोगी. कदाचित त्यामुळेच असेल, पण त्या फुलांवर आम्हा लहानांचा मालकी हक्क स्थापन झाला होता. ते झाड किंवा त्याची ती पिवळी फुले कधी धडा बनून आमच्या अभ्यासात  आले नाही. ना त्याचा कधी उभा छेद करायला लागला ना त्याचे परागकण सूक्ष्मदर्शकाखाली बघावे लागले आणि ना कधी त्याची आकृती काढून जरनल नावाची मगजमारी करावी लागली. बहुधा त्यामुळेच त्या झाडांची व फुलांची दोस्ती अगदी पक्की होऊन गेली. संपूर्ण सुटीभर आमच्या धमालीत हे झाड सहभागी होऊन जायचे. म्हणता म्हणता निकालाची वेळ यायची. मग यथातथा मिळालेल्या मार्कांच्या प्रगतीचा दस्तावेज घेऊन काहीसे हिरमुसले होऊन घरी येताना हाच मित्र मना पासून आणि न विसरता आमच्या वर पुष्पवृष्टी करायचा.

—————————
 

दर वर्षी आयुष्यातल्या आणखी एका चैत्राला सामोरे जाताना ह्या सगळया चित्रांचा पट उजळणी केल्या सारखा झर्रकन डोळया समोरून सरकत जातो. वाढत्या वया बरोबर सवड नसण्याची सवय होऊन गेली व निसर्गाचा नित्य आनंद घेण्याचा उत्साहही मावळला नसला तरी झाकाळला मात्र गेला. त्या झाडाशी असलेले नाते आता नाममात्र  होऊन गेले. “सिग्नलहून पुढे आलास ना की अर्ध्या मिनिटाच्या ड्राईव्ह नंतर एक  झाड लागेल त्या मागचेच घर… ” असा कधीतरी नव्याने येणाऱ्याला पत्ता सांगण्यापुरता प्रासंगिक संबंध उरला त्या झाडाशी.

—————————

…झाड मात्र नित्यनेमाने वार्षिक वसंतोत्सव साजरा करीतच आहे, त्याच  पिवळया फुलांची पखरण नव्या काँक्रीटचा रस्त्यावर दर चैत्रात सवयीने करतेच  आहे.

(प्रथम प्रसिद्धी: चैत्रेय, २०१० संपादक – प्रा. डॉ. नरेंद्र पाठक )

This entry was posted in ललित and tagged , . Bookmark the permalink.

20 Responses to चैत्र चित्रे

 1. Kanchan म्हणतो आहे:

  Khoopach sunder lekh!

 2. sharadmani म्हणतो आहे:

  धन्यवाद. मला अपेक्षा नव्हती की मी हा लेख upload केल्या केल्या ५ मिनिटातच कोणाची प्रतिक्रिया येईल. पुन्हा एकदा धन्यवाद. (वाचक म्हणजे देव!)

 3. हेमंत मराठे म्हणतो आहे:

  फारच छान लेख ! खूप आवडला.
  जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
  धन्यवाद
  हेमंत

 4. मिलिंद म्हणतो आहे:

  षटकारांनी भरलेला लेख आहे, आणि वासंतिक भूतकाळात घेतलेले झोके तर एकदम धमाल आहेत…
  आम्‍ही प्रसन्‍न झालो!!

 5. Durgesh Borade म्हणतो आहे:

  Ati sunder

 6. पिंगबॅक चैत्र चित्रे | indiarrs.net Featured blogs from INDIA.

 7. Gadgil Anand D. म्हणतो आहे:

  Zhakas Lekh!!

  Phakta Tumhala Marks Kamee Padayche he aamchya pachani padat naahi!!

 8. sharadmani म्हणतो आहे:

  खरे तेच लिहिले आहे. असो. प्रोत्साहना बद्द्ल आभारी आहे. असाच लोभ राहावा ही विनंती

 9. Bhanudas ukarande( Solapurkar) PUNE म्हणतो आहे:

  Sharadmani maharaj..
  Even in PUNE we have a no opportunity 2 see dis type of picture.

  Thanks for given oppotunity through FB..

  Regards

 10. anjali shelke-dhobale म्हणतो आहे:

  mast ……………….

 11. Rupali Kapse म्हणतो आहे:

  Tumchya ya lekhane mazya lahanpanichya athavani jagrut kelya, lekh vachtana me mazya gavala kevha gele kalalach nahi, ayushyache avismyarniy khhan dolyapudhe ale .
  THANK YOU VERY MUCH FOR GIVING THIS EXPERIENCE .

  • sharadmani म्हणतो आहे:

   वाचल्या बद्दल व आवर्जून कळवल्या बद्दल मन:पूर्वक आभार. तुमचे शब्द म्हणजे लिहिणार्‍यासाठी टॊनिकच! तुमच्या अपेक्षेला साजेसे लेखन हातून घडो ही प्रार्थना.

 12. sharadmani म्हणतो आहे:

  Reblogged this on मोडजत्रा and commented:

  तसा जुनाच लेख आहे. ह्याधीही ह्या ब्लॉग वर प्रसृत केला होता; पण वर्षारंभाच्या व वसंतारंभाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सदर करीत आहे.

 13. राजेंद्र फडके म्हणतो आहे:

  चैत्रातील सकाळी प्रसन्न वाटलं – परत एकदा!

 14. J.S. Bahulikar म्हणतो आहे:

  chhan aahe lkeh. Pratyekachyach manat asach kuthlatari “sonmohor” laplela asto. Tyacha asa surekh chitra chitarlun gatasmruti jagavilyabaddal abhinandan!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s