Posted by: sharadmani | जानेवारी 27, 2012

विनोद तावडे

प्रसंग १९९० मधला आहे. स्थान: जम्मू. अ.भा.विद्यार्थी परिषदेचे कश्मीर बचाव आंदोलन एका महत्वाच्या टप्प्यावर आले होते.  देशभरातून १०००० हून अधिक विद्यार्थी जम्मूहून श्रीनगर कडे सत्याग्रह  करण्यासाठी जाणार होते. त्याच दिवशी सकाळी जम्मूजवळ रेल्वे रुळांवर शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जम्मूच्या पोलीस कमिशनरच्या ऑफिसमध्ये एक बैठक सुरु होती. तेवढ्यात त्यांच्या केबिनचे दार जोरात ढकलून एक संतप्त तरुण आत शिरला आणि म्हणाला “कमिशनर साहेब, जर आमच्या एखाद्या विद्यार्थ्याच्या नखालाही धक्का लागला तर अख्खे जम्मू शहर तुम्हाला पेटलेले दिसेल”. अचानक घडलेल्या ह्या धक्क्यातून सावरायला कमिशनरांना देखील थोडा वेळ लागला. पण लगेच चक्रे वेगाने फिरली. सर्वत्र सुरक्षा वाढवली गेली. सत्याग्रह पार पडून देशातल्या विविध भागांतून आलेला शेवटचा कार्यकर्ता जम्मू-काश्मीर च्या बाहेर रवाना होई पर्यंत परत कुठलीही अप्रिय घटना घडली नाही. एखाद्या सिनेमात घडावी अशी ही घटना प्रत्यक्ष घडली आहे. ह्या घटनेतील तो संतप्त तरुण म्हणजे विनोद तावडे. 

.

विनोद तावडे हा माणूस मला सुमारे ३० वर्षांपूर्वी भेटला. तेव्हा तो पुण्याला इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. मी अभाविप चे नुकतेच काम करायला लागलो होतो. अभाविपच्या कुठल्याश्या प्रदेश स्तरावरील कार्यक्रमामध्ये पुणे शाखेतून आलेल्या कार्यकर्त्यांच्या घोळक्यात एक ‘शिवसैनिक’ छाप कार्यकर्ता दिसत होता. चौकशी केल्यावर त्याचे नाव विनोद तावडे आहे असे समजले. कुणीतरी औपचारिक ओळख करून दिली. शिक्षण संपवून त्यानेही अभाविपचे पूर्णवेळ काम करायला सुरुवात केली. महाराष्ट्रात अभाविपचे काम एक परिणामकारक चळवळ म्हणून वाढण्यात चंद्रकांत उर्फ दादा पाटील आणि विनोद तावडे ह्यांचा मोठा वाटा आहे.

.

आज विनोद राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो आहे. अनेकांच्या त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यालाही मोठी स्वप्ने पाहण्याचीच सवय आहे. मला आठवते…विद्यार्थी परिषदेने १९८२ ला मंत्रालयावर एक मोर्चा काढला होता. भरपूर प्रयत्न करून जेमतेम ५०० विद्यार्थी त्यात सहभागी झाले होते. त्या मोर्चानंतर झालेल्या एका अनौपचारिक चर्चेत विनोद म्हणाला “हे काही खरं नाही. आपल्याला राज्यभरातल्या एक लाख विद्यार्थ्यांचा मोर्चा काढता आला पाहिजे.” त्या चर्चेत सहभागी झालेल्या प्रत्येकाला ही कल्पना सुखद वाटली खरी; पण आपण असा मोर्चा काढू शकतो असे कुणालाच वाटलेले दिसत नव्हते. विनोदला तसे मनापासून वाटत होते. सुमारे दहा वर्षातच त्याचे शब्द खरे ठरले.

.

काही वर्षांपूर्वी मुंबईच्या शिवाजी पार्क मध्ये झालेला ‘गीतरामायण’ च्या सुवर्ण महोत्सवाचा भव्य व देखणा कार्यक्रम देखील विनोदच्या मोठी स्वप्न पाहण्याच्या सावयीचेच उदाहरण आहे. कविवर्य ग.दि. माडगुळकर व महान संगीतकार – गायक सुधीर फडके ह्या महान दिग्गजांनी निर्माण केलेल्या त्या महान निर्मितीचा सुवर्ण महोत्सव तशाच भव्यतेने व दिमाखदारपणे व्हावा असे विनोदला मनोमन वाटत होते. यशवंत इंगवले सारख्या कलाक्षेत्रात तुलनेने कमी परिचित असलेल्या परंतु अत्यंत गुणी अशा आपल्या अभाविपच्या काळातील सहकाऱ्यावार मोठ्या विश्वासाने विनोदने ही कामगिरी सोपवली आणि यशवंतनेही विनोदने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला.

