इमारतीची दुरुस्ती

इमारतीची  पावसाळयातील  पाहणी

इमारत  दुरूस्तीच्या  क्षेत्रात  काम  करणाऱ्या,  विशेषत:  वॉटरप्रूफिंगचे  काम  करणाऱ्या  अनेकांना  एक  अनुभव  साधारण  प्रत्येक  वर्षी  येत  असतो.  तो  म्हणजे  पावसाळयाच्या  अगदी  तोंडावर  वॉटरप्रूफिंगच्या  कामासाठी  येणारी  बोलावणी.  काँट्रॅक्टर  त्या  वर्षी  योजलेली  व  सुरू  केलेली  कामे  मे  अखेरीच्या  आत  संपवण्याच्या  विवंचनेत  असतो  आणि  बोलावणारा  त्याला  नव्या  कामाची  पाहणी  करण्यासाठी  बोलावत  असतो.  आता  पावसाळा  अगदी  तोंडावर  आलाय  शक्यतो  आजच  येऊन  जा.  अशावेळी  वेळात  वेळ  काढून  कशी  तरी  पाहणी  उरकली  जाते.  गेल्या  वर्षी  आलेल्या  लीकेजचे  डाग,  काही  सदनिकांमधे  त्यानंतर  रंगकामही  झालेले  असते;  अशा  सदनिकांच्या  मालकांनी  केलेले  गळतीचे  अनुभव  कथन,  कधीतरी  रंगाच्या  सुटून  आलेली  लांबी  हीच  गळती  आहे  असे  केले  जाणारे  आग्रही  प्रतिपादन  अशा  परिस्थितीजन्य  पुराव्याच्या  आधारावर  पाहणी  करणाऱ्याने  तातडीने  उपाय  योजना  सुचवावी  व  आठवडयावर  आलेल्या  पावसाळयाच्या  आत  ती  (वाजवी  दरांत  हं…आमची  सोसायटीत  सगळे  व्ही.आर.एस  घेतलेले  आहेत!)  पारही  पाडावी  अशी  बोलावणाऱ्याची  कल्पना  असते.

खरे  तर  ऐन  पावसाळयात  गळती  असलेल्या  इमारतीची  पाहणी  करणे  आपल्याला  गळतीच्या  नेमक्या  कारणांपर्यंत  नेण्यास  नक्कीच  सहाय्यभूत  ठरते.  त्या  संबंधींचे  काही  मुद्दे  सर्वांच्या  माहिती  करिता  खाली  देत  आहे.