.

राजकारणात काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा उल्लेख साधारणपणे ‘नेता’ असाच केला जातो. विनोदमध्ये तर उपजतच नेतृत्वगुण आहेत; तरीदेखील स्वत:मधले ‘कार्यकर्ता’पण विनोदने हरवू दिले नाही. विनोदच्या प्रयत्नाने सुरु झालेल्या ‘अंतर्नाद’ प्रकल्पाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात बोलताना विनोद म्हणाला “समाजाप्रती मनात असणारी संवेदनशीलता हे माझे राजकारणात असण्याचे महत्वाचे कारण आहे व त्याशिवाय राजकारणातील अस्तित्वाला काहीही किंमत नाही”. विनोदच्या पुढाकाराने सुरु झालेला अंतर्नाद प्रकल्प म्हणजे मनातल्या संवेदनशीलतेला सामाजिक कृतीमध्ये परिवर्तित कसे करायचे ह्याचे उत्तम उदाहरण आहे.

.

श्वास सिनेमा आपल्यापैकी अनेकांनी पहिला असेल. रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डमधील हतोत्साहित करणाऱ्या परिस्थितीचे वर्णन त्या चित्रपटातील आजोबा तळमळीने एका सर्जनला स्पष्टपणे सुनावतात. विनोदने त्या दोन मिनिटाच्या दृष्यातून प्रेरणा घेऊन ह्या प्रकल्पाची कल्पना मांडली. मुंबईतील सार्वजनिक रुग्णालयातील मुलांच्या वॉर्ड मधील ते नैराश्यपूर्ण वातावरण बदलून टाकून तेथील भिंतींची मुलांना आवडेल अशी सजावट करणे, त्यांना तेथे खेळता येतील अशी खेळणी उपलब्ध असणे असे काहीसे त्या प्रकल्पाचे स्वरूप होते. रंग बनवणारे कारखानदार, जे जे कला महाविद्यालयातील उत्साही व संवेदनशील विद्यार्थी-प्राध्यापक, त्या त्या रुग्णालयातील डॉक्टर मंडळी व पक्षातील समविचारी सहकारी ह्या साऱ्यांना बरोबर घेऊन विनोदने हा प्रकल्प अत्यल्प खर्चात सिद्धीस नेला.

.

विनोदचे गाव कोकणातील… सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. कोकणचा विकास हाही विनोदचा तसा जिव्हाळ्याचा विषय. विनोदने कोकण विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक उपक्रम सुरु केले आहेत. मुंबईत दरवर्षी होणारा आंबा महोत्सव आपल्याला परिचयाचा आहेच. सावंतवाडी परिसरात चालणारे व्यसनमुक्ती केंद्र असे विविध उपक्रम कोकण विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून आकार घेत आहेत

.

विनोद पक्षाचा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आहे. आमदार आहे. पुढेमागे मंत्रीही होईल. पण ह्या प्रवासात विनोदने एक सहजता जपली आहे. विनोदला फोन केल्यावर तो उपलब्ध नसेल तर कालांतराने त्याचा फोन येतोच. एखाद्या महत्वाच्या घटनेची माहिती अनेकदा त्याच्या एस.एम.एस. मधूनच मिळते. पत्रकारही ह्या गोष्टीचा नेहमी उल्लेख करतात. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मधेही विनोदाचा सक्रीय सहभाग असतो. २६-२७ जुलैच्या पूर परिस्थितीत जीवाची बाजी लावून अनेकांना वाचविणाऱ्या वीर नागरिकांच्या सन्मानाचा एक कार्यक्रम रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने योजला होता. असा वीर नागरिकांच्या सन्मानाचा कार्यक्रम करण्याची कल्पनाही विनोदचीच होती.

.