 • अनेकदा,  वर  उल्लेखल्या  प्रमाणे  पूर्वी  कधीतरी  झालेल्या  गळतीचे  उरलेले  डागांनाच  गळती  समजण्यात  येते  किंवा  खरोखरच  ओल  असणारा  भाग  जुने  डाग  समजून  दुर्लक्षिला  जातो.  ह्या  दोनही  बाबतीत  भर  पावसात  केलेली  गळतीची  पाहणी  नक्कीच  उपयोगी  ठरू  शकते.
 • गळती  सुरू  होण्याचा  आरंभ  बिंदू  समजण्यासाठीही  पावसाळयाच्या  सुरूवातीची  पाहणी  लाभदायक  ठरते.  अनेकदा  खिडकीच्या  वरच्या  लिंटेलमधून  वा  भिंतीतील  बाहेरच्या  बाजूस  प्लास्टरमधे  असलेल्या  दोषामुळे  भिंतीच्या  मधोमध  गळती  सुरू  होते.  त्या  गळतीचा  ओलावा  केशाकर्षणाच्या  तत्त्वानुसार  हळूहळू  भिंतीच्या  वरील  बाजूस  सरकत  सरकत  छता  पर्यंत  पोहोचतो  व  बहुधा  छतातूनच  गळती  आहे  असा  ग्रह  केला  जातो  व  उपाययोजना  केली  जाते.  मूळ  कारणाचीच  गफलत  झाल्यामुळे  अनेकदा  ह्या  उपाययोजनेचा  प्रकार  आग  रामेश्वरी  –  बंब  सोमेश्वरी  असा  काहीसा  होतो.  दुरूस्तीसाठी  वेळ  व  पैसा  खर्ची  पडूनही  गळतीचे  येरे  माझ्या  मागल्या  सुरूच  राहते.
 • अनेकदा  वरील  सदनिकेत  जर  सतत  व  अत्यंत  कमी  (थंड)  तापमानावर  वातानुकूलन  यंत्र  सुरू  ठेवण्याची  सवय  असेल  तर  पावसाळयासारख्या  वातावरणातील  आर्द्रता  सर्वाधिक  असलेल्या  काळात  कालच्या  सदनिकेच्या  छतावर  पाण्याचे  थेंब  जमू  लागतात  (कंडेन्सेशन).  हे  निरीक्षणही  पावसाळयाच्या  सुरूवातीस  न  होता  काहीसे  उशीरा  केल्यास  वरील  सदनिकेतून  गळती  होते  आहे  असा  नि:‑कर्ष  काढून  पुन्हा  एकदा  वरील  प्रमाणेच  चुकीची  उपाययोजना  करण्याचा  धोका  संभवतो.
 • तळमजल्यावरील  सदनिकांमधे  अनेकदा  जमिनीपासून  सुमारे  दोन  –  तीन  फुटांपर्यंत  ओल  आल्याच्या  खुणा  काहीवेळा  आढळतात.  बरेचदा  पावसाळयात  सभोवतीच्या  पाण्याच्या  पातळीत  वाढ  झाल्यामुळे  खालील  बाजूकडून  वर  केशाकर्षणाने  भितीत  पाणी  वर-वर  शोषले  जाते(राइजिंग  डॅम्पनेस).  ह्याचीही  निश्चिती  करण्यासाठी  पावसाळयात  केलेल्या  पाहणीचा  उपयोग  होतो.
 • बरेचदा  घरातील  बाल्कन्या  बंद  करून  त्यालगतची  खोली  माठी  केली  जाते.  अशा  वेळी  बाल्कनीच्या  अल्यूमिनियमच्या  खिडकीच्या  वरील  बाजूने,  किंवा  छज्जाच्या  (वेदरशेड)  वाटयामधून  गळती  सुरू  होते.  त्याचे  योग्य  निदान  करण्यासाठीही  भर  पावसात,  विशेषत:  सुरूवातीच्या  पावसात  केलेली  पाहणी  लाभदायक  ठरते  अन्यथा  ती  गळतीही  सदोष  प्लास्टरमधून  किंवा  बाल्कनीच्या  छतातून  आहे  असा  नि‑कर्ष  काढला  जाण्याची  शक्यता  असते.
 • अनेकदा  गच्चीखालच्या  सर्वच  सदनिकांमधून  गळतीची  तक्रार  आहे  हे  लक्षात  येते,  मग  घाईघाईने  कोणालातरी,  अगदी  चौकीदारालादेखील,  पाठवून  सर्व  सदनिकांत  गळत  असल्याची  खातरजमा  केली  जाते  व  संपूर्ण  गच्चीचे  वॉटरप्रूफिंग  करण्याच्या  दिशेने  चर्चा  सुरू  होते.  प्रत्यक्षात  गळती  जरी  सर्व  सदनिकांत  होत  असली  तरी  ती  प्रमुख्याने  बाल्कनीवरील  छतातून  गळते  आहे  का?  मुख्य  गच्चीच्या  खालील  भागात  गळतीचे  प्रमाण  नगण्या  आहे  का?  असल्या  बारकाव्याने  करण्याची  निरिक्षणे  करण्यासाठी  पावसाळया  शिवाय  दुसरा  योग्य  वेळ  कोणता?
 • बरेचदा  असे  लक्षात  येते  की  पावसाळयामधेच  वरच्या  मजल्यावरच्या  संडासातून  वा  न्हाणीघरातून  गळत  असण्याच्या  तक्रारीही  वाढतात.  आधीच  ताणावपूर्ण  असणाऱ्या  संबंधात  ह्यामुळे  भरच  पडते.  अशावेळी  गळतीचे  कारण  बाहेरच्या  प्लास्टर  मधील  दोषांमधे  आहे  की  खरेच  वरच्या  सदनिकेतून  गळती  होत  आहे  हे  ठरवणे  अत्यंत  कठिण  होऊन  बसते.  अशा  बाबतीतही  एक  पाहणी  पावसाळयात  व  दुसरी  पाहणी  पावसाळया  नंतर  एक  महिन्याने  केल्यास  गळतीचे  नेमके  कारण  निश्चित  करायला  सोपे  पडते.
 • इमारतीची  नव्याने  बाहेरची  दुरूस्ती  केली  असेल  तर  निदान  एक  पावसाळयाची  हमी  कंत्राटदाराकडून  घेतलेली  असते.  अशा  वेळी  पावसाळयाच्या  अगदी  सुरूवातीसच  संपूर्ण  इमारतीची  पाहणी  केल्यास  गळतीची  एखादी  बाब  वेळेवर  लक्षात  येऊन  कंत्राटदाराकडे  तसा  पाठपुरावा  करणे  शक्य  होते  व  त्यासाठी  पुरेसा  वेळही  मिळतो.  कंत्राटदाराने  त्यानंतर  केलेल्या  दुरुस्तीचे  यशापयश  पाहण्यासाठीही  पावसाळयाचा  एखादा  टप्पा  शिल्लक  उरतो.
 • वरील  अनेक  उदाहरणांमधून  आपल्या  लक्षात  येईल  की  गळतीच्या  कारणाच्या  मूळाशी  जाण्यासाठी  ऐन  पावसाळयात  केलेली  पाहणी  ही  अत्यंत  मदतरूप  ठरते.  पण  अनेकदा.  पावसाळयात  कुठे  बाहेरचे  काम  करायला  मिळणार  आहे  अशी  समजुत  करून  सारे  पावसाळयानंतरच  पाहू  असा  सरसकट  निर्णय  घेतला  जातो.  प्रत्यक्षात  काम  जरी  पावसाळयानंतर  केले  तरी  गळतीच्या  कारणांच्या  मुळाशी  जाण्यासाठी  व  त्यायोगे  पाऊस  कमी  झाल्यावर  वा  गेल्यानंतर  काय  करायचे  ह्याचेही  दिशादर्शन  मिळण्यासाठी  ऐन  पावसाळयातील  पाहणीचा  उपयोग  होतो.  यंदा  पाऊस  काहीसा  उशिराने  सुरू  झाला  असला  तरी  पुढल्या  दोन  महिन्यात  अशा  प्रकारच्या  पाहणीसाठी  अवश्य  योजना  करावी.
 • 8 Responses to इमारतीची दुरुस्ती