आजचा पक्षातील सहकारी हा उद्याचा आपला स्पर्धक आहे असे वातावरण बहुतेक राजकीय पक्षांत असलेले आपल्याला दिसते. भाजपा देखील ह्या लागणी पासून मुक्त नाही. अशा वातावरणात सामुहिकतेवर, विचार विनिमयाने निर्णय करण्यावर व सहकारी कार्यकर्त्यामधल्या माणूसपणा वर नितांत श्रध्दा असलेल्या आमच्या ह्या राजकारणी मित्राचे कसे व्हायचे अशी काळजीही काहीवेळा वाटते. बहुधा ती श्रध्दाच त्याला मार्ग शोधायला मदतरूप ठरेल. विनोदच्या पुढील प्रदीर्घ प्रवासासाठी शुभेच्छा व व्यक्तिगत स्वार्थाचे कुठलेही काम त्याच्याकडे नेण्याचा प्रसंग परमेश्वराने माझ्यासारख्या त्याच्या असंख्य सुहृदांवर आणू नये ही मन:पूर्वक प्रार्थना.

( २००५ मधे प्रकाशित झालेल्या भाजपा: ध्येय पथावरील २५ वर्षे  ह्या ग्रंथात पहिल्यांदा प्रकाशित. प्रकाशक साप्ताहिक विवेक. दि. २४ जानेवारी २०१२ रोजी मुंबई तरुण भारत ह्या दैनिकात पुन:प्रकाशित करण्यात आला )

Posted by: sharadmani | ऑक्टोबर 5, 2011

मणी म्हणे…

राघोगढ दुर्गा - असुर मर्दन करताना सन १७५० मधील चित्र - साभार indiapicks.com


.

.

दुर्गे आता कधी, घेशी अवतार,
कितीक असुर, माजलेले ||

.

ये ग ‘शेरावाली’, पारज त्रिशूळा,
दुर्जनांच्या कुळा, ध्वस्त करी ||

.

काली आता तुही, कर उग्र मुद्रा
शक्तीच्या समुद्रा, उसळू दे  ||

.

भवानी तू सोडी, शक्तीपीठा झणी,
ये ग रणांगणी, मणी म्हणे  ||

संत संतमणी महाराज, मणिराम की छावणी, मणिपूर.


(प्रथम प्रसिद्धी: तरुण भारत, मुंबई, रविवार दि. २ ऒक्टोबर २०११) 

Posted by: sharadmani | ऑक्टोबर 3, 2011

मणी म्हणे…

.

..

 

.

..

.

.

.

.

गेले खळेकाका, गौतमही गेला,

झाला शुष्क गळा, दु:ख भारे ||

.

देवा पाठविशी, सज्जनां ‘बुलावा’,

दुर्जनांचा थवा, सुखेनैव ||

.

‘हात’ मारणारे, ‘कट’ मारणारे,

सुपारी’ देणारे, करी मजा ||

.

तुझ्या न्यायाचाही, उरला न धाक,

पडते ‘तारीख’, मणी म्हणे ||

.

संत संतमणी महाराज, मणिराम की छावणी, मणिपूर.

(प्रथम प्रसिद्धी – तरुण भारत, मुंबई, रविवार, दि. २५ सप्टेंबर २०११)

Posted by: sharadmani | सप्टेंबर 29, 2011

मणी म्हणे…

.

व्यंगचित्र साभार: newsreporter.com

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

इंधनांच्या भावे, गाठले गगन,

त्रासलेले जन, जेथे-तेथे ||

.

महाग रसोई, महागली वीज,

संपवा हो नीज, देवा आता ||

.

औषधे महाग, मरण महाग, 

सरण महाग, अखेरचे ||

.

निव्वळ जगणे, चैन ठरे देवा,

फोल तुझा धावा, मणी म्हणे  ||

.

संत संतमणी महाराज, मणिराम की छावणी, मणिपूर.

(प्रथम प्रसिद्धी: तरुण भारत, मुंबई, रविवार दि. १८ सप्टेंबर २०११)

Posted by: sharadmani | सप्टेंबर 24, 2011

मणी म्हणे…

.

.

 

.

.

.

.

.

.

.

 

उत्सवाच्या नावे, भक्तीचा बाजार

जाहला बेजार, आसमंत ||

.

नवसाला कुणी, सायासाला कुणी

हव्यासाला कुणी, जमलेले ||

.

जाणतो जो देव, सद्भाव मनीचा

ठणाणा ‘डॉल्बी’चा, कशापायी? ||

.

उत्सवे टिकवा, टिळकांचा हेतू

नसे मनी किंतु, मणी म्हणे ||

.

-संत मणी महाराज, मणिराम की छावणी, मणिपूर.

(प्रथम प्रसिद्धी – तरुण भारत मुंबई, रविवार दि. ११ सप्टें २०११)

Posted by: sharadmani | सप्टेंबर 12, 2011

मणी म्हणे…

चित्र साभार: हिंदुस्तान टाइम्स

.

..

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

 

.

गणांच्या नायका, भक्तांच्या पालका,

देई स्वास्थ्य लोकां, देशभर ||

 .

 

मिळो लहानांना, शिक्षणाच्या संधी,

सद्गुणांच्या छंदी, जडो जीव ||

 

 

संपावी व्यसने, झडू द्यावी ईर्षा,

वाढू द्या हो हर्षा, सर्वांतरी ||

 .

 

होवो धरीत्रीचे, आनंद भुवन,

स्वीकारा वंदन, मणी म्हणे ||

 .

 

संत   मणी महाराज, मणिराम की छावणी, मणिपूर.

 

(प्रथम प्रसिद्धी – तरुण भारत मुंबई, रविवार दि. ४ सप्टें २०११)

 

Posted by: sharadmani | सप्टेंबर 1, 2011

मणी म्हणे…

 

चित्र साभार timescontent.com

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

संसद सर्वोच्च, आहे राजे मान्य,

नाही भाव अन्य, मनामध्ये ||

.

मग सांगा किती, एम.पी.गजाआड,

कितींवर धाड, पडलेली ||

.

कोण झळकवी, सदनी बंडले,

कितीक धावले, ‘वेल’ मध्ये ||

.

ठरण्या सर्वोच्च, हवी कृती उच्च

आणि हात स्वच्छ, मणी म्हणे ||

.

संत संतमणी महाराज, मणिराम की छावणी, मणिपूर.

Posted by: sharadmani | ऑगस्ट 21, 2011

मणी म्हणे…

 

 

व्यंगचित्र: साभार Manjul

.

.

.

.

.

.

.

.

.

.

अण्णा गजाआड, सरकार त्रस्त,

टी.व्ही. वाले मस्त, टी.आर.पी.ने ||

.

सरकार करी, सदनी कांगावा

अण्णांचा सांगावा, देशभर ||

.

पोलिसांच्या आड, लपे सरकार,

अण्णा झाले स्वार, वाऱ्यावर ||

.

राजकीय दंभ, करण्या उताणा,

पुरे एक अण्णा, मणी म्हणे ||

.

संत मणीमहाराज, मणिराम की छावणी, मणिपूर.

 

(प्रथमप्रसिद्धी: रविवार, ऑगस्ट, तरुणभारत, मुंबई)

Posted by: sharadmani | ऑगस्ट 14, 2011

मणी म्हणे…

 
 

.

.
.
.

.

.

 

.
.
.

स्वातंत्र्यदिनाला, उदास हे मन

गांजलेले जन, चोहीकडे ||

 

दारिद्र्यरेषेच्या, खाली-वर जिणे

विकासाचे नाणे, दिसेचिना ||

 

गरीबीने त्रस्त, प्रकल्पाने ग्रस्त,

दैवावर भिस्त, ठेवोनिया  ||

.

कोटी दीना सुखे, लाभो घास चार

अपेक्षा का फार? मणी म्हणे ||

 

संत मणी महाराज, मणिराम की छावणी, मणिपूर.

(प्रथम प्रसिद्धी: रविवार, १४ ऑगस्ट, तरुण भारत, मुंबई)
Posted by: sharadmani | ऑगस्ट 7, 2011

मणी म्हणे…

. 

चित्र: शहरातील पावसाळी रात्र - साभार Leonid Afremov

.

.

शहरी पाऊस, गंधहीन कसा

कर्तव्याने जसा, बरसतो ||

.

शहरी पाऊस, नाही कोंब-तृण

वाढलेले तण, फुटपाथी ||

.

शहरी पाऊस, ‘मिमी’ ‘इंच’ माप,

नभ भर व्याप, दिसेचिना ||

.

शहरी पाऊस, गळत-तुंबत,

नाही ओथंबत, मणी म्हणे ||

.

संत मणी महाराज, मणिराम की छावणी, मणिपूर

(प्रथम प्रसिद्धी, तरुण भारत, मुंबई, रविवार, ७ ऑगस्ट, २०११)

जरा जुन्या पोस्ट्स »

प्रवर्ग

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 78 other followers