  1. prashant aranake म्हणतो आहे:

   Bhatti changali jamali aahe.
   Keep it up.
   You can write a new article “ghar pahave bandhun”
   How one can evaluate the civil property? while purchasing it. what one should take care while constructing a home. etc

  2. sharad satam म्हणतो आहे:

   Chhan mahitipurna artcle aahe. Aamhalahi waterproofing karaiche aahe. Tuze anubhav society meeting madhye mandato. Thanx

  3. Shailesh Shirwadkar म्हणतो आहे:

   I think I have already spoken to you regarding this, but I am too late still I have taken a printouts which I will display on society notice board before settling the final payment of our contactor.Thnaks

  4. मृदुला तांबे म्हणतो आहे:

   मुसलाधार पाऊस होणार्‍या कोकण किनारपट्टीच्या मुंबई ह्या भागात जुन्या पद्धतींप्रमाणे उतरत्या छपरांची घरे न
   बांधता धाब्याची घरे / इमारती बांधणे हे अयोग्य नव्हे का? पाऊस गळतीचे तेच मुख्य कारण आहे.

  5. prachi moghe म्हणतो आहे:

   ekdam sahi article ahe. tujhi nirikshan shakti tar afalatun ahech. bye d way wat is ur comment on redevelopment (aj sagalikade tyache pev futalel 20 varsha jhali bldgla ki garj aso va naso saglyana redevelopment havi karan towermadhye jayache asate)

   • sharadmani म्हणतो आहे:

    माझे काहीही मत नाही. येणाऱ्या दुरुस्तीचा खर्च व पुनर्विकासाचे अंकगणित असा हिशेब करूनच साधारण पणे निर्णय होताना दिसतात. एखाद्याला tower मध्ये जावे असेही वाटू शकते त्यात गैर काहीच नाही. जितके अधिकाधिक मातादिक्याने हे ठरेल तितके चांगले. पण खरा लफडा इथेच आहे. सहकारी सोसायटी चालवण्यात येणाऱ्या समस्या, बुलीश सभासदांना इतरांनी एकमुखाने ‘समज’ देण्याचा अभाव, वैयक्तिक हेवे दावे वा स्वार्थ अशा अनेक अडचणी आहेत. माझ्या सारखा छोटा दुरुस्ती व्यावसायिक ह्यात बापडा काय सांगणार?

  6. Swath naik म्हणतो आहे:

   Atishay upyukta mahiti.

  प्रतिक्रिया व्यक्त करा

  Fill in your details below or click an icon to log in:

  WordPress.com Logo

  You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

  Twitter picture

  You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

  Facebook photo

  You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

  Connecting to %s